Thursday, April 22, 2010

गौरीपूजन

गौरीपूजन :
भाद्रपद शुक्लपक्षात षष्ठीला गौरी घरात आणली किंवा स्थापित केली जाते. सप्तमीला पूजन, अष्टमीला विसर्जन अशी या सणाची तीन दिवसांची रचना असते. या काळात महिलांची लगबग असते. घरोघरी त्यानिमित्त हळदी-कुंकू समारंभ योजले जातात. पक्वान्नाचे जेवण बनवले जाते. घराघरात स्वच्छता व सजावट अशी घरालाच वेगळे रूप देण्याचीही घाई -गडबड असते. जाती-उपजातींप्रमाणे या सणाच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. पण प्रत्येक घरात गौरी घरात निवासालाच आलेल्या आहेत या श्रद्धेने त्यांचे स्वागत, पूजन केले जाते.


काही ठिकाणी, काही घरांत गौरींनाच ‘महालक्ष्मी’ असे म्हटले जाते. ज्येष्ठ नक्षत्रावर ही पूजा होते म्हणून ‘ज्येष्ठ गौरी’ असेही म्हणतात. महालक्ष्मी आणि गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्या घरात आणल्या जातात. खड्याच्या गौरी, मुखवट्याच्या गौरी, मोठ्या सजावटीसह गौरी अशा अनेक पद्धतीत पाहण्यास मिळतात.


कोकणात तेरड्याची रोपे सुपात लावून त्यावर मुखवटे ठेवतात, काही लोक विहीरीतले किंवा नदीकाठचे सात खडे आणून त्याची पूजा करतात. गौरी घरी स्थापणे, तिच्या नैवेद्यासाठी १६ भाज्या व पंचपक्वान्न करणे, पुरणाच्या १६ दिव्यांनी ओवळणे, तिसर्‍या दिवशी गौरी विसर्जन करणे असे या सणाचे स्वरूप आहे. जाती-कुटुंबे, यानुसार घराघरात वेगवेगळ्या सजवण्याच्या, खाद्य पदार्थांच्या, पूजेच्या पद्धती आहेत. महालक्ष्मीने एका राक्षसाचा वध केला आणि अनेक स्त्रियांचे सौभाग्य राखले, लोकांना सुखी केले अशीही एक कथा याबाबत सांगितली जाते.

खंडित वीजपुरवठ्याने पुणेकरांचे अतोनात हाल

पुणे -  विजेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे उन्हाळ्याच्या झळांचा "चटका' गुरुवारी दिवसभर पुणेकरांना अनुभवावा लागला. सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा रात्री साडेसात वाजेपर्यंत सुरू झालेला नव्हता. त्यामुळे पुणेकरांचे अतोनात हाल झाले. उकाड्याने हैराण झाल्याने अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मात्र, शहराच्या काही भागात सायंकाळी झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.

दर गुरुवारी साप्ताहिक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे शहर आणि उपनगरांतील विविध भागांत वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. त्यानुसार आजही महापारेषणच्या गणेशखिंड ते चिंचवड या अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या नूतनीकरणाच्या कामामुळे जंगली महाराज रस्ता, तोफखाना, आकाशवाणी, शनिवार पेठ, नारायण पेठ, बुधवार पेठ, शिवाजीनगर गावठाण, सेनापती बापट रस्ता, वाकडेवाडी, मॉडेल कॉलनी, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि उपनगरांतील काही भागात सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित झाला होता. या भागातील वीजपुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत बंद होता. तर डेक्कन, प्रभात रस्ता, कर्वे रस्ता परिसरातील वीजपुरवठा सकाळी सहापासून बंद होता. तो सायंकाळी उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. आधीच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांचे त्यामुळे दिवसभर प्रचंड हाल झाले. शहर आणि उपनगरांतील काही भागांत रात्री साडेसात वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी "सकाळ'कडे केल्या. वीजपुरवठ्याअभावी शहर आणि उपनगरातील विविध रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रक दिवे बंद पडले होते. त्यामुळे सायंकाळनंतर अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.

वसंतदादा बॅंकेविरुद्ध महापालिकेचा दावा

सांगली - बहुचर्चित जकात ठेक्‍याच्या साडे चार कोटींच्या बॅंक गॅरंटीच्या रकमेच्या वसुलीसाठी अखेर महापालिकेने आज वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंकेविरुद्ध जिल्हा दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यात अवसायक आणि सर्व संचालकांना प्रतिवादी करण्यात आले आहे. ठेकेदाराविरुद्ध गेल्या आठवड्यात स्वतंत्र दावा दाखल केला आहे.

महापालिकेने जकात उत्पन्न वाढीसाठी ठेका देण्याचे धोरण राबवले. त्यानुसार 2006-2007 चा ठेका साई ट्रेडिंग कंपनीकडे होता. ठेकेदाराने साडेचार कोटींची वसंतदादा बॅंकेची बॅंक गॅरंटी दिली होती. ठेकेदाराने 3 कोटी 60 लाख रुपये ही जून 2006 ची रक्कम महापालिकेच्या खात्यावर जमा केली नाही. त्यामुळे प्रशासनाने ठेकेदाराला नोटीस दिली. महापुरामुळे 5 कोटींचे नुकसान झाले. त्यामुळे तुम्हीच दीड कोटी परत करा, अशी मागणी ठेकेदाराने महापालिकेकडे केली. त्यामुळे वसुलीचा प्रश्‍न वादग्रस्त ठरला.

ठेकेदाराने लवाद नियुक्तीची मागणी केली. लवाद नेमण्यात आला; पण लवादाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर महापालिकेने ठेकेदाराविरुद्ध जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला. तिथेही ठेकेदाराविरोधात निकाल लागला. त्यांनी उच्च न्यायालत अपील केले. तिथेही त्यांना न्याय मिळाला नाही. दरम्यानच्या काळात वसंतदादा बॅंक बुडाली. बॅंक गॅरंटीची रक्कम वसुलीबाबत प्रशासनासमोर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले.

ठेकेदाराने पुन्हा रक्कम भरावी लागू नये म्हणून प्रयत्न केले. उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. याचा निकाल अद्याप लागला नाही. माजी नगरसेवक रामचंद्र घोडके यांनी ठेकेदारांविरुद्ध जनहित याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल दोन महिन्यांपूर्वी लागला. न्यायालयाने कॉन्ट्रॅक्‍ट ऍक्‍टनुसार ठेकेदाराकडून रक्कम वसुलीची प्रक्रिया राबवावी, असा आदेश दिला. त्यानंतरही प्रशासनाने कार्यवाही केली नाही. महासभेत प्रचंड गदारोळ झाला. महिन्यात झालेल्या सभेत लवादाची अट रद्द करून वसंतदादा बॅंक आणि ठेकेदारांविरुद्ध दावा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिका आयुक्तांनी बॅंकेच्या अवसायकांना सात दिवसांत साडे चार कोटी भरा अन्यथा आपल्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला जाईल, अशी नोटीस दिली होती. त्यांनी मुदतीत रक्कम भरली नाही. त्यामुळे आज जिल्हा न्यायालयात बॅंकेविरुद्ध दावा दाखल करण्यात आला. आठवड्यात जकात ठेकेदार साई ट्रेडिंगविरुद्ध दावा दाखल केला. पुढील आठवड्यात दोन्ही दाव्यांची एकत्रित सुनावणी होणार आहे.

32 कोटींच्या ठेवी अडकल्यावसंतदादा बॅंकेत महापालिकेच्या 32 कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. ठेवींच्या वसुलीसाठी दावा दाखल करण्यास सहकार आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे ठेवी परत मिळाव्यात म्हणून उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

अनैतिक संबंधातून विवाहितेस पेटवून ठार केले

शिरपूर - अनैतिक संबंधातून भावेर (ता. शिरपूर) येथील विवाहितेस एका कुटुंबाने काल (ता. 21) दुपारी पेटवून देत ठार केल्याप्रकरणी आज थाळनेर पोलिस ठाण्यात भावेर येथील राजेंद्र गुजर, त्याची पत्नी, आई व मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. राजेंद्र गुजर यास आज चोपडा (जि. जळगाव) येथे अटक करण्यात आली.

विनयभंगाची तक्रारभावेर येथील राजेंद्र रघुनाथ गुजर याचे गावातील सविता गुलाब धनगर (वय 35) या विवाहितेशी अनैतिक संबंध होते. हा प्रकार सविताचा पती गुलाब धनगर याला माहीत झाला. त्यावरून राजेंद्र गुजर व त्यांच्यात वाद होत. सहा महिन्यांपूर्वी सविताने थाळनेर पोलिस ठाण्यात राजेंद्र गुजर याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

हाणामारीनंतरचा प्रकारदरम्यान, काल सकाळी साडेआठला सविताचा पती गुलाब धनगर व राजेंद्र गुजर यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली. पुन्हा दुपारी साडेबाराला गुजर व धनगर दापत्यांत मारामारी झाली. त्यानंतर राजेंद्र गुजर याने पत्नी विजया, मुलगा शुभम, आई अंजुबाईच्या मदतीने सविताच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटविले. त्यात ती गंभीररीत्या भाजली. तिला पती गुलाब धनगर याने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राजेंद्र गुजरने परिवारासह पलायन केले.

खुनाचा गुन्हाया प्रकरणी येथील पोलिस ठाण्यात काल प्रथमदर्शनी माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद होऊन चौकशीसाठी गुन्हा थाळनेर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. तेथील सहाय्यक पोलिस निरीक्षक ए. एस. सोनवणे यांनी सहकाऱ्यांसह तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी सविताचा पती गुलाब धनगर याने दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र गुजर, त्याची आई अंजूबाई रघुनाथ गुजर, पत्नी विजया, मुलगा शुभम यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच मृत सविताचा पती व दोन्ही मुलांचे जबाब नोंदवले.

विशेष पोलिस पथकदरम्यान, फरार केलेल्या गुजर कुटुंबीयांच्या शोधासाठी चोपडा तालुक्‍यात विशेष पोलिस पथक रवाना केले. त्यांनी आज दुपारी चोपडा येथे प्रमुख संशयित राजेंद्र गुजरला अटक केली. त्याची आई, पत्नी व मुलाच्या शोधासाठी पोलिस पथक जळगावकडे रवाना झाले. या घटनेनंतर भावेर गावात काल दुपारपासून आजही स्मशान शांतता होती.

समाजकंटकांनी जाळल्या सिडकोत पुन्हा मोटारसायकली


सिडको - येथील त्रिमूर्ती चौक परिसरात काल (ता. 21) रात्री दीडच्या सुमारास समाजकंटकांनी अपार्टमेंटमध्ये लावलेल्या मोटारसायकली पेटवून दिल्या. त्यातील चार मोटारसायकली भस्मसात झाल्या. बाकीच्या वाचविण्यात यश आले. आगीने वीजमीटरसह इमारतीचे नुकसान झाले. या प्रकाराचा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी नागरिकांसह रास्ता रोको करून तीव्र शब्दांत निषेध केला. आरोपींना त्वरित अटक न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दीड वर्षापूर्वी सिडको परिसरात मोटारसायकली जाळण्याच्या तीन-चार घटना घडल्या होत्या. त्या वेळी एकाच रात्री चाळीस मोटारसायकली जाळण्यात आल्याने पोलिस यंत्रणा हादरली होती. नंतर तर पोलिसाची हत्या करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली होती. पोलिस आयुक्तांनी कठोर कारवाई करत तेव्हा गुंडांना तडीपारीच्या नोटिसा बजावल्या व राजकीय गुंडांच्याही मुसक्‍या आवळण्यास सुरवात केली होती. मात्र, या गुंडांनी राजकीय दबाव वापरून आयुक्तांच्याच बदलीचा घाट घातला. तत्पूर्वी, त्यांनी वाहने जाळण्याचे प्रकार करून आयुक्तांना अकार्यक्षम ठरविण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, तमाम नाशिककर आयुक्तांच्या पाठीशी उभे राहिल्याने त्यांची बदली रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. राज्यातही हे प्रकरण गाजले होते.

आता नेत्यांच्या मदतीने तडीपारी रद्द करून घेतलेल्या अनेक गुंडांनी गेल्या दोन महिन्यांपासून शहरात पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे. गेल्या महिनाभरात वाहने जाळण्याच्या चार घटना घडल्या आहेत. जेल रोड, नाशिक रोड येथे नुकत्याच अशा घटना घडल्या होत्या. काल (ता. 21) रात्री दीडच्या सुमारास त्रिमूर्ती चौक भागातील अवनीज रेसिडेन्सी या इमारतीखाली लावलेल्या मोटारसायकली पेटविण्यात आल्या. विशेष म्हणजे या इमारतीपासून जवळ असलेल्या भागातच मागील वर्षी चाळीस मोटारसायकली पेटविल्या होत्या. मोटारसायकलींनी पेट घेतल्यानंतर येथे पहिल्या मजल्यावर राहणारे विलास भरीत यांना जाग आली. तथापि, गुंडांनी इमारतीतील फ्लॅटसना बाहेरून कड्या लावल्याने भरीत यांना खाली येता आले नाही. त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे परिसरातील नागरिक धावून आले. पण वर जाण्यासाठी एकच मार्ग असल्यामुळे धावपळ झाली. वाहनांना आग लावल्याने वीजमीटरनेही पेट घेतला होता. नागरिकांनी जीव धोक्‍यात घालून आग विझविली. या वेळी आगीचे लोळ पहिल्या मजल्यापर्यंत पोचल्याने भरीत कुटुंबीयांतील सदस्यांना श्‍वसनाचा त्रास झाला. या घटनेत साहेबराव घुगे (वाहन क्रमांक एम.एच.15-5054), पोपटराव भामरे (एमचएच-15, एएन 157), जितेंद्र सोनवणे (एमएच 19, जी 6546), श्री. पंडयाल (एमएच 15, बीजी 9180) यांच्या मालकीच्या मोटारसायकली जळाल्या. घटनेनंतर पहाटे दोनच्या सुमारास सहाय्यक आयुक्त संदीप पालवे, अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक धनराज वाळूंजकर, नगरसेवक अण्णा पाटील, सुधाकर बडगुजर, माजी नगरसेवक ऍड. तानाजी जायभावे, कैलास आहिरे यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली.

नागरिकांनी त्यांच्याकडे आरोपींच्या त्वरित अटकेची मागणी केली. घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली. एका संशयित मोटारसायकलचा पाठलाग केला. पवननगर भागातून ही
मोटारसायकल (एमएच 15, सीपी 4555) डीजीपीनगर येथे आल्यानंतर या मोटारसायकलवरील तिघांनी मोटारसायकल टाकून पळ काढला. ही मोटारसायकल गुन्ह्यासाठी वापरल्याचा पोलिसांचा संशय आहे. ती चोरीची असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. वाहने चोरून त्याद्वारे मंगळसूत्र चोरणे, लूटमार करणे किंवा जाळपोळीच्या घटनेसाठी वापर करणे ही गुंडांची स्टाइल झाली आहे. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी लावली असून, गुन्हेगारांचा तपास वेगाने सुरू केला आहे. पोलिसांनी या आरोपींना त्वरित अटक न केल्यास तीव्र
आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.