Saturday, April 24, 2010

सह्याद्री'तील नवरत्नांचा सन्मान

मुंबई - विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या नऊ मान्यवरांचा शुक्रवारी (ता.23) दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने नवरत्न पुरस्कार देऊन गौरव केला. वरळी येथील दूरदर्शनच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.

दूरदर्शनने जाहिरातींच्या मागे न लागता जी सामाजिक बांधिलकी जपली आहे, त्याचा प्रत्यय याही उपक्रमात आला. संगीत, नाट्य-नृत्य, कला यांचा मेळ या निमित्ताने घातला गेला. सोहळ्याचे उद्‌घाटन ज्येष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता, संगीतकार आनंदजी, खय्याम, भप्पी लहिरी, अच्युत गोडबोले, गौतम राजाध्यक्ष आदींनी केले. या वेळी विजया मेहता म्हणाल्या, की या नऊ जणांनी हा पुरस्कार प्रसिद्धीसाठी मिळविलेला नाही. कलाकार हा आपल्यातील कला इतरांपुढे साकारण्यासाठी धडपडत असतो. आपण सर्वच जण आपापल्या परीने कामाला जुंपलेले असतो. ही मंडळी करतात ते "कार्य' असते काम नसते. त्यामुळे आपण कलाकारांचे देणे लागतो. त्यातून किंचित उतराई होण्याचा हा "सह्याद्री'चा उपक्रमही स्तुत्य आहे.

या वेळी ज्येष्ठ कलाकार सुहास जोशी यांना "नाट्यरत्न', संगणक प्रशिक्षण विवेक सावंत यांना "शिक्षणरत्न', साहित्यिक आसाराम लोमटे यांना "साहित्यरत्न', समाजसुधारक राम इंगोळे यांना "सेवारत्न', बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी "रत्नसौरभ', कलादिग्दर्शक नितीन देसाई यांना "कलारत्न', सिनेदिग्दर्शक एन. चंद्रा यांना "चित्ररत्न', संशोधक डॉ. बाळ फोंडके यांना "रत्नदर्पण', शास्त्रीय गायिका आश्‍विनी भिडे-देशपांडे यांना "स्वररत्न' पुरस्काराने गौरविण्यात आले. सुभाष अवचट, पुष्पा भारती, डॉ. श्रीकांत चोरघडे, विजया मेहता, खय्याम, आनंदजी, परीक्षित साहनी, रमाकांत आचरेकर, गौतम राजाध्यक्ष, भप्पी लहिरी, विश्‍वनाथ सचदेव, डॉ. आर. सिन्हा यांच्या हस्ते या नवरत्नांचा सन्मान झाला.

कुमार केतकर, लता नार्वेकर, अच्युत गोडबोले व मिलिंग वागळे यांनी या विविध क्षेत्रातील नवरत्नांची निवड केली होती. अभिनेत्री ऊर्मिला कानेटकर हिला गोदरेज कंपनीचे प्रदीप उघडे आणि जयश्री टी. यांच्या हस्ते "फेस ऑफ दि इअर' या विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बावडेकर आणि समीरा गुजर हिने केले. सांस्कृतिक कार्यक्रमांची झालर असलेल्या या कार्यक्रमाचे प्रक्षेपण 1 मे रोजी दुपारी चार वाजता "सह्याद्री' वाहिनीवर होईल.

अश्‍लील चित्रफीत प्रकरणी युवकास अटक

कुरुंदवाड -  महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधाची अश्‍लील चित्रफीत करणाऱ्या कुरुंदवाड (भैरववाडी) येथील प्रकाश महादेव बिरंजे याला आज पोलिसांनी अटक केली. बिरंजे याने अश्‍लील चित्रफीत बनवून मोबाईच्या माध्यमातून प्रसारित केल्याचे नुकतेच उघडकीस आले होते. दोन दिवसांपासून तो शहर सोडून पसार झाला होता; मात्र सहायक पोलिस निरीक्षक विलास सुपे यांच्या पथकाने त्याला गडहिंग्लज येथून अटक करण्यात यशा मिळविले. गेल्या दोन दिवसांपासून या वादग्रस्त चित्रफितीबाबत शहरात चर्चा सुरू होती. बिरंजे याच्यावर पोलिसांनी बलात्कार तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वे गुन्हा दाखल केला आहे.

नांदणी येथील चिदानंद मेंडिगरे याने अश्‍लील चित्रफीत बनविल्याचे उघड झाले त्यानंतर दोन-चार दिवसांत बिरंजे याच्या चित्रफितीची चर्चा सुरू झाली. भैरववाडी क्‍लिप या नावाने ही क्‍लिप चौकाचौकात युवक घोळक्‍या घोळक्‍याने पाहत होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणी दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. स्वत:ची क्‍लिप प्रसारित झाल्यापासून बिरंजे गाव सोडून पसार झाला होता; मात्र पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पथक तयार करून गडहिंग्लज तालुक्‍यात त्याला शोधून काढले.

संबंधित महिलेने बिरंजे याच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. आपल्या दोन मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने दीड वर्षे शारीरिक संबंध ठेवले. जयसिंगपूर, इचलकरंजी, नृसिंहवाडी येथील हॉटेल व लॉजिंगमध्ये नेऊन संबंधाचे मोबाईलवर चित्रीकरण केले. त्यास नकार दिल्यानंतर त्याने अश्‍लील चित्रफीत आपल्या मोबाईलवरून दुसऱ्या मोबाईलवर प्रसारित केल्याची तक्रार केली आहे. त्यानुसार पोलिसांनी बिरंजे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, पोलिसांनी चित्रफितीसाठी बिरंजेने वापरलेला मोबाईल जप्त केला आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी त्याच्या साथीदारांचाही शोध सुरू आहे. पोलिस उपअधीक्षक प्रदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विलास तुपे, सहायक फौजदार दत्तात्रय पवार, चंद्रकांत भाट, इकबाल महात आदींचे पथक चौकशी करीत आहे.

भंगार देण्याच्या आमिषाने दोन युवतींवर बलात्कार

वाई - भंगार माल देण्याचे आमिष दाखवून दोन युवतींवर दोघा तरुणांनी बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आल्याने वाईत खळबळ उडाली आहे. येथील मिशन हॉस्पिटलच्या कंपाउंडमधील पडक्‍या बंगल्यात काल (शुक्रवारी) रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, सिद्धनाथवाडी येथील गुरेबाजार झोपडपट्टीतील दोन युवतींना भंगार माल देण्याचे आमिष दाखवून रवी रमेश काळे (वय 20, रा. यशवंतनगर झोपडपट्टी) व सनी ऊर्फ राहुल काशिनाथ भोसले (वय 19, रा. जुना मोटार स्टॅंड झोपडपट्टी) यांनी बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद संबंधित युवतींनी पोलिस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर महाडिक तपास करीत आहेत.

सहा नद्यांच्या जलासह ऐतिहासिक कलश मुंबईत जाणार

जळगाव -  महाराष्ट्र स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील तापी-पूर्णा, गिरणा, वाघूर, अंजनी, बोरी व उनपदेव येथील नद्यांचे पाण्याचा कलश, तर पाटणादेवीसह 9 ठिकाणच्या ऐतिहासिक स्थळाजवळील मातीचा कलश 28 एप्रिलला मुंबईला रवाना होणार आहे. हे दोन कलश जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष तथा स्वातंत्र्यसैनिक मनोहर देशमुख यांच्यासह क्रीडा मार्गदर्शक जगदीश चौधरी, आंतरराष्ट्रीय खेळाडू किशोर चौधरी व एन. ए. भावसार हे नेणार आहेत. जिल्ह्यात 30 एप्रिलला बालगंधर्व सभागृहात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमापासून या वर्षाच्या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे.

1 मे 2010 ला महाराष्ट्राच्या स्थापनेस 50 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभापासून ते 30 एप्रिल 2011 पर्यंत राज्याच्या विविध भागांत समाजघटकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नियोजनानुसार 1 मेस मुंबईतील हुतात्मा स्मारकाजवळ राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून प्रातिनिधिक स्वरूपात आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक कलशात नद्यांचे पाणी आणि दुसऱ्या कलशात त्या जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळाजवळची माती आणण्यात येणार आहे. त्या-त्या जिल्ह्यांचे स्वातंत्र्यसैनिक गौरव समितीचे अध्यक्ष तसेच अन्य दोन-तीन व्यक्ती यांचे पथक हे दोन्ही कलश सन्मानपूर्वक मुंबईला घेऊन जाणार आहेत. सर्व जिल्ह्यांची पथके 30 एप्रिलला सकाळी अकराला मुंबईत पोहोचणार आहेत. 30 एप्रिल 2010 ला महाराष्ट्रदिनाच्या पूर्वसंध्येला प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

दरम्यान, या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या संकल्पनेनुसार पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील तापी-पूर्णा संगम (चांगदेव), गिरणा, वाघूर, अंजनी, बोरी व उनपदेव येथील नद्यांचे पाणी एका कलशात नेले जाणार आहे, तर दुसऱ्या कलशात भास्कराचार्य निवास- पाटणादेवी, पारोळा- किल्ला, यावल- किल्ला, फैजपूर, पाचोरा- हुतात्मा स्मारक, आडगाव (ता. एरंडोल), असोदा- बहिणाबाईंचे जन्मस्थान, अमळनेर- साने गुरुजींचे स्थान व पाल येथील किल्ला येथील माती असणार आहे.
हे दोन्ही कलश नेण्याचे काम हे जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष तथा स्वातंत्र्यसैनिक मनोहर सुभेरसिंग देशमुख (वय 78), क्रीडा मार्गदर्शक जगदीश चौधरी, आंतरराष्ट्रीय खेळाडू किशोर प्रल्हाद चौधरी, अव्वल कारकून एन. ए. भावसार घेऊन जाणार आहेत.

50 लाखांचा निधी येणार
सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांना तब्बल 50 लाखांचा निधी येणार आहे. तसे नियोजन शासनस्तरावर सुरू आहे. दरम्यान, वर्षभर कार्यक्रम साजरे करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात पालकमंत्री गुलाबराव अध्यक्ष, तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्मिता वाघ, महापौर प्रदीप रायसोनी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, जिल्हाधिकारी कुणाल कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निरुपमा डांगे, पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी, अप्पर जिल्हाधिकारी गणेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, निवासी उपजिल्हाधिकारी, विशेष समाजकल्याण अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, विनोद ढगे, सचिन नारळे, सी. एन. पाटील, सदस्य सचिव जिल्हा नियोजन अधिकारी के. एन. पाटील, जिल्हा गौर समितीचे अध्यक्ष मनोहर देशमुख यांचा यात समावेश आहे.

धुळ्याजवळ अपघातात चार जण ठार

धुळे - सोनगीर (ता. धुळे) ते दोंडाईचा दरम्यानच्या सोंडले (ता. शिंदखेडा) गावाजवळ आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ट्रक (जीजे 7 यूयू 2394) आणि कार (जीजे 5, सीएल 4598) यांच्यात झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले, तर 12 जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये चालक व एका महिलेचा समावेश आहे. कारमधील प्रवासी सुरतहून देवभाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी येत होते, असे सांगण्यात आले.

दोन मृतदेह शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी दोघांचा धुळे जिल्हा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. जखमींवर सोनगीर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांची नावे अशी : कन्हय्यालाल झावरू देसले (वय 65, रा. देवभाने), संजय हरी देसले (वय 35), गणेश हरी मराठे (वय 27, चालक) याच्यासह अन्य एका 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे.