Tuesday, April 27, 2010

गहू, दादरचे भाव तेजीतच!

जळगाव - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हंगाम संपण्याच्या तोंडावर दाखल झालेल्या गहू व दादरच्या भावामध्ये तेजी दिसून आली आहे. उशिरा काढणी झालेल्या धान्यालाही मनाजोगते भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना खूपच दिलासा मिळाला आहे.

बाजारात सध्या गहू, दादर, हरभरा यांसारखा भुसार शेतमाल वगळता इतर मालाची आवक नगण्यच आहे. गव्हाची आवक 241 क्‍विंटल झालेली असली तरी ती गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत काहीशी मंदावल्याचे दिसून आले आहे; परंतु तिच्या कमाल दरात प्रतिक्‍विंटलला 100 रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळेच गहू बाजारात 1200 ते 1575 रुपयांना विकला गेला. ही स्थिती दादरच्या व्यवहारातही दिसून आली. दादरसुद्धा 200 क्‍विंटलचा टप्पा पार करीत 203 क्‍विंटलपर्यंत पोचली. दादरच्या किमान व कमाल दरात प्रत्येकी 200 रुपयांची भरीव वाढ झाल्याने 1265 ते 1411 रुपयांची मागणी राहिली. हरभऱ्याच्या चाफा, काबुली व मॅक्‍सिको या वाणांची विक्री सुरू आहे. जळगाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी उशिरा मळणी केलेला हा शेतमाल बाजारात आणताच विशेषतः चाफाचे दर वधारले. त्याच्या कमाल दरात 150 रुपयांनी, तर काबुलीच्या कमाल दरात तब्बल 200 रुपयांनी वाढ झाली. चाफा (1790 ते 2175 रुपये) व काबुलीची (2650 ते 2820 रुपये) अनुक्रमे 16 व 92 क्‍विंटल आवक झाली. मॅक्‍सिकोची आवकही 10 क्‍विंटल होती. जिल्ह्यात या वाणाला मोठी पसंती असल्याने तिला मागणीही मोठी असते. मॅक्‍सिकोने प्रतिक्‍विंटलला 3100 ते 3700 रुपयांचा दर पदरात पाडून घेतला. अर्थात, मागणीचा रेटा लक्षात घेता हरभऱ्याची एकूण आवक तशी तुरळकच राहिली. त्यामुळेच दरात वाढ झाल्याने विक्रीसाठी हरभरा बाजारात आणलेले शेतकरी आनदांत दिसले. तूर (35 क्‍विंटल) व बाजरीची (19 क्विंटल) आवक मात्र अत्यंत अल्प होती. तूर व बाजरीचे दर मात्र चांगले होते. गुळाची आवक 701 रवे होती. अर्थात, बहुतांश गूळ पश्‍चिम महाराष्ट्रातूनच आलेला होता.



बॉडी मसाजच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक

नाशिक - "हाय प्रोफाइल महिलांचे मसाज करा आणि दहा हजार रुपये कमवा' या स्वरूपाच्या उत्तान जाहिरातींद्वारे बेरोजगारांना आकर्षित करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याची प्रकरणे उघडकीस येत आहेत. शहर आणि ग्रामीण भागातील अनेक युवकांची यात फसवणूक झाल्याने त्यांची अवस्था "सहनही होत नाही अन्‌ सांगताही येत नाही' अशी झाली आहे. याबाबत सर्वच व्यवहार दूरध्वनीवरून होत असल्याने पोलिसांत तक्रारही करता येत नसल्याने फसवणूक झालेले हतबल होत आहेत.

दरम्यान, याबाबत अनेक युवक खातरजमा न करताच प्रसिद्ध होणाऱ्या उत्तान जाहिरातींना भुलत असल्याने ही फसवणूक होते. त्या जाहिरातींच्या मुळापर्यंत पोचणेही अशक्‍य बनले असून, जाहिरातीतील क्रमांकांवर दूरध्वनी केल्यास उत्तर न देता त्यांच्या नोंदी घेऊन फक्त नवख्या क्रमांकांना संबंधित महिला उत्तरे देतात. यातील काही महिला पुणे, तर काही नवी मुंबई व ठाणे येथील असल्याचे सांगतात. महिला अतिशय गोड व हिंदीत बोलत असल्याने अनेकांची त्यातून फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये मोठी साखळी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबत माहिती अशी, की ग्रामीण तसेच शहरी भागात चमचमीत बातम्या देणाऱ्या वृत्तपत्रांत भडक स्वरूपात "हाय प्रोफाइल महिलांचे मसाज करा व रोज दहा हजार रुपयांपर्यंत कमवा' अशा जाहिराती प्रसिद्ध होत आहेत. त्यात महिलांचे चित्र व दूरध्वनी क्रमांक असतात. त्यावर दूरध्वनी केल्यावर आपणास नोकरी हवी असल्यास बॅंकेत पैसे भरण्यास सांगितले जाते व नंतर पुढे काहीच होत नाही.

निफाड तालुक्‍यातील विनोद गांगुर्डे या युवकाने आपल्याला असा अनुभव आल्याचे सांगितले. त्या जाहिरातीला प्रतिसाद म्हणून त्याने फोन केल्यावर "पूजा वर्मा' नामक महिलेने नाव, वय, गाव विचारले. आयसीआयसीआय बॅंकेच्या दत्तमंदिर नाशिक रोड येथील सुरेंद्र कुमार यांच्या खात्यात अडीच हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर तुमची आज सायंकाळी मीटिंग होईल, असे कळविले. त्यानंतर "आजची मीटिंग रद्द झाली. तुम्ही उद्या बॅंक ऑफ बडोदाच्या एका खात्यात दोन हजार रुपये भरा,' असे सांगितले गेले. पैसे भरल्यावर फोनच घेतला जात नाही. पाठपुरावा केल्यावर "आम्ही व्यस्त आहोत, नंतर भेटू' असे उत्तर येते किंवा सर्वच दूरध्वनी बंद असतात, असे विनोदने सांगितले. यात अनेक युवकांची फसवणूक झाली असून, त्यांना तक्रारही करता येत नाही आणि नोकरीही मिळत नाही. याबाबत प्रत्यक्ष भेट कोणाचीही झालेली नसल्याने पोलिसांत तक्रारही करता येत नाही. युवकांनी सावध होऊन अशा फसव्या जाहिरातींना भुलू नये, अशी अपेक्षा फसवणूक झालेल्या युवकांनी व्यक्त केली आहे.