Saturday, April 24, 2010

सहा नद्यांच्या जलासह ऐतिहासिक कलश मुंबईत जाणार

जळगाव -  महाराष्ट्र स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील तापी-पूर्णा, गिरणा, वाघूर, अंजनी, बोरी व उनपदेव येथील नद्यांचे पाण्याचा कलश, तर पाटणादेवीसह 9 ठिकाणच्या ऐतिहासिक स्थळाजवळील मातीचा कलश 28 एप्रिलला मुंबईला रवाना होणार आहे. हे दोन कलश जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष तथा स्वातंत्र्यसैनिक मनोहर देशमुख यांच्यासह क्रीडा मार्गदर्शक जगदीश चौधरी, आंतरराष्ट्रीय खेळाडू किशोर चौधरी व एन. ए. भावसार हे नेणार आहेत. जिल्ह्यात 30 एप्रिलला बालगंधर्व सभागृहात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमापासून या वर्षाच्या कार्यक्रमाला सुरवात होणार आहे.

1 मे 2010 ला महाराष्ट्राच्या स्थापनेस 50 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या प्रारंभापासून ते 30 एप्रिल 2011 पर्यंत राज्याच्या विविध भागांत समाजघटकांसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. नियोजनानुसार 1 मेस मुंबईतील हुतात्मा स्मारकाजवळ राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून प्रातिनिधिक स्वरूपात आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक कलशात नद्यांचे पाणी आणि दुसऱ्या कलशात त्या जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळाजवळची माती आणण्यात येणार आहे. त्या-त्या जिल्ह्यांचे स्वातंत्र्यसैनिक गौरव समितीचे अध्यक्ष तसेच अन्य दोन-तीन व्यक्ती यांचे पथक हे दोन्ही कलश सन्मानपूर्वक मुंबईला घेऊन जाणार आहेत. सर्व जिल्ह्यांची पथके 30 एप्रिलला सकाळी अकराला मुंबईत पोहोचणार आहेत. 30 एप्रिल 2010 ला महाराष्ट्रदिनाच्या पूर्वसंध्येला प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

दरम्यान, या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या संकल्पनेनुसार पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नियोजन करण्यात आले आहे. यात जिल्ह्यातील तापी-पूर्णा संगम (चांगदेव), गिरणा, वाघूर, अंजनी, बोरी व उनपदेव येथील नद्यांचे पाणी एका कलशात नेले जाणार आहे, तर दुसऱ्या कलशात भास्कराचार्य निवास- पाटणादेवी, पारोळा- किल्ला, यावल- किल्ला, फैजपूर, पाचोरा- हुतात्मा स्मारक, आडगाव (ता. एरंडोल), असोदा- बहिणाबाईंचे जन्मस्थान, अमळनेर- साने गुरुजींचे स्थान व पाल येथील किल्ला येथील माती असणार आहे.
हे दोन्ही कलश नेण्याचे काम हे जिल्हा गौरव समितीचे अध्यक्ष तथा स्वातंत्र्यसैनिक मनोहर सुभेरसिंग देशमुख (वय 78), क्रीडा मार्गदर्शक जगदीश चौधरी, आंतरराष्ट्रीय खेळाडू किशोर प्रल्हाद चौधरी, अव्वल कारकून एन. ए. भावसार घेऊन जाणार आहेत.

50 लाखांचा निधी येणार
सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांना तब्बल 50 लाखांचा निधी येणार आहे. तसे नियोजन शासनस्तरावर सुरू आहे. दरम्यान, वर्षभर कार्यक्रम साजरे करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. यात पालकमंत्री गुलाबराव अध्यक्ष, तर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्मिता वाघ, महापौर प्रदीप रायसोनी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, जिल्हाधिकारी कुणाल कुमार, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. निरुपमा डांगे, पोलिस अधीक्षक संतोष रस्तोगी, अप्पर जिल्हाधिकारी गणेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, निवासी उपजिल्हाधिकारी, विशेष समाजकल्याण अधिकारी, समाजकल्याण अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे प्रकल्प अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा क्रीडा अधिकारी, विनोद ढगे, सचिन नारळे, सी. एन. पाटील, सदस्य सचिव जिल्हा नियोजन अधिकारी के. एन. पाटील, जिल्हा गौर समितीचे अध्यक्ष मनोहर देशमुख यांचा यात समावेश आहे.

No comments:

Post a Comment