Thursday, April 22, 2010

खंडित वीजपुरवठ्याने पुणेकरांचे अतोनात हाल

पुणे -  विजेच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे उन्हाळ्याच्या झळांचा "चटका' गुरुवारी दिवसभर पुणेकरांना अनुभवावा लागला. सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास खंडित झालेला वीजपुरवठा रात्री साडेसात वाजेपर्यंत सुरू झालेला नव्हता. त्यामुळे पुणेकरांचे अतोनात हाल झाले. उकाड्याने हैराण झाल्याने अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मात्र, शहराच्या काही भागात सायंकाळी झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला.

दर गुरुवारी साप्ताहिक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे शहर आणि उपनगरांतील विविध भागांत वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. त्यानुसार आजही महापारेषणच्या गणेशखिंड ते चिंचवड या अतिउच्चदाब वीजवाहिनीच्या नूतनीकरणाच्या कामामुळे जंगली महाराज रस्ता, तोफखाना, आकाशवाणी, शनिवार पेठ, नारायण पेठ, बुधवार पेठ, शिवाजीनगर गावठाण, सेनापती बापट रस्ता, वाकडेवाडी, मॉडेल कॉलनी, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता आणि उपनगरांतील काही भागात सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित झाला होता. या भागातील वीजपुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत बंद होता. तर डेक्कन, प्रभात रस्ता, कर्वे रस्ता परिसरातील वीजपुरवठा सकाळी सहापासून बंद होता. तो सायंकाळी उशिरापर्यंत सुरळीत झाला नव्हता. आधीच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांचे त्यामुळे दिवसभर प्रचंड हाल झाले. शहर आणि उपनगरांतील काही भागांत रात्री साडेसात वाजेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी "सकाळ'कडे केल्या. वीजपुरवठ्याअभावी शहर आणि उपनगरातील विविध रस्त्यांवरील वाहतूक नियंत्रक दिवे बंद पडले होते. त्यामुळे सायंकाळनंतर अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती.

No comments:

Post a Comment