Thursday, April 22, 2010

वसंतदादा बॅंकेविरुद्ध महापालिकेचा दावा

सांगली - बहुचर्चित जकात ठेक्‍याच्या साडे चार कोटींच्या बॅंक गॅरंटीच्या रकमेच्या वसुलीसाठी अखेर महापालिकेने आज वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंकेविरुद्ध जिल्हा दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यात अवसायक आणि सर्व संचालकांना प्रतिवादी करण्यात आले आहे. ठेकेदाराविरुद्ध गेल्या आठवड्यात स्वतंत्र दावा दाखल केला आहे.

महापालिकेने जकात उत्पन्न वाढीसाठी ठेका देण्याचे धोरण राबवले. त्यानुसार 2006-2007 चा ठेका साई ट्रेडिंग कंपनीकडे होता. ठेकेदाराने साडेचार कोटींची वसंतदादा बॅंकेची बॅंक गॅरंटी दिली होती. ठेकेदाराने 3 कोटी 60 लाख रुपये ही जून 2006 ची रक्कम महापालिकेच्या खात्यावर जमा केली नाही. त्यामुळे प्रशासनाने ठेकेदाराला नोटीस दिली. महापुरामुळे 5 कोटींचे नुकसान झाले. त्यामुळे तुम्हीच दीड कोटी परत करा, अशी मागणी ठेकेदाराने महापालिकेकडे केली. त्यामुळे वसुलीचा प्रश्‍न वादग्रस्त ठरला.

ठेकेदाराने लवाद नियुक्तीची मागणी केली. लवाद नेमण्यात आला; पण लवादाने महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर महापालिकेने ठेकेदाराविरुद्ध जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला. तिथेही ठेकेदाराविरोधात निकाल लागला. त्यांनी उच्च न्यायालत अपील केले. तिथेही त्यांना न्याय मिळाला नाही. दरम्यानच्या काळात वसंतदादा बॅंक बुडाली. बॅंक गॅरंटीची रक्कम वसुलीबाबत प्रशासनासमोर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले.

ठेकेदाराने पुन्हा रक्कम भरावी लागू नये म्हणून प्रयत्न केले. उच्च न्यायालयातही याचिका दाखल केली आहे. याचा निकाल अद्याप लागला नाही. माजी नगरसेवक रामचंद्र घोडके यांनी ठेकेदारांविरुद्ध जनहित याचिका दाखल केली होती. त्याचा निकाल दोन महिन्यांपूर्वी लागला. न्यायालयाने कॉन्ट्रॅक्‍ट ऍक्‍टनुसार ठेकेदाराकडून रक्कम वसुलीची प्रक्रिया राबवावी, असा आदेश दिला. त्यानंतरही प्रशासनाने कार्यवाही केली नाही. महासभेत प्रचंड गदारोळ झाला. महिन्यात झालेल्या सभेत लवादाची अट रद्द करून वसंतदादा बॅंक आणि ठेकेदारांविरुद्ध दावा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.

महापालिका आयुक्तांनी बॅंकेच्या अवसायकांना सात दिवसांत साडे चार कोटी भरा अन्यथा आपल्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला जाईल, अशी नोटीस दिली होती. त्यांनी मुदतीत रक्कम भरली नाही. त्यामुळे आज जिल्हा न्यायालयात बॅंकेविरुद्ध दावा दाखल करण्यात आला. आठवड्यात जकात ठेकेदार साई ट्रेडिंगविरुद्ध दावा दाखल केला. पुढील आठवड्यात दोन्ही दाव्यांची एकत्रित सुनावणी होणार आहे.

32 कोटींच्या ठेवी अडकल्यावसंतदादा बॅंकेत महापालिकेच्या 32 कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत. ठेवींच्या वसुलीसाठी दावा दाखल करण्यास सहकार आयुक्तांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे ठेवी परत मिळाव्यात म्हणून उच्च न्यायालयात दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

No comments:

Post a Comment