Monday, April 19, 2010

रिझर्व्ह बॅंकेचे व्याज दरवाढीचे संकेत

मुंबई - वाढती चलनवाढ आर्थिक विकासाला खीळ घालू शकते, असे मत व्यक्त करतानाच नव्या आर्थिक वर्षाच्या पतधोरणात याबाबत निश्‍चितच उपाययोजना केली जाईल, अशा शब्दांत भारतीय रिझर्व्ह बॅंकेने व्याज दरवाढीचे स्पष्ट संकेत आज दिले.

2009-10 या आर्थिक वर्षातील सूक्ष्म आर्थिक आणि पतधोरण विकासावर आधारित सर्वेक्षण मध्यवर्ती बॅंकेने आज येथे जाहीर केले. या सर्वेक्षणात आर्थिक विकासाचे उद्दिष्ट साध्य करणे आवश्‍यक असल्याचे नमूद करतानाच वाढत्या चलनवाढीवर नियंत्रण मिळविणेही प्राधान्याचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यामुळे वाढती महागाई रोखण्यासाठी बाजारातील रोकडतेवर आळा घालण्याच्या दृष्टीने उद्याच्या (ता. 20) वार्षिक पतधोरणामध्ये व्याजदरात वाढ केल्या जाण्याच्या शक्‍यतेला बळकटी मिळाली आहे.

आपल्या सर्वेक्षणात रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे, की अर्थव्यवस्थेच्या वाढीकरिता खासगी क्षेत्रातील मागणी अधिक सक्षम होणे गरजेचे असून, गेल्या काही दिवसांत देशाची चलनवाढ हा चर्चेचा विषय राहिला आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी समतोल अशी पावले पतधोरणात उचलली जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अन्नधान्य आणि इंधनाच्या वाढत्या किमतींचा चलनवाढीवर दबाव असल्याचे दिसत असून, कमी मान्सूनचा प्रभाव कृषी उत्पादनावरही होणार असल्याचे या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत उत्पादनाच्या पुरवठा बाजूने चलनवाढीचा दबाव असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले गेले आहे. चलनवाढीवर येत्या काही महिन्यांमध्ये नियंत्रण मिळविणे शक्‍य होईल, असेही या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

2008-09 या आर्थिक वर्षात देशाचा विकासदर 6.7 टक्के होता; तो गेल्या आर्थिक वर्षात 7.2 टक्के राहिला असून, नव्या आर्थिक वर्षाचा 2010-11 चा विकासदर 8.2 टक्के अधोरेखित करण्यात आल्याचे सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment