Monday, April 19, 2010

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मं. वि. राजाध्यक्ष यांचे निधन

मुंबई - ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष (96) यांचे आज रात्री 8 च्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ज्येष्ठ मराठी साहित्यिक डॉ. विजया राजाध्यक्ष यांचे ते पती होत. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रात्री उशिरा शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
राजाध्यक्ष हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. छातीत कफ झाल्याने त्यांना श्‍वसनास त्रास होत होता. त्यांच्यावर वांद्रे येथील गुरू नानक रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना "साहित्य सहवास'मधील घरी आणले. आज रात्री 8 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

राजाध्यक्ष यांचा जन्म 7 जून 1913 रोजी मुंबईत झाला. महाविद्यालयीन जीवनात इंग्रजी साहित्यातील वर्डस्वर्थ पारितोषिक त्यांनी पटकावले होते. "नॅशनल बुक ट्रस्ट'चे विश्‍वस्त, तसेच ज्ञानपीठ पुरस्कार समितीवर त्यांनी काम केले. पाठ्यपुस्तक मंडळाचे मुख्य संपादक पदही त्यांनी भूषविले होते. इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून विद्यार्थिवर्गात ते प्रिय होते. गुजरात कॉलेज, गुजरात इस्माईल युसुफ कॉलेज - मुंबई, राजाराम कॉलेज - कोल्हापूर येथे त्यांनी इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम केले.

"अभिरुची' मासिकातून त्यांनी लेखन करण्यास सुरुवात केली. "अभिरुची'तील वाद-संवाद हे त्यांचे सदर वाचकप्रिय ठरले. पु. ल. देशपांडे यांच्याबरोबर केलेल्या स्फुटलेखनाचे "पुरुषराज अळूरपांडे' हे पुस्तक, तसेच पाच कवी (संपादित), खर्डेघाशी, आकाशभाषिते, शालजोडी, अल्ज्ञान, पंचम, पाक्षिकी, शब्दयात्रा, भाषाविवेक ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. कुसुमावती देशपांडे यांच्यासमवेत लिहिलेला "हिस्ट्री ऑफ मराठी लिटरेचर' हा त्यांचा इंग्रजी ग्रंथही प्रसिद्ध आहे.

No comments:

Post a Comment