Monday, April 19, 2010

'प्राध्यापिका' बनून तेजूचा वेश्‍या व्यवसाय

सांगली - डोळ्यांवर ऐटबाज चष्मा, हलका मेकअप, पंजाबी ड्रेस किंवा हलक्‍या रंगाची साडी नेसून ती "प्राध्यापिका' बनून विद्यार्थ्यांच्या वडिलांना भेटायची. वर्तमानपत्रात "टिचर हवी आहे का?' ही जाहिरात वाचून आलेले छोट्या मुलांचे पालक तिच्याशी "फी'ची चर्चा करायला लागायचे. त्यावेळी ती आपला खरा रंग दाखवायची. ती "टिचर' नसून वेश्‍या आहे, हे पालकांच्या लक्षात यायचे, तेव्हा धक्काच बसायचा.

एखादं छंदिष्ट गिऱ्हाईक पकडून ती हळूहळू त्याच्याशी लगट करायची आणि बैठक पक्की व्हायची. मुलाला शिक्षिका शोधायला आलेले काही पालक समतानगर येथील बंगल्यावर पाच-दहा हजारांची उधळण करून रात्र रंगेल करायचे. पोलिस चौकशीत पुढे आलेली तेजू पाटणकर या महिलेबद्दलची ही धक्कादायक माहिती आहे.

समतानगर येथे एक बंगला भाड्याने घेऊन तेथे वेश्‍या व्यवसाय चालविला जायचा. रात्री आठला बंगला उघडला की पहाटे चारपर्यंत तेथे "हाय प्रोफाईल' गिऱ्हाइकांचा राबता असायचा. स्वतः तेजू आणि आणखी चार-पाच महिला, मुली तेथे धंदा करायच्या. हा अड्डा चालविणारा मुख्य दलाल अभिजित जैन उर्फ विक्रम दिलीप पाटील याने पोलिस चौकशीत ही माहिती दिली. भल्याभल्यांना गंडा घालण्याचे "फंडे' त्याने पोलिसांपुढे कथन केले. त्यातून त्याने लाखो रुपये कमावल्याचीही कबुली दिली.

तेजू पाटणकर मूळची इंदोरची आहे. या धंद्यात तिचे आधीही बस्तान होते, मात्र अभिजित जैनशी संपर्क आल्यानंतर तिने "प्राध्यापिका' बनून नव्याने धंदा थाटला. मसाज सेंटरच्या नावाने जाहिरात दिली तर "रिस्क' आहे हे लक्षात आल्यानंतर अभिजित जैनने "टिचर हवी का?' या मथळ्यात जाहिराती देण्यास सुरवात केली. नोकरी, उद्योग, व्यापारामुळे मुलांच्या अभ्यासाकडे हल्ली पालकांचे दुर्लक्ष होते. मुलांना क्‍लासला न्यायचे आणि परत आणायचे यासाठीही त्यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे "टिचर' घरी येऊन शिकवण्या घेतात. ही जुनी पद्धत आहे. ती नव्या धंद्यासाठी वापरण्याची शक्कल लढवून जैनने तेजूचा पद्धतशीरपणे वापर करून घेतला. तीही यात मुरत गेली आणि दोघांनी शेकडो लोकांचे खिसे रिकामे केले.
जाहिरातीत "तेजू'चा मोबाईल क्रमांक दिलेला असायचा. मुलांच्या आईचा फोन आला तर ती "बॅच' फुल्ल झालीय, असे उत्तर द्यायची. मुलाच्या वडिलांनी फोन केला तर बराच वेळ माहिती घ्यायची. मुलापेक्षा त्याच्या वडिलांमध्येच तिचा "इंट्रेस्ट' असायचा. ती त्यांना तुम्ही स्वतःच भेटायला या, असे सांगायची. भेटीसाठी एखाद्या हॉटेलची निवड केली जायची. वेळ शक्‍यतो सायंकाळची ठरायची. तिचा तो मेकअप, एकूण लक्षवेधी पेहराव, हावभाव, खाणाखुणा पाहिल्या की समोरील व्यक्तीला साहजिक संशय यायचा. तेव्हा ती त्यांना थेट "बैठकी'ची ऑफर द्यायची. बरेचजण तिच्याकडे आकर्षित व्हायचे. हजार रुपयांना बैठक ठरायची. पैकी तीनशे रुपये अभिजित जैनला आणि सातशे रुपये तेजूला असा सौदा पक्का व्हायचा.
तेजूकडे एका दिवशी पाच-पाच गिऱ्हाईक आल्याची वहीत नोंद आहे. जैन यानेही त्याची कबुली दिली आहे. तिच्यासह आणखी काही महिला व मुली या अड्ड्यावर असायच्या. एकाचवेळी गिऱ्हाइकाची गर्दी झाली तर पर्याय उपलब्ध असायचे. तिच्या या धंद्याचा अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख बाळासाहेब वाघमोडे व त्यांच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला.

तेजू ताब्यातदोन आठवड्यांपूर्वी वेश्‍या अड्ड्यांवर टाकलेल्या छाप्यात तेजू पाटणकरला ताब्यात घेण्यात आले. ती या जाळ्यात अडकली असल्याच्या संशयाने ती "अबला' ठरली. तिची कऱ्हाडच्या सुधारगृहात रवानगी करण्यात आली. आता तिचा खरा रंग पुढे येताच पोलिस तिचा ताबा घेण्यासाठी कऱ्हाडला रवाना झाले. सायंकाळी तिचा ताबा मिळाल्याची माहिती आहे.

No comments:

Post a Comment