Wednesday, April 28, 2010

'आयपीएल'वर करआकारणी अशक्‍य - मुख्यमंत्री

मुंबई - आयपीएल सामने संपले असल्याने त्यावर करआकारणी करणे अशक्‍य आहे. आता पुढील वर्षी त्याबाबत विचार करता येईल, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सांगितले. आयपीएलवर करआकारणीचा मुद्दा गेले दोन-अडीच महिने चर्चेत असताना अजूनही करआकारणी होऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितले होते. मात्र, आता ते अशक्‍य असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला.

केवळ आयपीएलवर मनोरंजन कर लावण्याचाच प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळापुढे नव्हता; तर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व क्रिकेट सामन्यांवर कर लावण्याचा तो प्रस्ताव आहे. मंत्रिमंडळाचा याबाबत अंतिम निर्णय न झाल्याने त्याचा लाभ आयपीएलला मिळाला असला, तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर मनोरंजन कर लागू होणार का? हा प्रश्‍न सध्या तरी अनिर्णीत अवस्थेतच पडून आहे.

आयपीएलसह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सर्व क्रिकेट सामन्यांवर मनोरंजन कर लागू करण्याचा प्रस्ताव 20 जानेवारीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे ठेवण्यात आला. तो मंजूर झाला तरी त्याचे इतिवृत्त पुढील बैठकीत मंजूर न झाल्याने या निर्णयाला अंतिम स्वरूप मिळाले नाही. कसोटी सामने वगळता वन डे, ट्‌वेंटी-ट्‌वेंटीसह आयपीएल सामन्यांवर कर लावण्याचा महसूल विभागाचा प्रस्ताव होता. मुंबई महापालिका क्षेत्रातील सामन्यास 25 टक्के, राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रात 20 टक्के आणि अन्य विभागात 15 टक्के अशा प्रकारे करआकारणीचा प्रस्ताव आहे.

आयपीएलवर राज्य सरकार कधी कर लावणार, अशी विचारणा सातत्याने विविध स्तरावरून होत होती. करआकारणीच्या प्रस्तावाचे इतिवृत्त मंजूर न करता तो थांबवून ठेवण्याचा प्रकार क्वचितच होतो. सरकारने निर्णय घेण्यास विलंब लावल्याने आयपीएल सामन्यांवर मनोरंजन कर लागू शकला नाही व त्याचा लाभ प्रेक्षकांना मिळाला. कर हा पूर्वलक्षी प्रभावाने आकारता येऊ शकत नाही. मनोरंजन कर हा प्रत्येक तिकिटामागे प्रेक्षकांकडून वसूल केला जातो. त्यामुळे आयपीएलचे सामने संपल्याने आता त्यावर करआकारणी करता येणार नाही, पुढील वर्षीसाठी विचार होऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. पण आयपीएल पार पडले तरी मंत्रिमंडळापुढील प्रस्ताव तसाच अनिर्णीत अवस्थेत राहणार का? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment