Wednesday, April 28, 2010

ऋषिकेशला हवा मदतीचा हात

गडहिंग्लज - मुलांच्या शस्त्रक्रियेला पैसे आणायचे कोठून या चिंतेतून एका महिलेने आपल्या दोन मुलीसह हिरण्यकेशी नदीत उडी मारून काल सायंकाळी चार वाजता आत्महत्या केली. सौ. अलका रवींद्र सावंत (वय 37), मुलगी रोहिणी ( 16) व स्नेहल (14) अशी त्यांची नावे आहेत. हे सर्वजण मांगनूर तर्फ सावतवाडीचे (ता. गडहिंग्लज) आहेत. पोहता येत असल्याने या महिलेचा ऋषिकेश (वय 11) नावाचा मुलगा सुदैवाने बचावला.

ऋषिकेशला हवा मदतीचा हातऋषिकेश आणि रोहिणीसाठी त्यांच्या शिप्पूरच्या नातेवाइकांनी मोठी रक्कम खर्च केल्याचे सांगण्यात येते. तरीसुद्धा त्यांची त्या आजारातून सुटका झालेली नव्हती. यामुळे अलका सतत पैशाच्या चिंतेत होत्या. आता ऋषिकेशवरचे आई, बहिणींचे छत्रही हरपले. वडिलांचा संपर्क नाही. यामुळे त्याला आधाराची आणि हृदयशस्त्रक्रियेसाठी दानशूर व्यक्ती आणि संस्थांकडून आर्थिक मदतीची गरज आहे.

मदतीसाठी संपर्क  - webeditor@esakal.com 

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली व ऋषिकेशने सांगितलेली माहिती अशी - अलका यांचे माहेर शिप्पूर तर्फ नेसरी (ता. गडहिंग्लज) आहे. सहा वर्षांपासून त्या माहेरीच असतात. काल सकाळी गडहिंग्लजला जाऊन येऊ, असे सांगून त्या रोहिणी, स्नेहल आणि ऋषिकेशसह एसटीने गडहिंग्लजला आल्या. बसस्थानकावर द्राक्षे आणि भजी बांधून घेऊन हे सर्वजण भडगावकडे चालत गेले. हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलाजवळच्या शेतीवडीतून सर्वजण नदीकाठावर गेले. तेथे बसून द्राक्षे आणि भजी खाल्ले. त्यानंतर 'तुमच्या ऑपरेशनसाठी पैसे नाहीत. इतके पैसे कोठून आणायचे, यामुळे आपण नदीत जीव देऊ,' असे त्यांनी मुलांना सांगितले आणि सर्वांना बरोबर घेऊन नदीपात्रात उडी घेतली. रोहिणी आणि स्नेहल यांनी आईला मिठी मारली होती. त्यामुळे तिघीही बुडाल्या. ऋषिकेशला पोहता येत असल्याने तो पोहत काठावर आला. तिघीनांही बुडत असल्याचे पाहून तो ओरडतच रस्त्यावर आला. तेथील नागरिकांनी ही घटना पोलिसांना कळविली. भडगाव व गडहिंग्लजच्या नागरिकांनी पुलावर गर्दी केली. पोलिस निरीक्षक आर. टी. जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. संजय येडूरकर, महादेव कोकणे, भीमा भोई, नागोजी भोई यांनी नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर येथील उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.

अठरा वर्षांपूर्वी अलका व रवींद्र यांचे लग्न झाले. रवींद्रला दारूचे व्यसन आहे. यामुळे कुटुंबात सतत भांडण होत असे. याला कंटाळून अलका आपल्या मुलांसह माहेरी आल्या होत्या. रवींद्र इचलकरंजीत यंत्रमागावर काम करतो. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्याचाही संपर्क नसल्याचे शिप्पूरच्या नातेवाइकांकडून सांगितले जाते. इचलकरंजीत असताना मोठी मुलगी रोहिणीचे कान हातमागामध्ये सापडून तुटले होते. त्यावेळी डॉक्‍टरांनी ते कान नंतर शस्त्रक्रियेने जोडता यावे म्हणून तात्पुरते तिच्याच पोटाला बसविले होते. दरम्यानच्या काळात रोहिणीला अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर काही वर्षांनी ऋषिकेशलाही हृदयविकार असल्याचे तपासणीत आढळून आले. त्याची हृदयशस्त्रक्रियाही झाली होती. परंतु सहा महिन्यांनंतर त्याच्या हृदयात पुन्हा दोष असल्याचे आढळले. डॉक्‍टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला होता. अलका कोवाडच्या आश्रमशाळेतील मुलांना जेवण करून देण्याचे काम करत होत्या. याच शाळेत ऋषिकेश पाचवीत व स्नेहल सातवीत होते. हे तिघेही कोवाडमध्ये, तर रोहिणी शिप्पूरमधील आजी यशोदा जाधव यांच्याजवळ राहात होती. तिचे नववीपर्यंत शिक्षण झाले आहे. अलका यांचा एक भाऊ सैन्य दलात, तर एक मुंबईत नोकरीनिमित्त राहतो. चार दिवसांपूर्वी सुटी पडल्याने अलका, स्नेहल व ऋषिकेश तिघेही कोवाडहून शिप्पूरला आले होते. रोहिणी व ऋषिकेशच्या आजारावर उपचारासाठी इतकी मोठी रक्कम आणायची कोठून या चिंतेनेच अलकाने मुलासह आत्महत्येचा निर्णय घेतला.

* आई, जीव द्यायला नकोशस्त्रक्रियेला पैसे नसल्याने आपण सर्व जण जीव देऊ या, असे अलकानी मुलांना सांगितल्यानंतर ऋषिकेश "आई, जीव द्यायला नको,' असे सांगत होता. परंतु पैशाच्या चिंतेने आणि गरिबीला कंटाळलेल्या अलकाने त्याचे न ऐकता त्यालाही सोबत घेऊनच नदीपात्रात उडी घेतली. पोहता येत असल्याने ऋषिकेश बाहेर आला. घट्ट मिठी असल्याने तिघीही बुडाल्या.

* मृतदेहासाठी हवालदार पाण्याततिघींचा मृतदेह शोधासाठी पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण केले. परंतु एका मुलीचा मृतदेह लवकर सापडत नव्हता. यामुळे शेजारीच असलेले हवालदार गणेश मिरखा यांनी कशाचाही विचार न करता तातडीने पाण्यात उतरून शोधकाम सुरू केले. त्यांनी त्या मुलीचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेतून पोलिसांमधील माणुसकी अजूनही जिवंत आहे हेच श्री. मिरखा यांनी दाखवून दिले.

मदतीसाठी आमचा पत्ता - webeditor@esakal.com



No comments:

Post a Comment