Wednesday, April 28, 2010

प्रभा राव अल्पचरित्र

कॉंग्रेसमधील धाडसी व वादळी व्यक्तिमत्त्व - संसदीय राजकारणात महिलांना संधी मिळाली पाहिजे, म्हणून आता महिला आरक्षणाची चर्चा होत आहे; परंतु तीस-चाळीस वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या काही थोड्या-थोडक्‍या महिला पुढे आल्या, त्यात प्रभा राव यांचे नाव नेहमीच आघाडीवर राहिले. कॉंग्रेसमध्ये त्यांच्या नेतृत्वगुणाला सातत्याने वाव मिळत राहिला. इंदिरा गांधींपासून राजीव गांधी व आता सोनिया गांधी यांच्यापर्यंत प्रभा राव यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. पक्षाने त्यांच्यावर ज्या जबाबदाऱ्या टाकल्या त्या त्यांनी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडल्या. आपल्या स्वतःच्या खास शैलीने काम करताना त्यांनी पक्षाच्या भूमिकेला किंवा विचारसरणीला धक्का बसेल असे वर्तन त्यांनी सहसा कधी केले नाही. त्यांच्या करड्या शिस्तीमुळे पक्षात अनेक जण दुखावले गेले; परंतु त्याची त्यांनी फारशी कधी फिकीर केली नाही.

वर्धा जिल्ह्यातील रोहनी या गावात स्वातंत्र्यसैनिकांच्या वसु कुटुंबात प्रभा राव यांचा जन्म झाला. त्यांच्या वसु कुटुंबावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. राज्यशास्त्रात त्या एम. ए. झाल्या होत्या. शास्त्रीय संगीतातील पदवी त्यांनी प्राप्त केली होती. विधानसभेत त्यांनी पुलगाव मतदारसंघाचे व लोकसभेत वर्धा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. 1972 ते 1976, 1976 ते 1977-78 आणि 1988 ते 1990 या कालावधीत चार वेळा त्या मंत्री होत्या. महसूल, शिक्षण, नियोजन, उद्योग, सांस्कृतिक, पर्यटन, क्रीडा व युवक कल्याण अशी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली. 1978-79 मध्ये विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाचीही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. मंत्री म्हणून काम करताना त्यांनी आपली निर्णयक्षमताही सिद्ध करून दाखविली. त्यामुळे पुढे त्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून नाव घेतले जायचे. त्यांचीही तशी महत्त्वाकांक्षा होती; परंतु तशी संधी त्यांना मिळू शकली नाही.

सरकारमधील मंत्री म्हणून प्रभा राव यांनी ज्या तडफेने काम केले, त्याच तडफेने त्यांनी पक्षातही विविध पदे भूषविली. 1984 मध्ये महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी त्यांची पहिल्यांदा निवड झाली. त्यांच्या निवडीनेच मोठे वादळ निर्माण झाले. आपल्याला विश्‍वासात न घेता प्रदेशाध्यक्षाची निवड केल्याचा निषेध म्हणून वसंतदादा पाटील यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. दिल्लीच्या अनेक बड्या नेत्यांनी मुंबईत येऊन दादांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला नाही. श्रीमती राव यांनी त्या वेळी पाच वर्षे अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर त्यांनी दिल्लीच्या राजकारणात प्रवेश केला. अखिल भारतीय कॉंग्रेसच्या सरचिटणीस म्हणून त्यांनी बरीच वर्षे कार्य केले. त्या काळात त्यांच्यावर दिल्ली, गोवा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, पश्‍चिम बंगाल, हरियाना, केरळ, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक राज्यांची जबाबदारी देण्यात आली होती.

कॉंग्रेसला बरे दिवस आल्यानंतर 2004 मध्ये प्रभा राव यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात पाठविण्यात आले. तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे व प्रभा राव यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका लढल्या गेल्या. त्यानंतर मुख्यमंत्रिपदी विलासराव देशमुख आले. देशमुख व राव यांचे कधी फारसे पटले नाही. त्यावेळच्या राज्याच्या प्रभारी मार्गारेट अल्वा यांच्याशी त्यांचा चांगला सूर जमला होता. त्यांच्याच काळात नारायण राणे व त्यांचे आठ-दहा समर्थक आमदार कॉंग्रेसमध्ये आले. प्रभा राव यांचा अध्यक्ष म्हणून पक्षात मोठा दरारा होता. त्यांना पदाधिकाऱ्यांनी अघळपघळ वागलेले खपत नव्हते. त्यांच्या करड्या शिस्तीमुळे अनेक ज्येष्ठ पदाधिकारीही पूर्वपरवानगी न घेता त्यांच्यासमोर जायला कचरत असत. पक्षाच्या व्यासपीठावर कुणी मंत्री असला, तरी त्यांच्या परवानगीशिवाय कुणाचे बोलण्याचे धाडस होत नसे. एखादा निर्णय घेताना त्या कधी डगमगणार नाहीत, स्पष्टवक्तेपणा आणि परिणामांची पर्वा न करता निर्णय घेणे, अशी त्यांची कार्यशैली होती. पक्षश्रेष्ठींना नेमके काय हवे याचा अचूक अंदाज घेत, त्या अनेक धाडसी निर्णय घेत असत. त्यामुळे पक्षात कुणी दुखावले वा नाराज झाले, तर त्याची त्या पर्वा करीत नसत. आपल्याच सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढणारे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सेझ प्रकल्पांचे परिणाम, कुपोषण, विजेची समस्या अशा प्रश्‍नांवर अहवाल तयार करून त्यांनी खळबळ उडवून दिली होती. 2008 मध्ये त्यांची हिमाचलच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. त्या वेळी पक्षाच्या वतीने इस्लाम जिमखान्यात त्यांचा सत्कार करण्यात आला. त्या वेळी त्यांनी व्यासपीठावर उपस्थित असलेले मुख्यमंत्री विलासराव देशमुख व महसूलमंत्री नारायण राणे यांना जवळ बोलाविले, एकमेकांच्या हातात हात दिले आणि यापुढे एकोप्याने काम करा, असा सल्ला दिला. त्या वेळी उपस्थित कॉंग्रेसजन भारावून गेले होते.



No comments:

Post a Comment