Tuesday, April 6, 2010

नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह जानेवारीतच गाडले

मुंबई - कसाबसोबत मुंबईवर हल्ला केलेल्या नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह जानेवारी महिन्यातच महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकण्यात आले असल्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधान परिषदेत केली. पाकिस्तानने महाराष्ट्राच्या भूमीवर अतिरेकी कारवायांचा प्रयत्न केला तर अतिरेक्‍यांना महाराष्ट्राबाहेर जाऊ न देता येथेच गाडले जाईल, असा इशारा त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दिला. आपल्या खात्यात कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर पदावर राहणार नाही. आपल्याला गृहमंत्रिपदाचा मोह नाही, असे त्यांनी आपल्या घणाघाती भाषणात स्पष्ट केले.

पुण्यातील जर्मन बेकरी प्रकरणातील आरोपी कोण याची ओळख आम्हाला पटली असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेवर उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, ""अतिरेक्‍यांचे मृतदेह सांभाळण्यासाठी व कसाबसाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते अशी आमच्यावर टीका होते, पण या नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह कोणताही अवमान होऊ न देता जानेवारीतच गाडून टाकण्यात आले आहेत. सुमारे 40 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे हे काम केले व अजूनपर्यंत प्रसिद्धिमाध्यमांना त्याचा पत्ता लागू दिला नाही. पोलिस एखादी गोष्ट गुप्त ठेवतात का, हे मला तपासून पाहायचे होते. ज्या वेळी पत्रकार शवागाराच्या ठिकाणी माहिती घ्यायला जात, त्या वेळी त्याबाहेरील लाल दिवा चालू ठेवला जात असे.''

पाकिस्तानचा पैसा, शस्त्रे व अन्य मदत घेऊन महाराष्ट्राची परीक्षा घेण्याचे काम अतिरेक्‍यांनी करू नये. आपल्या कारवायांत काही प्रमाणात त्यांना यश मिळाले तरी त्यांना येथेच गाडले जाईल, असा इशारा गृहमंत्र्यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना दिला. कसाबबाबतही न्यायालयाचा निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे येईल. पुण्यातील जर्मन बेकरीबाबत केंद्रीय गुप्तचर विभागांनी ऍलर्ट दिला नव्हता. लाल देऊळ व छावड हाऊस याबाबत इशारा होता व तेथील सुरक्षा वाढविली होती. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असे सांगून गृहमंत्री म्हणाले, केंद्रीय संस्थांनी ऍलर्ट दिला, म्हणजे त्यांची जबाबदारी संपली काय? अतिरेकी समुद्र मार्गाने येणार असतील, तर नौदल, तटरक्षक दलाची जबबादारी आहे. हवाई मार्गाने आले, तर हवाई दलाची आणि अन्य मार्गांनी आले तर सीमा सुरक्षा दलाची. अतिरेक्‍यांचा मुकाबला कायदा व सुव्यवस्थेसाठी असलेल्या पोलिसांनी करण्याची अपेक्षा कशी ठेवायची? केंद्राच्या ऍलर्टबाबत गृह सचिवांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment