Tuesday, April 6, 2010

गोकुळाष्टमी


गोकुळाष्टमी :
श्रावणातील कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण जन्माचा उत्सव करून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. मध्यरात्री श्रीकृष्णजन्माचे स्मरण करून, एकत्र येऊन उपवास करून भाविक हा दिवस साजरा करतात.  दुसर्‍या दिवशी ठिकठिकाणी उंचावर मडक्यात दही ठेवून, मडके दोरीने उंचावर बांधतात. तरुणांनी एकमेकांच्या आधाराने मानवी मनोरा करून ते मडके (हंडी) फोडण्याची एक प्रथा आहे. त्याला ‘दहीहंडी’ म्हणतात. अलीकडे ‘दहिहंडी’ हा एक `आंतरराष्ट्रीय इव्हेंट' बनला आहे. मानवी मनोरा करणारे, हंडी फोडणारे ‘गोविंदा’ यांची फार चढाओढ सुरू झाली आहे. हौस, दंगा, आनंदोत्सव याबरोबरच त्याला स्पर्धा, प्रसिद्धी, प्रायोजक या माध्यमांतून व्यवसायाचे रूपही येऊ लागले आहे. तरुणांची संघटित शक्ती ही या उत्सवाची प्रमुख जमेची बाजू आहे. मुंबई हे या उत्सवाचे मोठे, प्रमुख केंद्र होय.

श्रीकृष्ण म्हणजे खट्याळ, खोडकर, दही-दूध-लोणी चोरून खाणारा अशी त्याची प्रतिमा पिढ्या-न-पिढ्या सांगितली जाते. अनेक गाणी-गोष्टी त्याच्या या लीलांवरच रचलेल्या आहेत. श्रीकृष्णाने त्याच्या सवंगड्यांसह, मनोरे करून दही-दूध-लोण्याच्या हंड्या फोडल्याच्या कथा प्रचलित आहेत. अशा श्रीकृष्णाची-दुष्टांचा संहार करणार्‍या श्रीकृष्णाची-आठवण करण्याचा हा दिवस. काही कथांमुळे श्रीकृष्णाची प्रतिमा लहानपणापासून प्रत्येकाच्या मनात तयार होते. तरुणांनी चपळाईने, संघटितपणे उंचावरचे दही खाली काढण्याच्या निमित्ताने साहसी वृत्ती जागवावी अशाही पद्धतीने या उत्सवाकडे पाहिले जाते.

गायी-वासरे चरण्यासाठी रानात आणि पाण्यासाठी यमुनेच्या तीरावर घेऊन जाणारे सर्व गो-पालक आपापले खाद्यपदार्थ एकत्र करून मजेत खात असावेत अशी कल्पना केली जाते.  हाच गोपाळकाला होय. `गोकुळअष्टमी' च्या दिवशीच संध्याकाळी मंदिरांत काल्याचे कीर्तन असते. नंतर प्रसाद म्हणून पोहे-काकडी-डाळ-दाणे-चुरमुरे असे एकत्र करून प्रसाद म्हणून वाटले जाते. प्रत्येकाने एक एक पदार्थ नेऊन, सर्वांचे पदार्थ एकत्र करून अनेक ठिकाणी रात्रभर भजन करण्याचीही प्रथा आहे. गोपाळकाला करून हा प्रसाद सर्वांना दिला जातो.

गोकुळाष्टमीची महिमा 
दर वर्षी आपण गोकुळाष्टमीला कृष्णजन्म उत्याहाने साजरा करतो. श्रीकृष्ण हा वेगवेगळ्या कारणांनी सगळ्यांनाच खूप आवडणारा, अगदी आपलासा वाटणारा देव आहे. तसा तो भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे. मत्स्य, कूर्म व वराह या पशूंच्या रूपातील पहिल्या तीन अवतारांबद्दल कोणाला फारसे कांही ठाऊक नसते. नृसिंह आणि वामनावतार थोड्या वेळेपुरते प्रकट झाले आणि कार्यभाग संपताच ते अदृष्य होऊन गेले. सांगता येण्यासारखे असे त्यांचे चरित्र नाही. परशुराम आपल्या जमदग्नी या पित्यासारखाच शीघ्रकोपी म्हणून प्रसिद्ध झालेला असल्यामुळे त्याच्याबद्दल प्रेमाहून भीतीच जास्त वाटते. राम अवतार सर्वगुणसंपन्न आणि आदर्श असे व्यक्तीमत्व आहे. त्याचे संपूर्ण चरित्र हा आदर्श वर्तनाचा वस्तुपाठ आहे. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागण्याचा प्रयत्न करावा असे वाटते, पण सर्वसामान्य माणसाला ते जमणे कठीण आहे. गोपालकृष्ण मात्र आपल्यासारखा वाटतो. त्याच्या लडिवाळ बाललीला, मस्करी, वात्रटपणा, सवंगड्याबरोबर खेळ खेळणे, गोपिकांबरोबर रास रचणे, पांडवांना समजुतीच्या गोष्टींचे सल्ले देणे हे सगळे मानवी वाटते.


कृष्ण हा विविध वयोगटातल्या आणि मनोवृत्तीच्या लोकांना आवडतो कारण इतक्या वैविध्यपूर्ण घटना त्याच्या चरित्रात आहेत. व्यासमहर्षींनी ते फारच कौशल्याने रंगवलेले आहे. मानवी स्वभावाचे दर्शन आणि चमत्कार यांचे एक अजब मिश्रण त्यात आहे. त्याच्या जन्माची कथा अद्भुतरम्य आहे. कंसाचे निर्दाळण करण्यासाठी त्याचा शत्रु देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे अशी पूर्वसूचना त्याला मिळते आणि त्याचा जन्मच होऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न तो करतो. त्या सर्वांवर मात करून कृष्ण जन्म होतोच. त्या नवजात शिशूचा जीव वाचवण्यासाठी त्याचा पिता जे प्रयत्न करतो त्याला सर्वोपरीने सहाय्य मिळत जाते. त्याच्या हातापायातील शृंखला गळून पडतात, कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडतात, रखवालदार गाढ झोपी जातात, मुसळधार पावसातून वाटचाल करत असतांना प्रत्यक्ष शेषनाग आपल्या फण्याचे छत्र त्याच्या माथ्यावर धरतो. दुथडीने वाहणारे यमुना नदीचे पाणी ओसरून त्याला पलीकडे जायला वाट करून देते. गोकुळात गेल्यावर नंद यशोदा निद्रितावस्थेत असतात, पण त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असतो. अशा प्रकारे सर्व अडचणी एक एक करून दूर होत जातात आणि बाल श्रीकृष्ण सुखरूपपणे गोकुळात जाऊन पोचतात. ही कथा किती सुरस आहे पहा! देव आहे म्हणून तो एकदम वसुदेव देवकींना त्यांच्या त्रासातून मुक्त करत नाही की इकडे अदृष्य होऊन तिकडे प्रगट होत नाही.
त्यानंतरसुद्धा आपला शत्रु जन्माला आला आहे आणि गोकुळामध्ये तो वाढतो आहे याची जाणीव कंसाला होते आणि त्या मुलाला मारून टाकण्याचे अनेक उपायसुद्धा तो करतो, पण ते सफळ होत नाहीत. यातसुद्धा कृष्णाला मारायला आलेल्या दुष्टांना तो कोठल्याही शस्त्राने न मारता त्यांचाच डाव त्यांच्या अंगावर उलटवतो. त्याला आपले विषारी दूध पाजून मारायला आलेल्या पूतनामावशीचे दूध पितापिताच तो तिचे प्राण शोषून घेतो तर पाण्यात पडलेला चेंडू आणायचे निमित्य करून यमुनेच्या डोहात मुक्काम करून बसलेल्या कालिया नागाच्या फण्यावर नाचून त्याला चेचून काढतो आणि तिथून निघून जायला भाग पाडतो. अखेरीस कंस त्याला मुष्टीयुद्धाच्या खेळात भाग घेण्याचे आमंत्रण देतो. "मर्दका बच्चा होगे तो खुलकर सामने आ।" वगैरे संवाद हल्लीच्य़ा हिंदी सिनेमात असतात तशा प्रकारे दिलेले हे आव्हान स्वीकारून कृष्ण मल्लयुद्धाच्या आखाड्यात उतरतो. डब्ल्यू डब्ल्यू एफ् सारख्या या फ्रीस्टाईल कुस्त्यांना त्या काळात पंच नसत. प्रतिस्पर्ध्याने हार कबूल करेपर्यंत त्याला झोडत रहायचे असाच नियम होता. त्यात कृष्णाचा जीव जाईपर्यंत त्याला झोडपायचा आदेश कंसाने आपल्या आडदांड मल्लांना दिला होता. इथेही तशाच प्रकाराने कृष्णाने त्यांनाच लोळवले. इतकेच नव्हे तर कंसालाही ललकारून त्याचा जीव घेतला. या सगळ्या प्रकारात एक गोष्ट दाखवली आहे. ती म्हणजे गैरमार्गाने मिळवलेल्या राज्यसत्तेचा सुखासुखी उपभोग कंसाला घेता येत नाही. त्याच्या डोक्यावर असुरक्षिततेची तलवार सतत टांगती राहिलेली असते आणि अशाच अवस्थेत त्याचा अंत होतो.
असा प्रकाराने दुष्ट कंसाचा नाश केल्यानंतर कृष्णाने त्याच्या डोक्यावरील राजमुकुट स्वतः धारण केला नाही. उग्रसेन राजाला पुन्हा राजपद दिले आणि विधीवत शिक्षण घेण्यासाठी तो सांदीपनी मुनींच्या आश्रमात चालला गेला. शिक्षण संपवून परत आल्यानंतरसुद्धा त्याने आपल्या सामर्थ्याच्या बळावर मोठा सम्राट बनण्याची महत्वाकांक्षा धरली नाही. वारंवार होणा-या लढायंच्या धुमश्चक्रीमुळे त्रस्त झालेल्या यादवांना सोबत घेऊन त्याने मथुरासुद्धा सोडली आणि दूर सौराष्ट्राच्या समुद्रकिना-यावर द्वारका नगरी वसवून तिथे स्थाईक झाला. मात्र यादवांना स्थैर्य मिळवून दिल्यावर तो हस्तिनापूरच्या राजकारणात लक्ष घालायला लागला. पांडवांना त्याने हर त-हेने मदत केली. पण कौरवांबरोबरसुद्धा चांगले संबंध राखले. पांडव व कौरवांमधील युद्ध टाळण्यासाठी शिष्टाईचा प्रयत्न केला. अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले.
युद्ध अटळ झाल्यावर "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार।" असे म्हणत तो वरवर तटस्थ राहिला. सुदर्शनचक्र हातात घेऊन प्रत्यक्ष युद्धात उतरला नाही. फक्त अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले. द्वारकेच्या राण्याने आजच्या भाषेत ड्रायव्हर किंवा शोफर होण्यात त्याला कसलीही अप्रतिष्ठा वाटली नाही. ते काम करता करता त्याने युक्तीच्या ज्या चार गोष्टी सांगितल्या त्याला तोड नाही. भीष्मपितामह, गुरु द्रोणाचार्य, कर्ण व दुर्योधन या कौरवांच्या सेनापतींचे कच्चे दुवे नेमके ओळखून त्यांचा पाडाव करण्याच्या युक्त्या श्रीकृष्णाने सांगितल्याच. युद्धाच्या सुरुवातीलाच "सीदंति मम गात्राणि मुखंचपरिशुष्यते। " असे म्हणून शस्त्र टाकून बसलेल्या अर्जुनाला "कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। " हा भगवद्गीतेचा उपदेश करून युद्ध करण्यास प्रवृत्त केले. हा उपदेश आजतागायत संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करत आला आहे.
असा हा चतुरस्र श्रीकृष्ण! दहीदूध चोरण्याचा खट्याळपणा करणारा म्हणून मुलांना प्रिय, गोपिकांची छेड काढणारा आमि त्यांच्याबरोबर रासक्रीडा करणारा म्हणून युवकांना आवडणारा, रुक्मिणीहरण करून प्रेमीजनांना आधार देणारा आणि भगवद्गीता सांगणारा विद्वज्जनांचा योगेश्वर! त्याच्या आयुष्यातील कथा अत्यंत सुरस आणि मनोरंजक तशाच बोधप्रद आहेत व त्यामुळे त्या सर्वांना सांगायला तसेच ऐकायला खूप आवडतात. म्हणूनच त्याची जयंती इतक्या उल्हासाने साजरी केली जाते.

No comments:

Post a Comment