Wednesday, May 5, 2010

वसंतदादा बॅंकेचा घडा भरला

सांगली - येथील वसंतदादा शेतकरी बॅंकेची अखेरची घरघर सुरू झाली आहे. बॅंकेचा प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी अवसायक मंडळाने दहा शाखा बंद करून त्यांचे कामकाज जवळच्या शाखेत स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या ठेवीदारांनी विमा क्‍लेम अद्याप घेतलेला नाही, त्यांनी 31 पर्यंत घ्यावा, असे आवाहन अवसायक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव पाटील यांनी केले आहे.

साखर कारखाने, बॅंक आदी विविध संस्थांमुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळाली. त्यात वसंतदादा शेतकरी सहकारी बॅंकेची भूमिका महत्त्वाची होती; मात्र दहा वर्षांतील संचालक मंडळाचा मनमानी कारभार, कमी तारणावर जादा दिलेली कर्जे यांमुळे ही बॅंक अडचणीत आली. दीड वर्षापूर्वी रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेचा परवाना रद्द केला. बॅंक अवसायनात काढून अवसायक मंडळाची नियुक्त केली. पहिल्या टप्प्यात एक लाखापर्यंतचा विमा क्‍लेम असलेल्या ठेवीदारांना ठेवीचे वाटप करण्यात आले. काही कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती योजनेतून कमी केले. अनेक कर्मचाऱ्यांना भविष्यनिर्वाह निधीची रक्कम अद्याप मिळालेली नाही.

अवसायक मंडळाने आता दुसऱ्या टप्प्यात प्रशासकीय खर्च कमी करण्यासाठी बॅंकेच्या शाखा कमी करण्यास सुरवात केली आहे. चांदणी चौक व टिंबर एरिया शाखा बॅंकेच्या मार्केट यार्डातील मुख्य शाखेत स्थलांतरित करण्यात येणार आहेत. माधवनगर व बुधगाव शाखेचे साखर कारखाना शाखेत, विश्रामबाग शाखेचे सांगली-मिरज रोड शाखेत, फळ मार्केट शाखेचे गावभाग शाखेत, सांगलीवाडी शाखेचे सराफकट्टा शाखेत, मिरजेतील स्टेशन रोड शाखेचे लक्ष्मी मार्केट शाखेत, गडहिंग्लजचे कोल्हापूर व शिराळा शाखेचे इस्लामपूर शाखेत स्थलांतर होणार आहे. स्थलांतरित शाखांत 1 जूनपासून कामकाज सुरू होणार आहे.

विमा क्‍लेम योजनेअंतर्गत ठेवीदारांना एक लाख रुपयांपर्यंतच्या ठेवी मंजूर झाल्या आहेत. अनेक ठेवीदारांनी या रकमा काढून घेतल्या आहेत. ज्या ठेवीदारांनी रकमा अद्याप घेतलेल्या नाहीत, त्यांनी 31 मेपर्यंत काढून घाव्यात, असे आवाहन अवसायक मंडळाचे अध्यक्ष वसंत पाटील यांनी केले आहे. 



No comments:

Post a Comment