Saturday, April 3, 2010

शिवसेना भव्यपणे साजरा करणार महाराष्ट्र दिन

मुंबई -  संयुक्त महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवाचा सोहळा शिवसेना भव्यदिव्य स्वरूपात, तसेच जल्लोषात साजरा करणार असल्याची घोषणा शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज केली. सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने 25 एप्रिल रोजी शिवसेनेच्या वतीने "रक्तदान महायज्ञ' आयोजित करण्यात येणार असून, 1 मे रोजी "गर्जा जयजयकार' या अनोख्या संगीतमय कार्यक्रमाने महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात राजकारण न आणता सर्व राजकीय पक्षांनी व महाराष्ट्रप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

उद्धव ठाकरे यांनी सांगितले, की 1 मे रोजी सायंकाळी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्‍सच्या मैदानात "गर्जा जयजयकार' हा कार्यक्रम होईल. त्याचे प्रमुख आकर्षण असतील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर. अनेक वर्षांनंतर लतादीदी रंगमंचावर गाताना पाहण्याचा व ऐकण्याचा सुवर्णयोग रसिकांना या कार्यक्रमातून अनुभवता येईल. लतादींदीसमवेत उषा मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर हेही या कार्यक्रमात सहभागी होतील. फटाक्‍यांच्या आतषबाजीत व तुफान जल्लोषात हा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश शिवाजी पार्कवर जेव्हा आणण्यात आला, तेव्हा त्या समारंभात लता मंगेशकर यांनी गायलेले "बहु असोत सुंदर संपन्न की महा' हे महाराष्ट्र गीत यंदा पुन्हा एकदा त्या सादर करणार आहेत.

याच सोहळ्याचा एक भाग म्हणून 30 एप्रिल रोजी हुतात्मा चौकात शिवसेनेच्या वतीने दीपमाला लावण्यात येणार आहेत. "मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' या मागणीसाठी रक्त सांडणाऱ्या मराठी माणसांच्या हौतात्म्याचा आदर राखण्यासाठी व अखंड महाराष्ट्राचे वैभव जतन करण्याच्या दृष्टीने 25 एप्रिल रोजी गोरेगाव पूर्व येथील एनएसई संकुलात "रक्तदान महायज्ञ' आयोजित करण्यात आला आहे.

उद्धव यांची "राज'कीय टोलेबाजी!शिवसेनेची धार अद्याप बोथट झाली नाही, पण ज्या पक्षांची धार बोथट झाली आहे, त्यांना धार कोण काढणार, असा उपरोधिक सवाल या वेळी उद्धव ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, की बेळगाव-कारवार सीमा भागातील मराठी बांधवांसाठी शिवसेना लढत आहे, पण दुसऱ्या कोणाला त्यांच्यासाठी लढा द्यावा असे वाटत नाही. येथील मराठी माणसांसाठी लढणाऱ्यांच्या कानावर तेथील मराठी बांधवांचा आकांत येत नाही काय, असा खोचक प्रश्‍न राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी विचारला. शिवाजी पार्कवर शिवाजी महाराजांच्या जीवनप्रसंगांची दोन म्युरल्स उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पांना विरोध करणाऱ्या शिवद्वेष्ट्यांचा विरोध आम्ही मोडून काढू, असा इशाराही त्यांनी मनसेचे नाव न घेता दिला.

No comments:

Post a Comment