Saturday, April 3, 2010

"सोनी'च्या "करोडपती'चे सूत्रसंचालन आमीरकडे?

मुंबई -  छोट्या पडद्यावर एक इतिहास रचणाऱ्या आणि उत्पन्नाच्या बाबतीत विक्रम प्रस्थापित करणाऱ्या "कौन बनेगा करोडपती' (केबीसी) या कार्यक्रमाचे पुनरागमन होत आहे. मात्र या वेळी हा कार्यक्रम "सोनी टीव्ही'वर दाखवला जाण्याची दाट शक्‍यता आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत "परफेक्‍शनिस्ट' म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या आमीर खानने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करावे, यासाठी "सोनी' आणि त्याच्यामध्ये बोलणी सुरू आहेत. आमीरने अद्याप होकार किंवा नकार दिला नसल्याचे समजते.

परदेशात लोकप्रिय ठरलेल्या "हू वॉण्टस्‌ टू बी मिलेनियर' या कार्यक्रमावर बेतलेला "कौन बनेगा करोडपती' नावाचा कार्यक्रम "स्टार प्लस' वाहिनीने आणला होता. त्याचे सूत्रसंचालन विख्यात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केले होते. या कार्यक्रमामुळे केवळ वाहिनीलाच नाही तर खुद्द अमिताभ यांनाही चांगलाच फायदा झाला होता. त्यासाठी अमिताभ यांना काही कोटी रुपये मोजण्यात आले होते. त्या वेळी त्यांचे "लॉक कर दिया जाये...', "क्‍या नऊ बज गये क्‍या' यांसारखे संवादही लोकप्रिय ठरले होते. अमिताभ यांनी पहिल्या अन्‌ दुसऱ्या भागाचे सूत्रसंचालन केले होते. त्यानंतर तिसऱ्या भागासाठी अमिताभ यांनी नकार दिल्याने शाहरूख खानकडे ही जबाबदारी टाकण्यात आली होती. त्याने आपल्या पद्धतीने हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्याचा प्रयत्न केला होता; परंतु पहिल्या भागाची सर काही त्याला आली नाही. आता "केबीसी'चा चौथा भाग आणण्याचा घाट रचण्यात आलेला आहे. त्याबाबतची बोलणी सुरू आहेत. मात्र सूत्रसंचालन कोणी करावे, असा प्रश्‍न उपस्थित होताच अमिताभ आणि शाहरूख यांच्या नावाऐवजी आमीर खानचे नाव पुढे आले आहे. कारण अमिताभ यांनी हा कार्यक्रम आता करण्यास प्रकृतिअस्वास्थ्यामुळे नकार दिला आहे. शाहरूखने "केबीसी'च्या चौथ्या सत्रात काम करण्यास नकार दिल्याने "सिनर्जी ऍडलॅब्स' या प्रॉडक्‍शन हाऊसला "पाचवी पास' कार्यक्रम आणावा लागला होता आणि शाहरूखबरोबर आपला झालेला करार पूर्ण करावा लागला होता; परंतु आताचे चित्र निराळे आहे. आता केबीसी "स्टार'वर नाही, तर सोनी टीव्हीवर येण्याची शक्‍यता आहे.

No comments:

Post a Comment