Friday, April 2, 2010

चैत्रगौर


चैत्रगौर :

ऋतूप्रमाणे सुरू झालेल्या उत्सवात चैत्रगौर हा एक उत्सव. शंकर-पार्वती या देवतांची एक जुनी गोष्ट यासोबत जोडलेली आहे. चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत घरातील देवघरात गौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा केली जाते. वसंत ऋतू म्हणजे झाडांना पालवी फुटण्याची, कैर्‍या येण्याची सुरुवात, आणि हरभरा तयार होऊ लागलेला असा हा काळ. म्हणून कैरी घालून, हरभर्‍याची डाळ भिजवून, ती वाटून केलेला खमंग पदार्थ, साखर-खोबरे, कैरीचे पन्हे असे पदार्थ या निमित्ताने करण्याची, आणि घरात स्त्रियांना बोलवून त्यांना हळदी-कुंकू लावून ते खायला देण्याची जुनी पद्धत आहे. स्त्रियांना एकत्र येण्यासाठी काही उत्सव सुरू झालेत आणि अजूनही ते घराघरात साजरे होतात, त्यापैकीच हा एक.

उन्हाळा सुरू असल्याने थंडावा देणारे कैरीचे पन्हे, झाडावर मोठ्या प्रमाणावर येऊ लागलेली सोनचाफ्याची फुले लोकांना देणे यातून निसर्गाशी जवळीक साधण्याची, सुगंधाचा आस्वाद घेण्याची मानसिकता दिसते. कैरीची चव घेण्याच्या निमित्ताने रसिकतेने निसर्गाला आठवण्याचा, एकत्र येण्याचा हा उत्सव असतो. 

काही घरांत पार्वती आपल्या माहेरी चैत्र महिन्यात एक महिनाभरासाठी येते आणि नंतरच तिची सासरी पाठवणी केली जाते असे मानून हा उत्सव साजरा केला जातो. 

शंकर - पार्वती यांना पार्वतीच्या घरी महिनाभर ठेवून घेतले होते. त्यांचा आदर-सत्कार केला होता, अशी कथा प्रचलित आहे. अशाच प्रकारे चैत्रात बसवल्या जाणार्‍या गौरीची महिनाभर घरात पूजा होते, नंतर गौर पुन्हा आपल्या घरी जाते असे समजतात. चैत्रगौर सर्व घरात साजरी होत नाही. विशिष्ट जातीतील लोकच या चैत्रगौरी बसवतात. सर्व समाजात ही प्रथा पाळली जात नाही


गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला
इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभा-याला
घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे
चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे
सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी
गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी
सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी
गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी
गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी
कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी
रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती
ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती
जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला
ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला

No comments:

Post a Comment