Saturday, April 3, 2010

संस्कृतीची जोपासना

महाराष्ट्राची म्हणून एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे जगण्यासाठीची मूल्ये, आचरणाचे नियम, रूढी, चाली-रीती, व्यवहार, आपली भाषा, सण, उत्सव, इतिहास, भौगोलिक परिस्थिती, थोर व्यक्ती, परंपरा यांतून संस्कृती प्रत्येक नव्या पिढीकडे पोहोचते. बदलत्या काळाप्रमाणे येणार्‍या पिढीला त्यात काही फेरफार करावे लागतात, पण वागण्याचे नियम-मूल्ये यात मात्र मोठे बदल होत नाहीत. सण-उत्सव, प्रथा, परंपरा या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला वारशाने समजतात. त्याविषयीचे वाचन, अभ्यास औपचारिकपणे सर्व जण करत नसले, तरी मौखिक परंपरेने, अनुकरणाने, निरीक्षणाने त्या वर्षानुवर्षे सुरूच राहतात.

मुख्यत: शेतीप्रधान संस्कृती व ग्रामीण भागात वास्तव्य करणारी लोकसंख्या महाराष्ट्रात अधिक आहे. निसर्गाशी अगदी जवळचा संबंध असणारे कष्टकरी अत्यंत देवभोळे, श्रद्धाळू, पापभिरू असल्याने बर्‍याच व्रत-वैकल्यांत आणि उपचारांत समाधान व आनंद मानणारे आहेत. तसेच शिक्षित समाजही रूढी, परंपरा, सण-उत्सव यात कसा वेळ देतो, का वेळ देतो हेही समजून घेण्याजोगे आहे.

दैनंदिन कामातून थोडे वेगळे होऊन; नातलग, शेजारी, गावकरी, सहकारी यांच्या सोबतीने एकत्र येऊन आनंद साजरा करणे, या हेतूने महाराष्ट्रात अनेक उत्सव, सण साजरे केले जातात. हवामान, ऋतू आणि त्या-त्या ऋतूत असणारी फळे, फुले, झाडे, त्यांचा औषधी उपयोग याचा अभ्यास करून पूर्वापार हे सण-उत्सव, व्रतं पाळली जातात. आयुर्वेद-औषधी शास्त्र हे अतिशय प्रगत शास्त्र म्हणून उपयोगात आणले जात होते असेही त्यावरून लक्षात येते. वनौषधी, फुले ऋतूमानाप्रमाणे उगवतात व कोमेजतात. आपल्या सणावारात ऋतूमानाप्रमाणे येणार्‍या पिकांचाही फार विचार केलेला आहे असे लक्षात येते.

आचरणाचे नियम हेदेखील त्यामुळे निसर्गातील बदलांचा विचार करून ठरवलेले आहेत. आपल्या आहारात कोणते घटक केव्हा यावेत, कसे यावेत याचा अभ्यास पूर्वीपासून होत असावा. त्यामुळे बदलत्या हवेनुसार सणांना करण्याचे पदार्थही त्यादृष्टीने ठरवलेले आहेत. या अर्थाने खाद्यसंस्कृतीही सण-उत्सवांशी जोडल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

पारंपरिक पद्धतीने आज सण सर्वत्र साजरे होत नाहीत. त्यात व्यावहारिक अडचणीही आहेत. तरीही महाराष्ट्रात सण-उत्सव धार्मिक पद्धतीने साजरे करणे, लोकांनी एकत्र येण्यासाठीचे माध्यम म्हणून आजही सुरू आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यांत, देशांत जाणारे लोक त्यांच्यासोबत त्या पद्धती घेऊन जातात. त्यामुळे अनेक मराठी सण-उत्सव जगाच्या कानाकोपर्‍यातही साजरे होतात असे दिसते.

जाती-धर्मात विभागलेल्या आपल्या समाजाला भेद-भाव विसरून एकत्र येण्यासाठी काही उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरे करण्याची पद्धत आपल्या समाजसुधारकांनी शिकवली. उत्सवांचा समाज प्रबोधन करण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम म्हणून वापर समाजसुधारकांनी केला.

काही धार्मिक चालीरिती लोकांत भेदभाव करणार्‍या, अंधश्रद्धा पसरवणार्‍या असल्याचे पाहून संतांनी एक प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्रात सुरू केली. संत ज्ञानेश्र्वर,
संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत गोरोबा,संत चोखामेळा, संत मुक्ताबाई,संत जनाबाई, समर्थ रामदास यांनी समाजाला एकत्र येण्याची, भेदभाव विसरण्याची, समानतेची शिकवण दिली. काही उत्सव सामान्य जनतेला चांगल्या मार्गाने जगण्याची शिकवण देण्यासाठी, नीतीनियमांनी समाजाला बांधून ठेवण्यासाठीही सुरू केले. शिक्षणाने, विज्ञानाच्या प्रसार-प्रचारामुळे काही सण, उत्सव, चालीरिती यांचे स्वरूप आधुनिक काळात बदलत आहे. त्यात असणार्‍या अंधश्रद्धांना वगळून सण वा उत्सव साजरे व्हावेत, व्रतं पाळली जावीत हीच संतांचीही प्रबोधनाची चळवळ होती.

महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांमुळे आजही अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील सांस्कृतिक वातावरण निराळे आहे. त्याला अध्यात्माची, तत्त्वज्ञानाची, इतिहासाची आणि मानवजातीच्या कल्याणाची सांगड घालून आपले सण-उत्सव साजरे करण्याची प्रथा आहे. मानवाच्या कल्याणाचे, त्याच्या प्रगतीचे बीज घराघरात पोहोचवण्याचे काम त्यामुळे संस्कृतीच्या माध्यमातून होते असे दिसते.

‘संस्कृती’ या शब्दाला आलेला सध्याचा अर्थ फार वरवरपणे व्यवहारात वापरला जातो आहे. पण मुख्यत: उन्नत समाजासाठी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी आणि व्यापक समाजहितासाठी असलेले आचार-विचार-विहाराचे व्यक्तीसाठीचे नियम, शिष्टाचार यांसाठी वापरलेला शब्द म्हणजे ‘संस्कृती’.

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत आपले सणवार, व्रतं आणि उत्सवदेखील ऋतुमानाप्रमाणे - सूर्य-चंद्र-ग्रहस्थितीच्या अनुसार -ठरलेले आहेत. मराठी दिनदर्शिकेनुसार ग्रहस्थितीप्रमाणे - पृथ्वी आणि इतर ग्रहांच्या स्थानाप्रमाणे - कालमापनाच्या पद्धती ठरल्या. त्याप्रमाणे तिथीला मराठी दिनदर्शिकेत महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक सण-दिवस हे तिथीनुसार ठरलेले दिवस - तेही निसर्गावर आधारित असेच आहेत.


भारतात कालमापनासाठी फार पूर्वापार चालत आलेली पंचांग पद्धती आजही उपयोगात आणली जाते. धर्मशास्त्रांसंदर्भातील ग्रंथांतून त्याबद्दलचे संदर्भ सापडतात. सण-उत्सव हे त्या पंचांगानुसार ठरवण्याची प्राचीन पद्धत आहे. पूर्वी मोजक्या शिक्षित - ब्राह्मण जातीच्या लोकांपुरते असलेले हे ज्ञान आता शास्त्ररूपात, गणिती पद्धतीने सर्वच लोकांसाठी खुले आहे. त्यानुसार सण-उत्सव ठरून ते छापील पद्धतीने सर्वांसाठी उपलब्ध असतात. २७ नक्षत्रे, १५ तिथी, ७ वार, २७ योग असे पंचांग भारतात इसवीसनपूर्व ४०० वर्षांपासून प्रचलित असावे असे संदर्भ मिळतात. 

No comments:

Post a Comment