Saturday, April 3, 2010

श्रावण

श्रावण -
श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानतात. पावसाच्या सरींमुळे शेतीतील कामे पूर्ण झालेलीच असतात. हवा ओलसर गारव्याची, आल्हाददायक असते. सूर्यदर्शन नियमित होत नाही. पण सृष्टी हिरवा शालू नेसून नटलेली असते.

चातुर्मास्य (चतुर्मास) म्हणजे चार पवित्र मराठी महिने. चारही महिने अनेक धार्मिक दिवस पाळले जातात. व्रत-वैकल्ये केली जातात. शेतात कामे कमी प्रमाणात असतात. ईश्र्वराचे स्मरण व्हावे व आहारावर नियंत्रण ठेवले जावे म्हणून अनेक उपवास याच महिन्यात असतात.

पावसाळ्यात सूर्यदर्शन कमी वेळा होते. सृष्टी सौंदर्याने दिमाखात मिरवत असताना या काळात पचण्यासाठी जड पदार्थ खाल्यास ते तब्बेतीला हानीकारक आहेत असे आयुर्वेद आणि आहारशास्त्र सांगते. कांदा-लसूण असे मसालेदार पदार्थ, वांगं-टोमॅटो असे बिया असलेले भाजीचे प्रकार खाण्यात येऊ नयेत अशी एक प्रथा आहे. आहारनियंत्रण करून तब्बेत चांगली ठेवणे असा त्याचा उद्देश असावा असे अभ्यासक सांगतात. ज्या पदार्थामुळे वात होतो असे वातूळ पदार्थ खाल्ले जाऊ नयेत असाही त्याचा एक अर्थ. ईश्र्वरभक्ती, धार्मिक कृत्ये यातही व्यत्यय येऊ नये, पुढे येणार्‍या शेतीच्या मोठ्या कामांना तब्बेतीची तक्रार असू नये म्हणून तब्बेत जपण्याचा हा मार्ग असावा. या श्रावण महिन्यातील सण-उत्सवांची संख्या तुलनेने अधिक आहे.

No comments:

Post a Comment