Saturday, May 8, 2010

पुण्यातील करिअर निवडीची आज संधी

कोल्हापूर - शिक्षणाचे माहेरघर म्हणून समजल्या जाणाऱ्या पुणे येथील नामवंत शैक्षणिक संस्थांचा समावेश असलेल्या "सकाळ एज्युकेशन महायात्रे'चा उद्या (ता. 9) समारोप होत आहे. दोन दिवसांपासून केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आवारात सुरू असलेल्या महायात्रेत विद्यार्थ्यांना करिअरविषयक माहिती घेण्याची सुवर्णसंधी आता एकच दिवस उरली आहे.

काल (ता. 7) पासून सुरू झालेल्या या शैक्षणिक महायात्रेत अनेक विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. पुण्यातील नामवंत शैक्षणिक संस्थांची माहिती एकाच छताखाली, त्यातून योग्यरीत्या केले जाणारे समुपदेशन, विविध शैक्षणिक चर्चासत्रे, विविध सोयी-सुविधांविषयी माहिती मिळत असल्याने विद्यार्थ्यांची एकच झुंबड महायात्रा पाहण्यासासाठी उडाली.

सायंकाळी झालेल्या तीनही सेमिनारना विद्यार्थ्यांनी पालकांसह हजेरी लावली. उत्कृष्ट नियोजन, सुयोग्य माहिती, पुण्यातील शैक्षणिक वातावरण, करिअरसाठी नेमक्‍या अभ्यासक्रमाची निवड यासाठी प्रदर्शन उपयुक्त ठरते आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रदर्शन उपयुक्त ठरत असल्याने या वर्गातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली. आर्टस्‌, कॉमर्स या पारंपरिक अभ्यासक्रमासह ऍनिमेशन, हॉटेल मॅनेजमेंट, फूड प्रोसेसिंग, एमबीए, एमसीए, इंजिनिअरिंग, स्पर्धा परीक्षाविषयक पुस्तके, एरोनॉटिकल इंजिनिअरिंग, केटरिंग, कार डिझाईन याशिवाय विविध अभ्यासक्रमांची माहिती याठिकाणी विद्यार्थ्यांना दिली जाते; याशिवाय प्रत्यक्ष पुण्यात राहताना येणारा खर्च, खर्चासाठी बॅंकिंग पतपुरवठा सुविधा आदीविषयी माहिती मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला.

प्रवेश परीक्षा कशी असते हो? मॅनेजमेंटचे ट्रेनिंग कसे करावे? बारावीनंतर डिझायनिंग क्षेत्रात कसे जावे? इंजिनिअरिंग प्रवेशासाठी काय डॉक्‍युमेंटस्‌ गोळा करावे? अशा एक ना अनेक प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे महायात्रेच्या निमित्त आयोजित विविध सेमिनारमधून विद्यार्थ्यांना मिळाली.

"व्यवस्थापन क्षेत्र व करिअरच्या संधी' विषयावर पुण्यातील एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रा. दुर्वेश मोघे यांनी "एमबीए'साठी प्रवेश परीक्षा कशी आहे, त्यासाठी तयारी कशी करावी, याबाबत माहिती दिली. इंडस्ट्रीज्‌ला हवे असलेले इनपुट तयार केल्यानंतर एमबीए झालेल्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे. एमआयटीमध्ये एचआर, फायनान्स, मार्केटिंग, रिटेल बिझनेस मॅनेजमेंट, फॉरेस्ट्री बिझनेस मॅनेजमेंट या क्षेत्रात करिअरच्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.

"एमआयटी'चे प्रा. मंदार सरलष्कर यांनी जिओइन्फॉर्मेटिक्‍स अभ्यासक्रमासंबंधी माहिती दिली. स्टेट ऑफ आर्ट, जीपीएस-जीआयएस-रिमोट सीझिंग या संकल्पनांविषयी त्यांनी विवेचन केले. वर्षाचा हा अभ्यासक्रम असून इसीटीस (युरोपियन क्रेडिट सिस्टीम) क्रेडिट सुविधा, स्वीडनच्या युनिव्हर्सिटीचे प्रमाणपत्र यासह विविध सुविधा विद्यार्थ्यांना मिळतात, असे त्यांनी सांगितले. प्रा. सरलष्कर यांनी युरोपियन युनियन स्कॉलरशिप प्रोग्राम अंतर्गत "एमएस' केलेले असल्याने त्यांनी हा संवाद या विषयातील करियरच्या विविध अंगांनी खुलवला.

"इंजिनिअरिंग, आयटी, मॅनेजमेंट आणि डिझायनिंग' या विषयावर विश्‍वकर्मा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे प्रा. राहुल होनराव यांनी सविस्तर माहिती दिली. सध्या इंटेरियर डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, मास कम्युनिकेशन, मल्टीमीडिया याविषयी होनराव यांनी सांगितले, की या क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या संधी आहेत. योजनाबद्ध तयारी, ध्येयनिश्‍चितीकरण आणि व्यक्तिसापेक्ष बदलत जाणारे करिअर हे विद्यार्थ्यांनी ओळखले पाहिजे, असे सांगून त्यांनी विश्‍वकर्मा इन्स्टिट्यूटच्या विविध कोर्स आणि मॅनेजमेंटविषयी सविस्तर माहिती दिली.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. प्रवीण डी. चौधरी यांनी फार्मसी शिक्षणातील विविध संधीविषयी माहिती दिली. आर्थिक मंदीच्या काळात औषधनिर्माण क्षेत्र वगळता सर्वच क्षेत्रांना भीती आहे. औषधनिर्माण क्षेत्र स्थिर गतीने चालते. जागतिकीकरणात भारताची बाजू भक्कम आहे. या क्षेत्रात संशोधन मोठ्या प्रमाणात होत आहे. संशोधनावरचा खर्च मोठा आहे. या क्षेत्रात संशोधन करण्याची मोठी संधी आहे. ज्यांना संशोधनात रस आहे, अशांसाठी ही चांगली संधी आहे. यातील मार्केट क्षेत्र मोठे असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनच्या प्रा. शुभांगी ओगले यांनी विशेष मुलांसाठीच्या शिक्षणातील करिअरविषयी सविस्तर माहिती दिली. देशभरात दहा टक्के मुलं अपंग असून तीन टक्के मुलं शाळाबाह्य आहेत. अपंग, अंध, मूक-बधिर, मतिमंद मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष शिक्षकांची आवश्‍यकता आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत अशा मुलांसाठी प्रत्येक शाळेत एक विशेष शिक्षक नेमला जाणार आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी "प्रोग्रेसिव्ह'मधील विशेष मुलांसाठीचे बीएड आणि एमएड अभ्यासक्रम महत्त्वाचे आहेत.

आजचे सेमिनारसायंकाळी पाच ते सहा - एमआयडीडीएस इन्स्टिट्यूट ऑफ ऍनिमेशन - विषय - ऍनिमेशन क्षेत्रातील करिअर
सायंकाळी सहा ते सात - मेट्रोपोलिटीयन इन्स्टिट्यूट अँड कॉलेज - विषय - मॅनेजमेंट, आयटी व हॉटेल मॅनेजमेंटमधील करिअर
सायंकाळी सात ते आठ - दि युनिक ऍकॅडमी - युपीएससी व एमपीएससी परीक्षांची पूर्वतयारी कशी करावी.



No comments:

Post a Comment