Thursday, April 8, 2010

पोळा

श्रावण अमावास्येला बैलांची पूजा करून, त्यांना उत्तम जेवायला देऊन, कामातून विश्रांती दिली जाते. सजवून त्यांची मिरवणूक काढण्याचा हा दिवस.

शेतकर्‍यांच्या मदतीसाठी तत्पर असलेल्या बैलांना (पशुधनाला) त्यांच्या श्रमातून बदल देणे, त्यांना रजा देणे, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवणे असा त्यामागे अर्थ आहे. शेतातील कामे संपत आल्याने शेतकरी या उत्सवात बैलांसह आनंदाने सहभागी होऊ शकतात.


प्रत्येक शिव मंदिरात असणारा नंदी, वृषभ म्हणजेच बैल. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत बैलांना  सजवून त्यांची मिरवणूक काढतात. ज्या ठिकाणी दुग्धव्यवसाय, एकूणच शेती मोठ्या प्रमाणात उत्पन्न देते अशा ठिकाणी भरपूर पशुधन असते. सुबत्ता असल्यास ते पशुधन सुदृढही असते. तिथे बैलपोळा मोठ्या उत्साहाने साजरा करतात. पश्चिम महाराष्ट्र त्यात पुढे आहे. कोकणात या उत्सवाला ‘बेंदूर’ असे नाव आहे. बंगालमध्ये, गुजराथमध्येही बैलांचा सण साजरा होतो. दररोज ज्याच्याकडून मेहनत करून घेतो, त्याच्या श्रमाची पावती देणे, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून, ओवाळून खायला देणे अशा गोष्टी केल्या जातात.
बैलाचे कष्ट शेताच्या प्रत्येक कामासाठी शेतकरी घेतो, त्यामुळेच त्याला भरपूर धान्य मिळते. अशा मूक प्राण्याला शेतीची कामे संपल्यावर विश्रांती देणारा हा सण! कृषिप्रधान संस्कृती याच्या मुळाशी आहे. निसर्गरूपांना देव मानणे, नवे धान्य आल्यावर त्याची पूजा करणे, हत्यारे-अवजारे यांची पूजा करणे, जमिनीला मातेसमान मानणे या पद्धती कृषिसंस्कृतीशी जोडलेल्या आहेत.

या सणासाठी शेतकर्‍यांमध्ये उत्साह असतो. आपला बैल उठुन दिसावा या साठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजश्रुंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्यात भाग घेतात.गावाच्या सिमेजवळ (आखर) एक मोठे आंब्याच्या पानाचे तोरण करुन बांधतात. त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनया, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस 'झडत्या' (पोळ्याची गीते) म्हणायची पध्दत आहे.त्यानंतर, 'मानवाईक' (ज्याला गावात मान आहे तो-गावचा पाटील, श्रीमंत जमिनदार) याचेतर्फे तोरण तोडले जाते व पोळा 'फुटतो'. नंतर बैल मारुतीच्या देवळात नेण्यात येतात. मग त्यांना घरी नेउन ओवाळण्यात येते.बैल नेणार्‍यास 'बोजारा' (पैसे) देण्यात येतात.
असा हा पोळ्याचा सण आहे. दिवसेंदिवस होणार्‍या नापिकीमुळे व खालावणार्‍या आर्थिक परिस्थितीमुळे याचा उत्साह कमी होत आहे.

2 comments:

Jitendra Dixit said...

Sundar Pane Polya babat chi mahiti Vishad keleli aahe. Pola Sanache Ghoshwakya athva Kavita Kuthe miltil. krupay jjdixit@gmail.com var kalavave. Dhanyawad.....

Unknown said...

मित्रा पोल्याच्या झडत्या पाठविल्या असत्या तर उत्कृष्ट

Post a Comment