Saturday, April 3, 2010

सुनील गावस्कर

१९७१ साल, वेस्ट इंडिजमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिका चालू होती. त्या वेळी भारतीय संघात एक सर्वात लहान वयाचा खेळाडू - ज्याने आंतरशालेय, विद्यापीठ, रणजी अशा विविध स्तरांवरील क्रिकेट सामन्यांमध्ये धावांचे डोंगर रचले होते-विंडिजच्यां तोफखान्यासारख्या भासणार्‍या, अक्षरश: आग ओकणार्‍या गोलंदाजांसमोर खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण करत असताना या मालिकेतील त्या खेळाडूचा खेळ क्रिकेट रसिकांना थक्क करून सोडणारा होता. संपूर्ण मालिकेत १ द्विशतक आणि ३ शतके यांच्या साहाय्याने १५४.८० च्या सरासरीने एकूण ७७४ धावांचा पर्वत या खेळाडूने रचला. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध त्यांच्या भूमीत सामना जिंकला, मालिकाही (१-०) जिंकली. पुढे जाऊन याच क्रिकेटपटूने क्रिकेटच्या इतिहासात आपले एक वेगळे, उच्चतम स्थान निर्माण केले. त्या खेळाडूचे नाव सुनील मनोहर गावस्कर.

लिटिल मास्टर या नावाने प्रसिद्ध असलेल्या सुनील गावस्कर यांचा जन्म १९४९ मध्ये झाला. सुनील गावस्कर यांच्या घरातील वातावरण क्रिकेटमय होते. त्यांचे वडील स्वत: एक क्रिकेटपटू होते. मामा माधव मंत्री हेदेखील एक चांगले कसोटी खेळाडू होते. सुनील यांच्या आईने तर त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. एकंदरीत घरातील क्रिकेटने भारलेले वातावरण सुनीलमध्ये दडलेल्या खेळाडूला जागवण्यात महत्त्वाचे ठरले.
१९७० साली सुनील यांची निवड रणजीसाठी झाली. या वेळी पहिल्या दोन डावात त्यांच्याकडून विशेष कामगिरी होऊ शकली नाही. परंतु तिसर्‍या डावात अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत, प्रभावी फिरकी गोलंदाजासमोर त्यांनी शतकी कामगिरी केली. १९७१ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत देण्यात आलेल्या संधीचे त्यांनी सोने केले. याच मालिकेतील एका सामन्यात पहिल्या डावात शतक व दुसर्‍या डावात द्विशतक करणारा  दुसरा खेळाडू होण्याचा बहुमान त्यांनी प्राप्त केला.

१९७५ ते १९८६ हे सुनील गावस्कर यांनी गाजवलेले दशक. त्यांच्या पूर्ण १७ वर्षांच्या प्रदीर्घ क्रिकेट कारकीर्दीत ह्या दशकात त्यांच्या कामगिरीचा आलेख नेहमी चढता राहिला. या कालावधीत सातत्याने आत्मपरीक्षण करत त्यांनी क्रिकेटबाबत स्वत:चे असे शास्त्रशुद्ध तंत्र विकसित केले. वेगवेगळ्या देशातील हवामान आणि खेळपट्टी यांचा अभ्यास करून, त्याप्रमाणे खेळाचे नियोजन केल्यामुळे परदेशातील खेळपट्‌ट्यांवरदेखील त्यांनी उच्च दर्जाचा खेळ केला. हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

मार्शल, होल्डिंग, गार्नर... यांसारख्या गोलंदाजांचा काळ असतानासुद्धा सुनील यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत कधीही शिरस्त्राणाचा (हेल्मेटचा) वापर केला नाही. यावरून त्यांची अचूकता, हात-डोळे यांचा समन्वय; (Hand-Eye co-ordination) आणि त्यांचा आत्मविश्वास याची आपल्याला कल्पना येते.

कमालीची एकाग्रता, घोटलेले तंत्र, चिवटपणा (तासन्‌तास, दिवसेंदिवस खेळपट्टीवर उभे राहण्याची क्षमता), उत्कृष्ट संरक्षण (डिफेर्न्स), क्रीझचा उत्तम वापर आणि आघाडीचा तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून विशेष कामगिरी ही त्यांच्या खेळाची प्रमुख वैशिष्ट्ये होत. त्यांचा १०१२२ धावांचा (कसोटीतील सर्वोच्च) विक्रम आणि कसोटीतील सर्वाधिक-३४- शतकांचा विक्रम प्रदीर्घ काळ अबाधित राहिला. त्यांच्या एकूण ३४ कसोटी शतकांपैकी सर्वाधिक १३ शतके ही त्या काळात सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाजांसह आघाडीवर असणार्‍या वेस्ट इंडिज संघाविरुद्ध काढलेली आहेत हे विशेष महत्त्वाचे! आजही परदेशातील मैदानांवर भारताची कामगिरी पाहिली, तर असे लक्षात येते की आपल्याला सामने अनिर्णित राखण्यासाठी झगडावे लागते; विजय दुर्मीळ असतात. सौरव गांगुली, महेंद्रसिंह ढोणी यांच्या काळात याबाबत बदल झाले, होत आहेत. पण बदलांचा पाया सुनील गावस्कर यांनी घातला. त्यांच्या ३४ कसोटी शतकांपैकी १८ शतके ही परदेशी मैदानांवर ठोकलेली आहेत, ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.

प्रथम श्रेणी सामन्यांतील त्यांच्या २५८३४ धावा  धावांची भूक व त्यानुसार कामगिरी दर्शवतात. एक आदर्श ‘स्लीपमधील क्षेत्ररक्षक’ असाही त्यांचा आदराने उल्लेख केला जातो. त्या काळात एकदिवसीय सामन्यांचे स्वरूप आजच्याइतके वेगवान नव्हते. विश्र्वचषक स्पर्धांचे आयोजन होत असे, पण संघ ५० (किंवा ६०) षटकांत २२५-२५० धावांत समाधान मानत असत. सुनील गावस्कर निवृत्त होत असताना एकदिवसीय सामन्यांचे स्वरूप पालटत होते. १९८७ मध्ये त्यांनी नागपूरच्या मैदानावर न्युझीलंडविरुद्ध ८८ चेंडूत १०३ धावा ठोकल्या होत्या. या खेळीतून त्यांनी आपले एकमेव एकदिवसीय शतक साकारले आणि आपण क्रिकेटच्या ‘या’ प्रकारातही किती उच्च दर्जा गाठू शकतो, याची झलक त्यांनी दाखवली. १९८३ च्या विश्र्वचषक विजेता भारतीय संघाचे ते महत्त्वाचे सदस्य तर होतेच.

जागतिक पातळीवर भारतीय क्रिकेटला मान्यता आणि भारतीय खेळाडूंना आत्मविश्वास मिळवून देण्याचे श्रेय सुनील गावस्कर यांच्याकडे जाते. कप्तानपदी असताना हूक, पुल यासारख्या आवडत्या फटक्यांना नियंत्रित ठेऊन, योजनाबद्ध रीतीने भारतीय संघाला संकटातून बाहेर काढण्याची कामगिरी त्यांनी अनेक वेळा पार पाडली. त्याचबरोबर विजय हजारे, मांजरेकर यांच्या परंपरेतील तंत्रशुद्ध खेळ विकसित करून त्यास सातत्याची जोड दिली. कसोटी क्रिकेटमध्ये (विशेषत: परदेशात) पराभवाची नामुष्की पत्करण्याची सवय झालेल्या भारतीय संघास पराभव टाळण्याचे व जिंकण्याचे सामर्थ्य त्यांनी आपल्या खेळाच्या साहाय्याने प्रदान केले. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये व्यावसायिकता आणण्याचे कामही गावस्कर यांनी पार पाडले.
‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला’ या त्यांनी गायलेल्या गाण्यातील शब्द ते स्वत: जगले, जगत आहेत. एक यशस्वी खेळाडू म्हणून अजून अधिक काळ खेळू शकत असूनदेखील कुठे थांबायचे हे माहीत असल्यामुळे  १९८७ साली गावस्करांनी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली.
निवृत्तीनंतरही स्तंभलेखक, उत्कृष्ट क्रीडा समीक्षक आणि समालोचक या नात्याने ते क्रिकेटशी संबंध जोडून आहेत. तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटविषयक विविध समित्यांचे अध्यक्ष, सदस्य म्हणूनही ते कार्य पाहत आहेत. आपल्या सफाईदार भाषाशैलीने क्रिकेट समालोचनाच्या क्षेत्रात स्वत:चे असे उच्च स्थान त्यांनी निर्माण केले आहे. सुनील स्वत: एक तंत्रशुद्ध खेळाडू असल्याने त्यांना खेळातले बारकावे माहीत आहेत. खेळाचे विश्र्लेषण ते अतिशय समर्पक शब्दांत, आकर्षक व नेमक्या पद्धतीने करतात. त्यामुळे कित्येकदा खेळ पाहावा की केवळ समालोचन ऐकत राहावे असा प्रश्र्न क्रीडारसिकांसमारे उभा राहतो. त्यांच्या ओघवत्या, समृद्ध अशा इंग्रजी भाषेच्या साहाय्याने त्यांनी या क्षेत्राला एक वेगळे परिमाण प्राप्त करून दिले आहे.

क्रिकेटबरोबरच सुनील गावस्कर यांनी लेखनकला देखील चांगल्या रीतीने अवगत केलेली आहे. ‘सनी डेज’ या त्यांच्या आत्मचरित्राबरोबरच त्यांनी वन-डे-वंडर्स, रन्स अॅन्ड रुईन्स ही पुस्तकेही लिहिली आहेत. या पुस्तकांचे मराठी भाषांतरदेखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर जगातील काही मोजक्या क्रिकेटपटूंच्या खेळांचे वर्णन करणारे ‘आयडॉल्स’ हे पुस्तकही त्यांनी लिहिलेले आहे. ते अतिशय नेमकेपणाने व समर्पकतेने विविध वृत्तपत्रांत स्तंभलेखन करतात. स्तंभलेखक, समीक्षक, समालोचक या सर्व गुणांसह आणखी एक वेगळा गुण म्हणजे त्यांनी - शांताराम नांदगावकर लिखित ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला’ आणि ‘मित्रा तुला हे जग आहे फुलवायचे’ ही दोन - गायलेली गाणी. त्याचबरोबर त्यांनी ‘सावली प्रेमाची’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिकादेखील केलेली आहे.

क्रिकेट जगतात उपखंडातील खेळाडू (भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगला देश) आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांचे खेळाडू यांच्यामध्ये नेहमीच शीतयुद्ध चालू असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद, विविध संबंधित आंतरराष्ट्रीय समित्या यांमध्येही - अधिकार्‍यांत - हे शीतयुद्ध चालू असते. या परिस्थितीत उपखंडातील खेळाडूंचे प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष नेतृत्व सुनील गावस्कर तळमळीने करताना दिसतात. भारतीय किंवा उपखंडीय खेळाडूंवर जर अन्याय होत असेल, तर या खेळाडूंची न्याय्य बाजू गावस्कर नेहमीच हिरीरीने मांडतात. या त्यांच्या कृतीतून भारताबद्दलचा अभिमान दिसून येतो.
क्रिकेट समालोचक, समीक्षक आणि अनुभवी खेळाडू या नात्याने आजही ते नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन करत असतात. अशा या हरहुन्नरी  विक्रमवीराचे नाव भारतीय क्रिकेट जगतात नेहमीच अभिमानाने घेतले जाईल.

सुनील गावस्कर यांच्या नावावरील विक्रमांचा तपशील व अन्य माहिती -
-    आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करणारा १ ला फलंदाज.
-    सर डॉन ब्रॅडमन यांचा कसोटी क्रिकेटमधील २९ शतकांचा विक्रम मोडला. हा विक्रम करण्यास ब्रॅडमन यांना ५२ सामने खेळावे लागले तर आपल्याला ९५ सामने खेळावे लागले याची गावस्कर प्रांजळपणे कबुली देतात. या २९ शतकांमध्ये ३ द्विशतकांचा समावेश असून नाबाद २३६ हा वैयक्तिक उच्चांक आहे.

उषःकाल होता होता काळरात्र झाली !

उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?
जे कधीच नव्हते त्यांची वाट का पहावी ?
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !
तेच घाव करिती फिरुनी ह्या नव्या कट्यारी;
तोच दंश करिती आम्हा साप हे विषारी !
आम्ही मात्र ऐकत असतो आमुची खुषाली !
तिजोऱ्यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,
आम्हावरी संसारची उडे धूळमाती !
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !
अशा कशा ज्याने त्याने गाडल्या उमेदी ?
असा कसा जो तो येथे होतसे खरेदी ?
ह्या अपार दुःखाचीही चालली दलाली !
उभा देश झाला आता एक बंदिशाला
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !
कसे पुण्य दुर्दैवी अन्‌ पाप भाग्यशाली !
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !
अजुन रक्त मागत उठती वधस्तंभ सारे !
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळली !

गीत - सुरेश भट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर 
स्वर - आशा भोसले, रवींद्र साठे
चित्रपट - सिंहासन (१९७९)

तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल

तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल
नका सोडुन जाऊ, रंगमहाल
पापण्यांचि तोरणं बांधुन डोळ्यांवरती
ही नजर उधळिते काळजातली पिर्ती
जवळी यावं, मला पुसावं, गुपीत माझं खुशाल
हुरहुर म्हणुं की ओढ म्हणू ही गोड
या बसा मंचकी, सुटंल गुलाबी कोडं
विरह जाळिता मला रात ही पसरी मायाजाल
लाडे-लाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई
पिरतिचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
अशीच ऱ्हावी रात साजणा, कधी न व्हावी सकाळ

गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर - उषा मंगेशकर
चित्रपट - पिंजरा (१९७२)

कशी नशीबाने थट्टा आज मांडली

दहा दिशांनी, दहा मुखांनी, आज फोडिला टाहो,
आसवांत या भिजली गाथा, श्रोते ऐका हो !
माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
गंगेवानी निर्मळ होतं, असं एक गाव
सुखी समाधानी होतं, रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं किर्ती वाढली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
अशा गावि होता एक भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला, कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्ट लागली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला, नदीपार केली
नार सूड भावनेनं, उभी पेटली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
पिसाळलेल्या नागिणीने थयथयाट केला
नाचगाण्यासाठी सारा गाव येडा झाला
त्यांनी लाज भीड निती सारी सोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
जाब विचाराया गेला, तिने केला डाव
भोवऱ्यात शृंगाराच्या सापडली नाव
त्याच्या पतंगाची दोरी तिने तोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
खुळ्या जीवा कळला नाही, खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल
त्याला कुत्र्या-मांजराची दशा आणली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
जन्मभरी फसगत झाली, तिचा हा तमाशा
जळुनिया गेली आता जगायाची आशा
आज हुंदक्यानं भैरवी मी गायिली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
याची देही याची डोळा पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
माझ्या कर्मसोहळ्याची यात्रा चालली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !

गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - राम कदम
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - पिंजरा (१९७२)

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
माझ्या पिरतीची रानी तू होशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय !
तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय !
गं तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं
माझं कालिज भोलं, त्याच मासोली झालं
माझ्या पिरतीचा, सुटलाय तुफान वारा वारा वारा
रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरा
तुझ्या नजरंच्या जादूला, अशी मी भुलणार नाय
रं माझ्या रूपाचा ऐना, तुझ्या जीवाची दैना
मी रे रानाची मैना, तुझा शिकारी बाणा
खुळा पारधी गं, जाळ्यामंदी आला आला आला
गं तुला रुप्याची नथ मी घालीन
गं तुला मिरवत मिरवत नेईन
तुज्या फसव्या या जाल्याला, अशी मी गावनार नाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार ......हाय !
तुझ्या पिरतिचि रानी मी होनार हाय !

गीत - सुधीर मोघे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - आशा भोसले, हेमंत कुमार
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा (१९७६)

जिजाबाई

जिजाबाई (१५९४-१६७४) ही सिंदखेडच्या लखुजी जाधवांची कन्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. ई.स. १६०५ मध्ये जिजाबाई आणि शहाजीराजांचा विवाह झाला. पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला असता, जिजाबाई आपल्या पतीशी कायम एकनिष्ठ राहिल्या. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती

संस्कृतीची जोपासना

महाराष्ट्राची म्हणून एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे जगण्यासाठीची मूल्ये, आचरणाचे नियम, रूढी, चाली-रीती, व्यवहार, आपली भाषा, सण, उत्सव, इतिहास, भौगोलिक परिस्थिती, थोर व्यक्ती, परंपरा यांतून संस्कृती प्रत्येक नव्या पिढीकडे पोहोचते. बदलत्या काळाप्रमाणे येणार्‍या पिढीला त्यात काही फेरफार करावे लागतात, पण वागण्याचे नियम-मूल्ये यात मात्र मोठे बदल होत नाहीत. सण-उत्सव, प्रथा, परंपरा या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला वारशाने समजतात. त्याविषयीचे वाचन, अभ्यास औपचारिकपणे सर्व जण करत नसले, तरी मौखिक परंपरेने, अनुकरणाने, निरीक्षणाने त्या वर्षानुवर्षे सुरूच राहतात.

मुख्यत: शेतीप्रधान संस्कृती व ग्रामीण भागात वास्तव्य करणारी लोकसंख्या महाराष्ट्रात अधिक आहे. निसर्गाशी अगदी जवळचा संबंध असणारे कष्टकरी अत्यंत देवभोळे, श्रद्धाळू, पापभिरू असल्याने बर्‍याच व्रत-वैकल्यांत आणि उपचारांत समाधान व आनंद मानणारे आहेत. तसेच शिक्षित समाजही रूढी, परंपरा, सण-उत्सव यात कसा वेळ देतो, का वेळ देतो हेही समजून घेण्याजोगे आहे.

दैनंदिन कामातून थोडे वेगळे होऊन; नातलग, शेजारी, गावकरी, सहकारी यांच्या सोबतीने एकत्र येऊन आनंद साजरा करणे, या हेतूने महाराष्ट्रात अनेक उत्सव, सण साजरे केले जातात. हवामान, ऋतू आणि त्या-त्या ऋतूत असणारी फळे, फुले, झाडे, त्यांचा औषधी उपयोग याचा अभ्यास करून पूर्वापार हे सण-उत्सव, व्रतं पाळली जातात. आयुर्वेद-औषधी शास्त्र हे अतिशय प्रगत शास्त्र म्हणून उपयोगात आणले जात होते असेही त्यावरून लक्षात येते. वनौषधी, फुले ऋतूमानाप्रमाणे उगवतात व कोमेजतात. आपल्या सणावारात ऋतूमानाप्रमाणे येणार्‍या पिकांचाही फार विचार केलेला आहे असे लक्षात येते.

आचरणाचे नियम हेदेखील त्यामुळे निसर्गातील बदलांचा विचार करून ठरवलेले आहेत. आपल्या आहारात कोणते घटक केव्हा यावेत, कसे यावेत याचा अभ्यास पूर्वीपासून होत असावा. त्यामुळे बदलत्या हवेनुसार सणांना करण्याचे पदार्थही त्यादृष्टीने ठरवलेले आहेत. या अर्थाने खाद्यसंस्कृतीही सण-उत्सवांशी जोडल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

पारंपरिक पद्धतीने आज सण सर्वत्र साजरे होत नाहीत. त्यात व्यावहारिक अडचणीही आहेत. तरीही महाराष्ट्रात सण-उत्सव धार्मिक पद्धतीने साजरे करणे, लोकांनी एकत्र येण्यासाठीचे माध्यम म्हणून आजही सुरू आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यांत, देशांत जाणारे लोक त्यांच्यासोबत त्या पद्धती घेऊन जातात. त्यामुळे अनेक मराठी सण-उत्सव जगाच्या कानाकोपर्‍यातही साजरे होतात असे दिसते.

जाती-धर्मात विभागलेल्या आपल्या समाजाला भेद-भाव विसरून एकत्र येण्यासाठी काही उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरे करण्याची पद्धत आपल्या समाजसुधारकांनी शिकवली. उत्सवांचा समाज प्रबोधन करण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम म्हणून वापर समाजसुधारकांनी केला.

काही धार्मिक चालीरिती लोकांत भेदभाव करणार्‍या, अंधश्रद्धा पसरवणार्‍या असल्याचे पाहून संतांनी एक प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्रात सुरू केली. संत ज्ञानेश्र्वर,
संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत गोरोबा,संत चोखामेळा, संत मुक्ताबाई,संत जनाबाई, समर्थ रामदास यांनी समाजाला एकत्र येण्याची, भेदभाव विसरण्याची, समानतेची शिकवण दिली. काही उत्सव सामान्य जनतेला चांगल्या मार्गाने जगण्याची शिकवण देण्यासाठी, नीतीनियमांनी समाजाला बांधून ठेवण्यासाठीही सुरू केले. शिक्षणाने, विज्ञानाच्या प्रसार-प्रचारामुळे काही सण, उत्सव, चालीरिती यांचे स्वरूप आधुनिक काळात बदलत आहे. त्यात असणार्‍या अंधश्रद्धांना वगळून सण वा उत्सव साजरे व्हावेत, व्रतं पाळली जावीत हीच संतांचीही प्रबोधनाची चळवळ होती.

महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांमुळे आजही अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील सांस्कृतिक वातावरण निराळे आहे. त्याला अध्यात्माची, तत्त्वज्ञानाची, इतिहासाची आणि मानवजातीच्या कल्याणाची सांगड घालून आपले सण-उत्सव साजरे करण्याची प्रथा आहे. मानवाच्या कल्याणाचे, त्याच्या प्रगतीचे बीज घराघरात पोहोचवण्याचे काम त्यामुळे संस्कृतीच्या माध्यमातून होते असे दिसते.

‘संस्कृती’ या शब्दाला आलेला सध्याचा अर्थ फार वरवरपणे व्यवहारात वापरला जातो आहे. पण मुख्यत: उन्नत समाजासाठी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी आणि व्यापक समाजहितासाठी असलेले आचार-विचार-विहाराचे व्यक्तीसाठीचे नियम, शिष्टाचार यांसाठी वापरलेला शब्द म्हणजे ‘संस्कृती’.

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत आपले सणवार, व्रतं आणि उत्सवदेखील ऋतुमानाप्रमाणे - सूर्य-चंद्र-ग्रहस्थितीच्या अनुसार -ठरलेले आहेत. मराठी दिनदर्शिकेनुसार ग्रहस्थितीप्रमाणे - पृथ्वी आणि इतर ग्रहांच्या स्थानाप्रमाणे - कालमापनाच्या पद्धती ठरल्या. त्याप्रमाणे तिथीला मराठी दिनदर्शिकेत महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक सण-दिवस हे तिथीनुसार ठरलेले दिवस - तेही निसर्गावर आधारित असेच आहेत.


भारतात कालमापनासाठी फार पूर्वापार चालत आलेली पंचांग पद्धती आजही उपयोगात आणली जाते. धर्मशास्त्रांसंदर्भातील ग्रंथांतून त्याबद्दलचे संदर्भ सापडतात. सण-उत्सव हे त्या पंचांगानुसार ठरवण्याची प्राचीन पद्धत आहे. पूर्वी मोजक्या शिक्षित - ब्राह्मण जातीच्या लोकांपुरते असलेले हे ज्ञान आता शास्त्ररूपात, गणिती पद्धतीने सर्वच लोकांसाठी खुले आहे. त्यानुसार सण-उत्सव ठरून ते छापील पद्धतीने सर्वांसाठी उपलब्ध असतात. २७ नक्षत्रे, १५ तिथी, ७ वार, २७ योग असे पंचांग भारतात इसवीसनपूर्व ४०० वर्षांपासून प्रचलित असावे असे संदर्भ मिळतात.