Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts

Tuesday, April 13, 2010

लग्न लग्न म्हणजे काय असतं?

लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या बेफिकिरीला तिच्या जाणिवांचं कोंदण असतं
तिच्या खर्चाला त्याच्या खिशाचं आंदण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरुण असतं
तिच्या दुःखाला त्याच्या खांद्याचं अंथरुण असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी समझोता तर कधी भांडण असतं
तो चिडला तरी तिनं शांत राहायचं असतं
कपातल्या वादळाला चहाबरोबर संपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
कधी दोन मनांचं मीलन असतं
तर कधी दोन जिवांचं भांडण असतं
एकानं विस्कटलं तरी दुसऱ्यानं आवरायचं असतं
संकटाच्या वादळाला दारातच थोपवायचं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
प्रेमाचं ते बंधन असतं
घराचं ते घरपण असतं
विधात्यानं साकारलेलं ते एक सुंदर स्वप्न असतं!

नातं


तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं..

तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात..

तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती..

तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो..

मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील..

मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात..

Wednesday, March 31, 2010

चकोर

माझी तहान सरेना
गेली कोठे चंद्रकोर
एका अक्षराच्यासाठी
माझी कविता चकोर

तुकयाच्या पुढे माझे
थिटे युध्दाचे प्रसंग
इंद्रायणीच्या गाळात
माझे रुतले अभंग

दुरावली मायबोली
जीव कासावीस झाला
अमृताशी पैजा घेत
माझा व्यापार बुडाला


************

डॉ. राजा दीक्षित,
२, भालचंद्र हाइट्स,
८४७ सदाशिव पेठ,
पुणे ४११०३०
दूरध्वनी : २४४७७८३७