Tuesday, April 6, 2010

नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह जानेवारीतच गाडले

मुंबई - कसाबसोबत मुंबईवर हल्ला केलेल्या नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह जानेवारी महिन्यातच महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकण्यात आले असल्याची घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज विधान परिषदेत केली. पाकिस्तानने महाराष्ट्राच्या भूमीवर अतिरेकी कारवायांचा प्रयत्न केला तर अतिरेक्‍यांना महाराष्ट्राबाहेर जाऊ न देता येथेच गाडले जाईल, असा इशारा त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दिला. आपल्या खात्यात कोणी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तर पदावर राहणार नाही. आपल्याला गृहमंत्रिपदाचा मोह नाही, असे त्यांनी आपल्या घणाघाती भाषणात स्पष्ट केले.

पुण्यातील जर्मन बेकरी प्रकरणातील आरोपी कोण याची ओळख आम्हाला पटली असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. कायदा व सुव्यवस्थेच्या चर्चेवर उत्तर देताना गृहमंत्री म्हणाले, ""अतिरेक्‍यांचे मृतदेह सांभाळण्यासाठी व कसाबसाठी सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते अशी आमच्यावर टीका होते, पण या नऊ अतिरेक्‍यांचे मृतदेह कोणताही अवमान होऊ न देता जानेवारीतच गाडून टाकण्यात आले आहेत. सुमारे 40 पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे हे काम केले व अजूनपर्यंत प्रसिद्धिमाध्यमांना त्याचा पत्ता लागू दिला नाही. पोलिस एखादी गोष्ट गुप्त ठेवतात का, हे मला तपासून पाहायचे होते. ज्या वेळी पत्रकार शवागाराच्या ठिकाणी माहिती घ्यायला जात, त्या वेळी त्याबाहेरील लाल दिवा चालू ठेवला जात असे.''

पाकिस्तानचा पैसा, शस्त्रे व अन्य मदत घेऊन महाराष्ट्राची परीक्षा घेण्याचे काम अतिरेक्‍यांनी करू नये. आपल्या कारवायांत काही प्रमाणात त्यांना यश मिळाले तरी त्यांना येथेच गाडले जाईल, असा इशारा गृहमंत्र्यांनी पाकिस्तानी पंतप्रधानांना दिला. कसाबबाबतही न्यायालयाचा निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे येईल. पुण्यातील जर्मन बेकरीबाबत केंद्रीय गुप्तचर विभागांनी ऍलर्ट दिला नव्हता. लाल देऊळ व छावड हाऊस याबाबत इशारा होता व तेथील सुरक्षा वाढविली होती. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही, असे सांगून गृहमंत्री म्हणाले, केंद्रीय संस्थांनी ऍलर्ट दिला, म्हणजे त्यांची जबाबदारी संपली काय? अतिरेकी समुद्र मार्गाने येणार असतील, तर नौदल, तटरक्षक दलाची जबबादारी आहे. हवाई मार्गाने आले, तर हवाई दलाची आणि अन्य मार्गांनी आले तर सीमा सुरक्षा दलाची. अतिरेक्‍यांचा मुकाबला कायदा व सुव्यवस्थेसाठी असलेल्या पोलिसांनी करण्याची अपेक्षा कशी ठेवायची? केंद्राच्या ऍलर्टबाबत गृह सचिवांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.


गोकुळाष्टमी


गोकुळाष्टमी :
श्रावणातील कृष्ण अष्टमीला श्रीकृष्ण जन्माचा उत्सव करून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. मध्यरात्री श्रीकृष्णजन्माचे स्मरण करून, एकत्र येऊन उपवास करून भाविक हा दिवस साजरा करतात.  दुसर्‍या दिवशी ठिकठिकाणी उंचावर मडक्यात दही ठेवून, मडके दोरीने उंचावर बांधतात. तरुणांनी एकमेकांच्या आधाराने मानवी मनोरा करून ते मडके (हंडी) फोडण्याची एक प्रथा आहे. त्याला ‘दहीहंडी’ म्हणतात. अलीकडे ‘दहिहंडी’ हा एक `आंतरराष्ट्रीय इव्हेंट' बनला आहे. मानवी मनोरा करणारे, हंडी फोडणारे ‘गोविंदा’ यांची फार चढाओढ सुरू झाली आहे. हौस, दंगा, आनंदोत्सव याबरोबरच त्याला स्पर्धा, प्रसिद्धी, प्रायोजक या माध्यमांतून व्यवसायाचे रूपही येऊ लागले आहे. तरुणांची संघटित शक्ती ही या उत्सवाची प्रमुख जमेची बाजू आहे. मुंबई हे या उत्सवाचे मोठे, प्रमुख केंद्र होय.

श्रीकृष्ण म्हणजे खट्याळ, खोडकर, दही-दूध-लोणी चोरून खाणारा अशी त्याची प्रतिमा पिढ्या-न-पिढ्या सांगितली जाते. अनेक गाणी-गोष्टी त्याच्या या लीलांवरच रचलेल्या आहेत. श्रीकृष्णाने त्याच्या सवंगड्यांसह, मनोरे करून दही-दूध-लोण्याच्या हंड्या फोडल्याच्या कथा प्रचलित आहेत. अशा श्रीकृष्णाची-दुष्टांचा संहार करणार्‍या श्रीकृष्णाची-आठवण करण्याचा हा दिवस. काही कथांमुळे श्रीकृष्णाची प्रतिमा लहानपणापासून प्रत्येकाच्या मनात तयार होते. तरुणांनी चपळाईने, संघटितपणे उंचावरचे दही खाली काढण्याच्या निमित्ताने साहसी वृत्ती जागवावी अशाही पद्धतीने या उत्सवाकडे पाहिले जाते.

गायी-वासरे चरण्यासाठी रानात आणि पाण्यासाठी यमुनेच्या तीरावर घेऊन जाणारे सर्व गो-पालक आपापले खाद्यपदार्थ एकत्र करून मजेत खात असावेत अशी कल्पना केली जाते.  हाच गोपाळकाला होय. `गोकुळअष्टमी' च्या दिवशीच संध्याकाळी मंदिरांत काल्याचे कीर्तन असते. नंतर प्रसाद म्हणून पोहे-काकडी-डाळ-दाणे-चुरमुरे असे एकत्र करून प्रसाद म्हणून वाटले जाते. प्रत्येकाने एक एक पदार्थ नेऊन, सर्वांचे पदार्थ एकत्र करून अनेक ठिकाणी रात्रभर भजन करण्याचीही प्रथा आहे. गोपाळकाला करून हा प्रसाद सर्वांना दिला जातो.

गोकुळाष्टमीची महिमा 
दर वर्षी आपण गोकुळाष्टमीला कृष्णजन्म उत्याहाने साजरा करतो. श्रीकृष्ण हा वेगवेगळ्या कारणांनी सगळ्यांनाच खूप आवडणारा, अगदी आपलासा वाटणारा देव आहे. तसा तो भगवान विष्णूचा आठवा अवतार आहे. मत्स्य, कूर्म व वराह या पशूंच्या रूपातील पहिल्या तीन अवतारांबद्दल कोणाला फारसे कांही ठाऊक नसते. नृसिंह आणि वामनावतार थोड्या वेळेपुरते प्रकट झाले आणि कार्यभाग संपताच ते अदृष्य होऊन गेले. सांगता येण्यासारखे असे त्यांचे चरित्र नाही. परशुराम आपल्या जमदग्नी या पित्यासारखाच शीघ्रकोपी म्हणून प्रसिद्ध झालेला असल्यामुळे त्याच्याबद्दल प्रेमाहून भीतीच जास्त वाटते. राम अवतार सर्वगुणसंपन्न आणि आदर्श असे व्यक्तीमत्व आहे. त्याचे संपूर्ण चरित्र हा आदर्श वर्तनाचा वस्तुपाठ आहे. तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून वागण्याचा प्रयत्न करावा असे वाटते, पण सर्वसामान्य माणसाला ते जमणे कठीण आहे. गोपालकृष्ण मात्र आपल्यासारखा वाटतो. त्याच्या लडिवाळ बाललीला, मस्करी, वात्रटपणा, सवंगड्याबरोबर खेळ खेळणे, गोपिकांबरोबर रास रचणे, पांडवांना समजुतीच्या गोष्टींचे सल्ले देणे हे सगळे मानवी वाटते.


कृष्ण हा विविध वयोगटातल्या आणि मनोवृत्तीच्या लोकांना आवडतो कारण इतक्या वैविध्यपूर्ण घटना त्याच्या चरित्रात आहेत. व्यासमहर्षींनी ते फारच कौशल्याने रंगवलेले आहे. मानवी स्वभावाचे दर्शन आणि चमत्कार यांचे एक अजब मिश्रण त्यात आहे. त्याच्या जन्माची कथा अद्भुतरम्य आहे. कंसाचे निर्दाळण करण्यासाठी त्याचा शत्रु देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे अशी पूर्वसूचना त्याला मिळते आणि त्याचा जन्मच होऊ न देण्याचा आटोकाट प्रयत्न तो करतो. त्या सर्वांवर मात करून कृष्ण जन्म होतोच. त्या नवजात शिशूचा जीव वाचवण्यासाठी त्याचा पिता जे प्रयत्न करतो त्याला सर्वोपरीने सहाय्य मिळत जाते. त्याच्या हातापायातील शृंखला गळून पडतात, कारागृहाचे दरवाजे आपोआप उघडतात, रखवालदार गाढ झोपी जातात, मुसळधार पावसातून वाटचाल करत असतांना प्रत्यक्ष शेषनाग आपल्या फण्याचे छत्र त्याच्या माथ्यावर धरतो. दुथडीने वाहणारे यमुना नदीचे पाणी ओसरून त्याला पलीकडे जायला वाट करून देते. गोकुळात गेल्यावर नंद यशोदा निद्रितावस्थेत असतात, पण त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असतो. अशा प्रकारे सर्व अडचणी एक एक करून दूर होत जातात आणि बाल श्रीकृष्ण सुखरूपपणे गोकुळात जाऊन पोचतात. ही कथा किती सुरस आहे पहा! देव आहे म्हणून तो एकदम वसुदेव देवकींना त्यांच्या त्रासातून मुक्त करत नाही की इकडे अदृष्य होऊन तिकडे प्रगट होत नाही.
त्यानंतरसुद्धा आपला शत्रु जन्माला आला आहे आणि गोकुळामध्ये तो वाढतो आहे याची जाणीव कंसाला होते आणि त्या मुलाला मारून टाकण्याचे अनेक उपायसुद्धा तो करतो, पण ते सफळ होत नाहीत. यातसुद्धा कृष्णाला मारायला आलेल्या दुष्टांना तो कोठल्याही शस्त्राने न मारता त्यांचाच डाव त्यांच्या अंगावर उलटवतो. त्याला आपले विषारी दूध पाजून मारायला आलेल्या पूतनामावशीचे दूध पितापिताच तो तिचे प्राण शोषून घेतो तर पाण्यात पडलेला चेंडू आणायचे निमित्य करून यमुनेच्या डोहात मुक्काम करून बसलेल्या कालिया नागाच्या फण्यावर नाचून त्याला चेचून काढतो आणि तिथून निघून जायला भाग पाडतो. अखेरीस कंस त्याला मुष्टीयुद्धाच्या खेळात भाग घेण्याचे आमंत्रण देतो. "मर्दका बच्चा होगे तो खुलकर सामने आ।" वगैरे संवाद हल्लीच्य़ा हिंदी सिनेमात असतात तशा प्रकारे दिलेले हे आव्हान स्वीकारून कृष्ण मल्लयुद्धाच्या आखाड्यात उतरतो. डब्ल्यू डब्ल्यू एफ् सारख्या या फ्रीस्टाईल कुस्त्यांना त्या काळात पंच नसत. प्रतिस्पर्ध्याने हार कबूल करेपर्यंत त्याला झोडत रहायचे असाच नियम होता. त्यात कृष्णाचा जीव जाईपर्यंत त्याला झोडपायचा आदेश कंसाने आपल्या आडदांड मल्लांना दिला होता. इथेही तशाच प्रकाराने कृष्णाने त्यांनाच लोळवले. इतकेच नव्हे तर कंसालाही ललकारून त्याचा जीव घेतला. या सगळ्या प्रकारात एक गोष्ट दाखवली आहे. ती म्हणजे गैरमार्गाने मिळवलेल्या राज्यसत्तेचा सुखासुखी उपभोग कंसाला घेता येत नाही. त्याच्या डोक्यावर असुरक्षिततेची तलवार सतत टांगती राहिलेली असते आणि अशाच अवस्थेत त्याचा अंत होतो.
असा प्रकाराने दुष्ट कंसाचा नाश केल्यानंतर कृष्णाने त्याच्या डोक्यावरील राजमुकुट स्वतः धारण केला नाही. उग्रसेन राजाला पुन्हा राजपद दिले आणि विधीवत शिक्षण घेण्यासाठी तो सांदीपनी मुनींच्या आश्रमात चालला गेला. शिक्षण संपवून परत आल्यानंतरसुद्धा त्याने आपल्या सामर्थ्याच्या बळावर मोठा सम्राट बनण्याची महत्वाकांक्षा धरली नाही. वारंवार होणा-या लढायंच्या धुमश्चक्रीमुळे त्रस्त झालेल्या यादवांना सोबत घेऊन त्याने मथुरासुद्धा सोडली आणि दूर सौराष्ट्राच्या समुद्रकिना-यावर द्वारका नगरी वसवून तिथे स्थाईक झाला. मात्र यादवांना स्थैर्य मिळवून दिल्यावर तो हस्तिनापूरच्या राजकारणात लक्ष घालायला लागला. पांडवांना त्याने हर त-हेने मदत केली. पण कौरवांबरोबरसुद्धा चांगले संबंध राखले. पांडव व कौरवांमधील युद्ध टाळण्यासाठी शिष्टाईचा प्रयत्न केला. अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले.
युद्ध अटळ झाल्यावर "न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार।" असे म्हणत तो वरवर तटस्थ राहिला. सुदर्शनचक्र हातात घेऊन प्रत्यक्ष युद्धात उतरला नाही. फक्त अर्जुनाचे सारथ्य करायचे ठरवले. द्वारकेच्या राण्याने आजच्या भाषेत ड्रायव्हर किंवा शोफर होण्यात त्याला कसलीही अप्रतिष्ठा वाटली नाही. ते काम करता करता त्याने युक्तीच्या ज्या चार गोष्टी सांगितल्या त्याला तोड नाही. भीष्मपितामह, गुरु द्रोणाचार्य, कर्ण व दुर्योधन या कौरवांच्या सेनापतींचे कच्चे दुवे नेमके ओळखून त्यांचा पाडाव करण्याच्या युक्त्या श्रीकृष्णाने सांगितल्याच. युद्धाच्या सुरुवातीलाच "सीदंति मम गात्राणि मुखंचपरिशुष्यते। " असे म्हणून शस्त्र टाकून बसलेल्या अर्जुनाला "कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। " हा भगवद्गीतेचा उपदेश करून युद्ध करण्यास प्रवृत्त केले. हा उपदेश आजतागायत संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करत आला आहे.
असा हा चतुरस्र श्रीकृष्ण! दहीदूध चोरण्याचा खट्याळपणा करणारा म्हणून मुलांना प्रिय, गोपिकांची छेड काढणारा आमि त्यांच्याबरोबर रासक्रीडा करणारा म्हणून युवकांना आवडणारा, रुक्मिणीहरण करून प्रेमीजनांना आधार देणारा आणि भगवद्गीता सांगणारा विद्वज्जनांचा योगेश्वर! त्याच्या आयुष्यातील कथा अत्यंत सुरस आणि मनोरंजक तशाच बोधप्रद आहेत व त्यामुळे त्या सर्वांना सांगायला तसेच ऐकायला खूप आवडतात. म्हणूनच त्याची जयंती इतक्या उल्हासाने साजरी केली जाते.

राखी पौर्णिमा

श्रावण पौर्णिमा याच दिवशी हा सण साजरा केला जातो. बहिणीने भावाला उजव्या हाताला रेशमी गोफ हे प्रेमाचे प्रतीक बांधून, नाते पक्के करण्याची ही पद्धत आहे. भावाच्या हाताला राखी बांधून, बहीण आपल्या रक्षणाची जबाबदारी भावाकडे सोपवते, नात्याचा बंध अधिक दृढ करते. उत्तर भारतातही हा सण पूर्वीपासून साजरा केला जातो.  संपूर्ण भारतभर हळूहळू याचे महत्त्व वाढू लागले आहे. ज्यांना भाऊ किंवा बहीण नाही, ते ही नाती प्रेमाने निर्माण करतात. मानवी नात्यांच्या माध्यमातून अशा विशिष्ट दिवशी एकत्र येणे, आनंदाचा अनुभव घेणे या निमित्ताने घडते.






रक्षाबंधन- इतिहास व परंपरा
भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये 'रक्षाबंधन' हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात 'कजरी-पौर्णिमा', पश्चिम भारतातात 'नारळी पौर्णिमा' या नावाने तो साजरा केला जातो.

इंद्र दानवांकडून पराजीत झाले होते. तेव्हा त्यांच्या उजव्या हातावर त्यांची पत्नी इंद्राणीने रक्षासूत्र बांधले होते. त्याने इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर त्यांनी दानवावर विजय मिळवला होता. अशी पौराणिक कथा आहे. तसेच महाभारतात श्री कृष्‍णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडी किनार फाडून श्रीकृष्‍णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्‍याचा संकल्प केला होता व आजीवन त्यांनी दौपदीचे रक्षण केले.

भारतीय इतिहासात रक्षाबंधन संदर्भात अनेक उदाहरणे आहेत. चित्तौढगडची राणी कर्मावतीने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायूने राणीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती.

नोबल पुरस्कार विजेते रविंद्रनाथ टागोर यांनी बंगाल विभाजनानंतर हिंदु व मुस्लिम यांच्यात सलोखा निर्माण करण्‍यासाठी दोन्ही समुदायांना एकमेकांच्या हातावर रक्षासूत्र बांधण्याची विनंती केली होती.

पौराणिक कथा व इतिहात चाळता रक्षाबंधन या सणात काळानुरूप बदल झालेला आढळतो. आता तर हे पर्व भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे व बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरे होताना दिसते. त्यात बहिण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधत असते व भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्त्व स्विकारत असतो.

काळ बदलला असला तरी आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भाऊ- बहीनींच्या स्नेहाचा 'रक्षाबंधण' या सणाचे महत्त्व कायम आहे.

नारळी पौर्णिमा

नारळी पौर्णिमा हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.
या दिवशी कोळी व ईतर समुद्राशी निगडीत व्यवसायातील लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात.




श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनार्‍यालगत राहणार्‍या लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो व कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. सुरक्षिततेची समुद्र देवाला प्रार्थना केली जाते. या सणाला नारळाचे गोड पदार्थ यार केले जातात. भारताला सुमारे 1517 कि.मी. लांबीचा व महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

Monday, April 5, 2010

नागपंचमी : 
श्रावण महिन्यात शुक्ल पंचमीला येणारा हा सण निसर्गातील प्राण्यांविषयी लोकांना जाणीव करून देणारा आहे. शेतीची नांगरण करण्याचा काळ, आणि त्यामुळे वारुळ-नाग असा त्याचा विचार करून नागांचे रक्षण करण्याचा संदेश देणारा हा सण आहे. कापणे, तळणे, भाजणे, नांगरणे अशी कामे करू नयेत अशी एक प्रथा त्याला जोडली आहे. वारुळांची पूजा व नागांची पूजा करून त्यांना दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो. मुली, स्त्रिया झाडाला झोका बांधून खेळतात; झिम्मा, फुगडी यांसारखे पारंपरिक खेळही खेळतात. महाराष्ट्रात नागपंचमीला असंख्य तरुण पतंग उडविण्याचाही आनंद लुटतात. पतंग उडवण्याच्या माध्यमातून पुरुष या सणाला जोडले गेले आहेत. सृष्टी हिरवीगार होऊन वातावरण आनंदाचे झालेले असते त्याच वेळी म्हणजे श्रावणात असे बरेच सण-दिवस साजरे केले जातात. हा श्रावणाच्या सुरुवातीला येणारा सण आहे. वारुळापर्यंत जाणे हे आनंदाचे व्हावे, एकत्र येण्याची मजा सगळ्यांना घेता यावी म्हणून फेर धरणे, गाणी म्हणणे, फुगड्या, झिम्मा, झोका असे खेळ खेळणे या गोष्टी नागपंचमीला जोडल्या गेल्या असाव्यात.

सांगली जिल्ह्यात बत्तीसशिराळा नावाच्या गावात अनेक गारुडी नाग पकडून आणतात. नागांनी फणा काढणे, पुंगीने मोहून जाणे असे खेळ दाखवले जातात. ही प्रथा गेली कित्येक वर्षे सुरू आहे.



कहाणी नागपंचमीची


shankar
ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.

शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ता‍कीद दिली की, हिला कोणी चावू नका!

shiv
एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.

shankar
नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चि‍त्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्‍या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

जय जय महाराष्ट्र माझा


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ।

रेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा।।

भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा
सह्याद्रीचा सिंव्ह गर्जतो, शिव शंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा।।

काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी
दरिद्र्याच्या उन्हात शिजला
निढळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा ।।


* कवी - राजा बढे       * संगीतकार - श्रीनिवास खळे       
* मूळ गायक -शाहीर साबळे व समूह

खरा स्वधर्म हा आपुला


खरा स्वधर्म हा आपुला
जरी का कठीणु जाहला
तरी हाची अनुष्ठीला, भला देखे

स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे
मराठी पाउल पडते पुढे !

माय भवानी प्रसन्न झाली
सोनपावली घरास आली
आजच दसरा, आज दिवाळी
चला, सयांनो, अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे
मराठी पाउल पडते पुढे !

बच्चे आम्ही वीर उद्याचे
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे
दूध आईचे तेज प्रवाही
नसांतुनी सळसळे
मराठी पाउल पडते पुढे !

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे, सिद्ध होई
तदा संकटी देव धावून येई !
जय जय रघुवीर समर्थ

शुभघडीला शुभमुहूर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी, जय भवानी
दश दिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे !!


* कवयित्री - शांता शेळके   * संगीतकार - आनंदघन  
* मूळ गायक -लता, उषा, मीना, हृदयनाथ मंगेशकर, हेमंतकुमार