Monday, April 5, 2010

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा


बहु असोत सुंदर संपन्न की महा
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा

गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे
आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे
अटकेवरि जेथील तुरंगि जल पिणे
तेथ अडे काय जलाशय नदाविणे ?
पौरुषासि अटक गमे जेथ दु:सहा

प्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे
सद्भावांचीच भव्य दिव्य आगरे
रत्नां वा मौक्तिकांहि मूल्य मुळी नुरे
रमणईची कूस जिथे नृमणिखनि ठरे
शुद्ध तिचे शीलहि उजळवि गृहा

नग्न खड्ग करि, उघडे बघुनि मावळे
चतुरंग चमूचेही शौर्य मावळे
दौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले
भासति शतगुणित जरी असति एकले
यन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा

विक्रम वैराग्य एक जागि नांदती
जरिपटका भगवा झेंडाहि डोलती
धर्म-राजकारण समवेत चालती
शक्तियुक्ति एकवटुनि कार्य साधिती
पसरे यत्कीर्ति अशी विस्मया वहा

गीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो
स्फूर्ति दीप्ति धृतिहि जेथ अंतरी ठसो
वचनि लेखनीहि मराठी गिरा दिसो
सतत महाराष्ट्रधर्म मर्म मनि वसो
देह पडो तत्कारणि ही असे स्पृहा


* कवी - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर         * संगीतकार - शंकरराव व्यास
* मूळ गायक - ललिता फडके, व्ही. जी. भाटकर

मंगल देशा, पवित्रा देशा..


मंगल देशा, पवित्रा देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याहि देशा
अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
बकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा
भावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा
शाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशा
ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;
जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी,
वैभवासि, वैराग्यासी
जरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा, महाराष्ट्र देशा
सह्याद्रीच्या सख्या, जिवलगा, महाराष्ट्र देशा
पाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषा
गोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषा
तुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची
मंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांची
ध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥


* कवी -गोविंदाग्रज * संगीतकार - वसंत देसाई  * मूळ गायक - जयवंत कुलकर्णी व समूह

प्राचीन महाराष्ट्र


प्राचीन महाराष्ट्र :
महाराष्ट्राचा इतिहास आणि ‘महाराष्ट्र’ नावाचा उल्लेख शोधण्यासाठी आपणास प्राचीन कालखंडात जावे लागते. नर्मदा नदीच्या उत्तरेस उत्तरापथ किंवा आर्यावर्त आणि दक्षिणेस ‘दक्षिणापथ’ असे म्हणत. चंद्रगुप्त मौर्यांच्या कालखंडातील आर्य चाणक्य उर्फ कौटिल्य यांनी लिहिलेल्या ‘अर्थशास्त्र’ ग्रंथात अश्मक व अपरान्त या देशांचा उल्लेख आहे. अश्मक म्हणजे अजिंठ्याच्या आसपासचा प्रदेश.

मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरण गावी एक शिलालेख सापडला आहे. तो चौथ्या शतकातील आहे. या शिलालेखात सेनापती सत्यनाग याने स्वत:ला ‘माहाराष्ट्र’ असे म्हणवून घेतले आहे. पुढच्या कालखंडात महानुभाव पंथाचे प्रवर्तक श्रीचक्रधरस्वामी आपल्या शिष्यांना ‘महाराष्ट्री असावे’ असे सांगतात. 

महाराष्ट्र या नावाबरोबरच महाराष्ट्रातील आद्य मानववस्तीचा शोध आपण घेतला, तर आपणास नव्या संशोधनपद्धतीनुसार मिळालेली माहिती आश्र्चर्यकारक असल्याचे दिसते. नासिक, जोर्वे, नेवासे, चांडोली, सोनगाव, इनामगाव, दायमाबाद, नांदूर, मध्यमेश्वर या ठिकाणच्या उत्खननांमधून व अत्याधुनिक अशा ‘कार्बन-१४’ पद्धतीनुसार पुरातत्त्ववेत्यांनी महाराष्ट्रातील आद्य-मानवाचा कालखंड इ.स. पूर्वी सुमारे ५ लक्ष ते ३० लक्ष वर्षे मानला आहे. उपरोक्त व नद्यांच्या काठी झालेल्या उत्खननांतून असा निष्कर्ष इतिहासतज्ज्ञांनी काढला आहे की, आदि-अश्मयुगीन मानव महाराष्ट्रात एक ते दीड लाख वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या परिसरात वावरत असावा. पुढे वसाहती वाढत गेल्या. महाराष्ट्रात बाहेरुन-विशेषत: उत्तरेतून राजांचे प्रतिनिधी म्हणून लष्करी वेशाचे लोक येऊ लागले. मूळचे नागरिक आणि बाहेरुन आलेले यांच्यात सुरुवातीला संघर्ष व नंतर समन्वय झाला.
वरील कालखंडानंतर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाकडे आपण वळलो, तर आपणास महाराष्ट्रातील ठळक जाणवणार्‍या सत्ता पुढीलप्रमाणे दिसतात. सातवाहन घराण्यातील श्री सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी, वाकटकांचा विंध्यशक्ती, द्वितीय प्रवरसेन, चालुक्यांच्या घराण्यातील श्रेष्ठ असा सत्याश्री पुलकेशी, विक्रमादित्य, राष्ट्रकुटांपैकी मानांक, दंतिदुर्ग, प्रथम कृष्ण, ध्रुवराज, गोमंतकातील कदंब घराण्यातील अनंतदेव, अपरादित्य, मध्ययुगीन अशा यादव घराण्यातील द्रुढव्रत, भिल्लम, रामदेवराय या राजांनी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचे योगदान दिले. या राजांच्या ऐतिहासिक योगदानाला तोड नाही.

Sunday, April 4, 2010

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा

एक लाजरा न्‌ साजरा मुखडा, चंद्रावानी खुलला ग
राजा मदन हसतोय कसा कि जीव माझा भुलला ग
ह्या एकांताचा तुला इशारा कळला ग
लाज आडवी येती मला कि जिव माझा भुलला ग
नको रानी नको लाजू, लाजंमदी नको भिजू
हितं नको तितं जाऊ, आडोशाला उबं ऱ्हाऊ
का? ............ बघत्यात !
रेशिम विळखा, घालुन सजना, नका हो कवळुन धरू
लुकलुक डोळं, करुन भोळं, बगतंय फुलपाखरू
कसा मिळवा पुन्हा साजनी मोका असला ग
डोळं रोखुन, थोडं वाकुन, झुकू नका हो फुडं
गटर्गुम गटर्गुम करून कबूतर बघतंय माज्याकडं
लई दिसानं सखे, आज ह्यो धागा जुळला ग
बेजार झाले सोडा सजणा, शिरशिरि आली अंगा
मधाचा ठेवा लुटता लुटता, बघतोय चावट भुंगा
मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला ग ?

गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - राम कदम
स्वर - उषा मंगेशकर, अरुण सरनाईक
चित्रपट - चंदनाची चोळी अंग अंग जाळी

ऐरणिच्या देवा तुला

ऐरणिच्या देवा तुला, ठिणगि ठिणगि वाहु दे
आभाळागत माया तुजी, आम्हांवरी ऱ्हाउ दे
लेउ लेनं गरीबीचं, चनं खाऊ लोकंडाचं
जीनं व्होवं अबरुचं, धनी मातुर, माजा देवा, वाघावानी असू दे
लक्शिमिच्या हतातली चवरि व्हावी वर खाली
इडा पीडा जाइल, आली किरपा तुजी, भात्यांतल्या सुरसंगं गाउ दे !
सूक थोडं, दुक्क भारी, दुनिया ही भली-बुरी
घाव बसंल घावावरी, सोसायाला, झुंजायाला, अंगि बळं येउ दे !

गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - आनंदघन
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट - साधी माणसं (१९६३)
राग - भूप, नट (नादवेध)

छडी लागे छ्मछ्म

छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌
छडी लागे छ्मछ्म, विद्या येई घमघम
छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌
मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल
दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छम्‌ छम्‌ छम्‌
तंबाखूच्या पिचकाऱ्यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
"मोऱ्या मूर्खा- !", "गोप्या गद्ध्या !", देती सर्वा दम
छम्‌ छम्‌ छम्‌
तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी
हसू नका, रडू नका, बोलु नका कोणी
म्हणा सारे एकदम, ओ नमा सिद्ध्म्‌
छम्‌ छम्‌ छम्‌

गीत - वसंत बापट
संगीत - वसंत देसाई
स्वर - पं. हृदयनाथ मंगेशकर
चित्रपट - श्यामची आई (१९५३)

चंद्र आहे साक्षिला

पान जागे फूल जागे, भाव नयनी जागला,
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला
चांदण्याचा गंध आला, पौर्णिमेच्या रात्रिला,
चंद्र आहे साक्षिला, चंद्र आहे साक्षिला !
स्पर्श हा रेशमी, हा शहारा बोलतो
सूर हा, ताल हा, जीव वेडा डोलतो
रातराणीच्या फुलांनी, देह माझा चुंबिला !
लाजरा, बावरा, हा मुखाचा चंद्रमा
अंग का चोरिसी, दो जीवांच्या संगमा
आज प्रीतीने सुखाचा, मार्ग माझा शिंपिला !

गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले, सुधीर फडके
चित्रपट - चंद्र होता साक्षीला (१९७८)