Saturday, April 3, 2010

कशी नशीबाने थट्टा आज मांडली

दहा दिशांनी, दहा मुखांनी, आज फोडिला टाहो,
आसवांत या भिजली गाथा, श्रोते ऐका हो !
माझ्या काळजाची तार आज छेडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
गंगेवानी निर्मळ होतं, असं एक गाव
सुखी समाधानी होतं, रंक आणि राव
त्याची गुणगौरवानं किर्ती वाढली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
अशा गावि होता एक भोळा भाग्यवंत
पुण्यवान म्हणती त्याला, कुणी म्हणे संत
त्याला एका मेनकेची दृष्ट लागली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली
गावासाठी नर्तकीला, नदीपार केली
नार सूड भावनेनं, उभी पेटली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
पिसाळलेल्या नागिणीने थयथयाट केला
नाचगाण्यासाठी सारा गाव येडा झाला
त्यांनी लाज भीड निती सारी सोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
जाब विचाराया गेला, तिने केला डाव
भोवऱ्यात शृंगाराच्या सापडली नाव
त्याच्या पतंगाची दोरी तिने तोडली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
खुळ्या जीवा कळला नाही, खोटा तिचा खेळ
तपोभंग झाला त्याचा पुरा जाई तोल
त्याला कुत्र्या-मांजराची दशा आणली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
जन्मभरी फसगत झाली, तिचा हा तमाशा
जळुनिया गेली आता जगायाची आशा
आज हुंदक्यानं भैरवी मी गायिली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !
याची देही याची डोळा पाहिले मरण
मीच माझ्या हाती देवा रचिले सरण
माझ्या कर्मसोहळ्याची यात्रा चालली
कशी नशीबाने थट्टा आज मांडली !

गीत - जगदीश खेबुडकर
संगीत - राम कदम
स्वर - सुधीर फडके
चित्रपट - पिंजरा (१९७२)

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
माझ्या पिरतीची रानी तू होशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय !
तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय !
गं तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं
माझं कालिज भोलं, त्याच मासोली झालं
माझ्या पिरतीचा, सुटलाय तुफान वारा वारा वारा
रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसूद चोरा
तुझ्या नजरंच्या जादूला, अशी मी भुलणार नाय
रं माझ्या रूपाचा ऐना, तुझ्या जीवाची दैना
मी रे रानाची मैना, तुझा शिकारी बाणा
खुळा पारधी गं, जाळ्यामंदी आला आला आला
गं तुला रुप्याची नथ मी घालीन
गं तुला मिरवत मिरवत नेईन
तुज्या फसव्या या जाल्याला, अशी मी गावनार नाय
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार ......हाय !
तुझ्या पिरतिचि रानी मी होनार हाय !

गीत - सुधीर मोघे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - आशा भोसले, हेमंत कुमार
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा (१९७६)

जिजाबाई

जिजाबाई (१५९४-१६७४) ही सिंदखेडच्या लखुजी जाधवांची कन्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. ई.स. १६०५ मध्ये जिजाबाई आणि शहाजीराजांचा विवाह झाला. पुढे लखुजी जाधव व शहाजी राजे यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला असता, जिजाबाई आपल्या पतीशी कायम एकनिष्ठ राहिल्या. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती

संस्कृतीची जोपासना

महाराष्ट्राची म्हणून एक वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. संस्कृती म्हणजे जगण्यासाठीची मूल्ये, आचरणाचे नियम, रूढी, चाली-रीती, व्यवहार, आपली भाषा, सण, उत्सव, इतिहास, भौगोलिक परिस्थिती, थोर व्यक्ती, परंपरा यांतून संस्कृती प्रत्येक नव्या पिढीकडे पोहोचते. बदलत्या काळाप्रमाणे येणार्‍या पिढीला त्यात काही फेरफार करावे लागतात, पण वागण्याचे नियम-मूल्ये यात मात्र मोठे बदल होत नाहीत. सण-उत्सव, प्रथा, परंपरा या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीला वारशाने समजतात. त्याविषयीचे वाचन, अभ्यास औपचारिकपणे सर्व जण करत नसले, तरी मौखिक परंपरेने, अनुकरणाने, निरीक्षणाने त्या वर्षानुवर्षे सुरूच राहतात.

मुख्यत: शेतीप्रधान संस्कृती व ग्रामीण भागात वास्तव्य करणारी लोकसंख्या महाराष्ट्रात अधिक आहे. निसर्गाशी अगदी जवळचा संबंध असणारे कष्टकरी अत्यंत देवभोळे, श्रद्धाळू, पापभिरू असल्याने बर्‍याच व्रत-वैकल्यांत आणि उपचारांत समाधान व आनंद मानणारे आहेत. तसेच शिक्षित समाजही रूढी, परंपरा, सण-उत्सव यात कसा वेळ देतो, का वेळ देतो हेही समजून घेण्याजोगे आहे.

दैनंदिन कामातून थोडे वेगळे होऊन; नातलग, शेजारी, गावकरी, सहकारी यांच्या सोबतीने एकत्र येऊन आनंद साजरा करणे, या हेतूने महाराष्ट्रात अनेक उत्सव, सण साजरे केले जातात. हवामान, ऋतू आणि त्या-त्या ऋतूत असणारी फळे, फुले, झाडे, त्यांचा औषधी उपयोग याचा अभ्यास करून पूर्वापार हे सण-उत्सव, व्रतं पाळली जातात. आयुर्वेद-औषधी शास्त्र हे अतिशय प्रगत शास्त्र म्हणून उपयोगात आणले जात होते असेही त्यावरून लक्षात येते. वनौषधी, फुले ऋतूमानाप्रमाणे उगवतात व कोमेजतात. आपल्या सणावारात ऋतूमानाप्रमाणे येणार्‍या पिकांचाही फार विचार केलेला आहे असे लक्षात येते.

आचरणाचे नियम हेदेखील त्यामुळे निसर्गातील बदलांचा विचार करून ठरवलेले आहेत. आपल्या आहारात कोणते घटक केव्हा यावेत, कसे यावेत याचा अभ्यास पूर्वीपासून होत असावा. त्यामुळे बदलत्या हवेनुसार सणांना करण्याचे पदार्थही त्यादृष्टीने ठरवलेले आहेत. या अर्थाने खाद्यसंस्कृतीही सण-उत्सवांशी जोडल्याचे स्पष्टपणे दिसून येते.

पारंपरिक पद्धतीने आज सण सर्वत्र साजरे होत नाहीत. त्यात व्यावहारिक अडचणीही आहेत. तरीही महाराष्ट्रात सण-उत्सव धार्मिक पद्धतीने साजरे करणे, लोकांनी एकत्र येण्यासाठीचे माध्यम म्हणून आजही सुरू आहे. महाराष्ट्रातून इतर राज्यांत, देशांत जाणारे लोक त्यांच्यासोबत त्या पद्धती घेऊन जातात. त्यामुळे अनेक मराठी सण-उत्सव जगाच्या कानाकोपर्‍यातही साजरे होतात असे दिसते.

जाती-धर्मात विभागलेल्या आपल्या समाजाला भेद-भाव विसरून एकत्र येण्यासाठी काही उत्सव सार्वजनिक पद्धतीने साजरे करण्याची पद्धत आपल्या समाजसुधारकांनी शिकवली. उत्सवांचा समाज प्रबोधन करण्यासाठी एक महत्त्वाचे माध्यम म्हणून वापर समाजसुधारकांनी केला.

काही धार्मिक चालीरिती लोकांत भेदभाव करणार्‍या, अंधश्रद्धा पसरवणार्‍या असल्याचे पाहून संतांनी एक प्रबोधनाची चळवळ महाराष्ट्रात सुरू केली. संत ज्ञानेश्र्वर,
संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत गोरोबा,संत चोखामेळा, संत मुक्ताबाई,संत जनाबाई, समर्थ रामदास यांनी समाजाला एकत्र येण्याची, भेदभाव विसरण्याची, समानतेची शिकवण दिली. काही उत्सव सामान्य जनतेला चांगल्या मार्गाने जगण्याची शिकवण देण्यासाठी, नीतीनियमांनी समाजाला बांधून ठेवण्यासाठीही सुरू केले. शिक्षणाने, विज्ञानाच्या प्रसार-प्रचारामुळे काही सण, उत्सव, चालीरिती यांचे स्वरूप आधुनिक काळात बदलत आहे. त्यात असणार्‍या अंधश्रद्धांना वगळून सण वा उत्सव साजरे व्हावेत, व्रतं पाळली जावीत हीच संतांचीही प्रबोधनाची चळवळ होती.

महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांमुळे आजही अनेक राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील सांस्कृतिक वातावरण निराळे आहे. त्याला अध्यात्माची, तत्त्वज्ञानाची, इतिहासाची आणि मानवजातीच्या कल्याणाची सांगड घालून आपले सण-उत्सव साजरे करण्याची प्रथा आहे. मानवाच्या कल्याणाचे, त्याच्या प्रगतीचे बीज घराघरात पोहोचवण्याचे काम त्यामुळे संस्कृतीच्या माध्यमातून होते असे दिसते.

‘संस्कृती’ या शब्दाला आलेला सध्याचा अर्थ फार वरवरपणे व्यवहारात वापरला जातो आहे. पण मुख्यत: उन्नत समाजासाठी, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकसित होण्यासाठी आणि व्यापक समाजहितासाठी असलेले आचार-विचार-विहाराचे व्यक्तीसाठीचे नियम, शिष्टाचार यांसाठी वापरलेला शब्द म्हणजे ‘संस्कृती’.

आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत आपले सणवार, व्रतं आणि उत्सवदेखील ऋतुमानाप्रमाणे - सूर्य-चंद्र-ग्रहस्थितीच्या अनुसार -ठरलेले आहेत. मराठी दिनदर्शिकेनुसार ग्रहस्थितीप्रमाणे - पृथ्वी आणि इतर ग्रहांच्या स्थानाप्रमाणे - कालमापनाच्या पद्धती ठरल्या. त्याप्रमाणे तिथीला मराठी दिनदर्शिकेत महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक सण-दिवस हे तिथीनुसार ठरलेले दिवस - तेही निसर्गावर आधारित असेच आहेत.


भारतात कालमापनासाठी फार पूर्वापार चालत आलेली पंचांग पद्धती आजही उपयोगात आणली जाते. धर्मशास्त्रांसंदर्भातील ग्रंथांतून त्याबद्दलचे संदर्भ सापडतात. सण-उत्सव हे त्या पंचांगानुसार ठरवण्याची प्राचीन पद्धत आहे. पूर्वी मोजक्या शिक्षित - ब्राह्मण जातीच्या लोकांपुरते असलेले हे ज्ञान आता शास्त्ररूपात, गणिती पद्धतीने सर्वच लोकांसाठी खुले आहे. त्यानुसार सण-उत्सव ठरून ते छापील पद्धतीने सर्वांसाठी उपलब्ध असतात. २७ नक्षत्रे, १५ तिथी, ७ वार, २७ योग असे पंचांग भारतात इसवीसनपूर्व ४०० वर्षांपासून प्रचलित असावे असे संदर्भ मिळतात. 

लता मंगेशकर

लता मंगेशकर (जन्म: सप्टेंबर २८, १९२९) भारताच्या महान गायिका आहेत. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. संगीत-विश्वात त्यांना 'लता-दीदी' म्हणून ओळखले जाते. लता-दीदीच्या कारकीर्दीची सुरूवात १९४२ मध्ये सुरू झाली आणी सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, इतर वीस वर प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये (प्रामुख्याने मराठी) गायन केले आहे. लता-दीदींचा परिवार संगीतासाठी प्रसिद्ध असून, त्यांच्या भावंडांमध्ये सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणी ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर समाविष्ट आहेत. लता-दीदींचे वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' प्राप्त होणार्‍या गायक-गायिकांमध्ये लता-दीदींचे नाव दुसर्‍या क्रमांकावर आहे.

लता-दीदींचे नाव 'गिनेस बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड्स' मध्ये १९७४ ते १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नमूद आहे.

बालपण
लता मंगेशकरांचा जन्म मध्य प्रदेश (ब्रिटिश काळात सेंट्रल इंडिया एजंसी) च्या इंदोर शहरात शीख मोहल्ला येथे एका महाराष्ट्रीय कुटुंबात झाला. त्यांचे पाळण्यातले नांव हृदया. त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलाकार होते.गणेश भट अभिषेकी हे कर्‍हाडे ब्राह्मण त्यांचे पिता. त्यांच्या मातोश्री, शुद्धमती ह्या मा. दिनानाथांच्या द्वितीय पत्नी होत्या. कुटुंबाचे आडनाव हर्डीकर होते; दिनानाथांनी आपले मूळ गाव मंगेशी - (गोवा) वरून आडनाव मंगेशकर असे बदलले. लता-दीदी आपल्या आई-वडिलांचे सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणी हृदयनाथ ही त्यांची लहान भावंड.

लताला पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या पाचव्याच वर्षी तिने वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरूवात केली. वडिलांच्या गायनाचा आणी धड्यांचा तिच्यावर ठसा उमटला.

चित्रपटसृष्टीत १९४० च्या दशकात सुरूवातीची कारकीर्द
१९४२ मध्ये लता-दीदी अवघ्या १३ वर्षांच्या होत्या, तेव्हा वडील हृदयविकाराने निवर्तले. तेव्हा मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक - मास्टर विनायक ह्यांनी लता-दीदींच्या परिवाराची काळजी घेतली. त्यांनी लता-दीदींना गायिका आणी अभिनेत्री म्हणून कामाची सुरूवात करून दिली.

लता-दीदीने नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या किती हसाल (१९४२) ह्या मराठी चित्रपटासाठी गायले, पण हे गाणे चित्रपटातून वगळले गेले. मास्टर विनायकांनी लतादीदींना नवयुगच्या पहिली मंगळागौर (१९४२) ह्या मराठी चित्रपटात एक छोटी भुमिका दिली. ह्या चित्रपटात त्यांनी नटली चैत्राची नवलाई हे दादा चांदेकरांनी स्वरबद्ध केलेले गीत गायले. १९४५ मध्ये जेव्हा मास्टर विनायकांच्या कंपनी-कार्यालयाचे स्थानांतर मुंबईस झाले, तेव्हा लतादीदीही मुंबईला आल्या. त्या उस्ताद अमानत अली खाँ(भेंडीबाजारवाले) ह्यांच्याकडून हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीत शिकू लागल्या. त्यांनी वसंत जोगळेकरांच्या आपकी सेवामें (१९४६) ह्या हिंदी चित्रपटासाठी पा लागूं कर जोरी हे गाणे गायले (दत्ता डावजेकर हे त्या गाण्याचे संगीतकार होते). लता आणी आशा (बहिण) यांनी मास्टर विनायकांच्या पहिल्या हिंदी चित्रपटात (बडी माँ - १९४५) नूर जहाँ सोबत छोट्या भूमिका केल्या. त्या चित्रपटात लतादीदीने माता तेरे चरणोंमें हे भजन गायले. मास्टर विनायकांच्या दुसर्‍या हिंदी चित्रपटाच्या (सुभद्रा - १९४६) ध्वनिमुद्रणाच्या वेळेस लतादीदीची ओळख संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली.

१९४७ मध्ये भारताच्या फाळणीनंतर उस्ताद अमानत अलीखाँ भेंडीबाजारवालेंनी नवनिर्मीत पाकिस्तानला देशांतर केले, तेव्हा लतादीदी उस्ताद अमानत खाँ(देवासवाले) यांचेकडून शास्त्रोक्त संगीत शिकायला लागल्या. उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांचे शिष्य पंडित तुलसीदास शर्मांकडून ही दीदींना तालीम मिळाली.

१९४८ मध्ये मास्टर विनायकांच्या मृत्यूनंतर संगीतकार गुलाम हैदरांनी लताजींचे मार्गदर्शन केले. त्या काळात हिंदी चित्रपटांमध्ये नूर जहाँ, शमशाद बेगम आणि जोहराबाई(अंबालेवाली), ह्यांसारख्या अनुनासिक आणी जड आवाज असलेल्या गायिका जास्त लोकप्रिय होत्या.

ग़ुलाम हैदरांनी लताजींची ओळख तेव्हा शहीद (१९४८) ह्या हिंदी चित्रपटावर काम करी असलेले निर्माते शशाधर मुखर्जींशी केली, पण मुखर्जींनी लताचा आवाज "अतिशय बारीक" म्हणून नाकारला. तेव्हा हैदरांचे थोड्या रागात उत्तर होते - येणार्‍या काळात निर्माते आणी दिग्दर्शक लताचे पाय धरतील आणी आपल्या चित्रपटांसाठी गाण्याची याचना करतील. हैदरांनी लतादीदींना मजबूर (१९४८) ह्या चित्रपटात दिल मेरा तोडा हे गाणे म्हणण्याची मोठी संधी दिली.

सुरूवतीला लता आपल्या गाण्यात तेव्हाच्या लोकप्रिय असलेल्या नूर जहाँचे अनुकरण करीत असे, पण नंतर लतादीदीने स्वतःच्या गाण्याची एक आगळी शैली बनवली. त्या काळात हिंदी चित्रपटांतल्या गाण्यांचे गीतकार प्रामुख्याने मुस्लीम कवी असत, त्यामुळे गाण्यांच्या भावकाव्यात भरपूर हिंदुस्तानी शब्द असत. एकदा सुप्रसिद्ध अभिनेता दिलीप कुमार कडून लतादीदीला हिंदी/हिंदुस्तानी गाण्यातील "मराठी" उच्चारांसाठी हलकी अस्विकृती दाखवणारा शेरा मिळाला, तेव्हा लताने शफ़ी नावाच्या मौलवींकडून हिंदुस्तानी उच्चारांचे धडे घेतले.

लोकप्रिय चित्रपट महल (१९४९) चे आयेगा आनेवाला हे गाणे लताच्या कारकीर्दीला एक महत्वाचे वळण देणारे ठरले. (गाण्याचे संगीतकार खेमचंद प्रकाश होते, तर चित्रपटात गाणे अभिनेत्री मधुबाला ने म्हटले होते.)

 १९५० च्या दशकात उत्कर्ष
१९५० च्या दशकात लताने ज्या संगीत दिग्दर्शकांनी स्वरबद्ध केलेली गाणी गायिली, अशा नामांकित संगीतकरांची नावे - अनिल विश्वास, शंकर-जयकिशन, नौशाद, सचिन देव बर्मन, सी. रामचंद्र, हेमंत कुमार, सलिल चौधरी, खय्याम, रवी, सज्जाद हुसेन, रोशन, मदन मोहन, कल्याणजी आनंदजी, वसंत देसाई, सुधीर फडके, हंसराज बहल आणी उषा खन्ना. (सुप्रसिद्ध संगीतकार ओ.पी. नय्यर हे असे एकमेव अपवाद होते ज्यांनी आपल्या रचनांसाठी लताऐवजी आशा भोसलेना जास्त प्राधान्य दिले.)

संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखाली बैजु बावरा (१९५२), मुग़ल-ए-आज़म (१९६०) आणी कोहिनूर (१९६०) ह्या चित्रपटांसाठी लताने शास्त्रोक्त संगीतावर आधारित काही गाणी गायिली. लताने नौशादांसाठी गायिलेले पहिले गाणे हे जी.एम.दुर्राणींसोबतचे द्वन्द्वगीत छोरेकी जात बडी बेवफ़ा आहे. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी शंकर-जयकिशन यांनी तर आपल्या जवळजवळ सर्व चित्रपटांच्या(विशेषतः राज कपूर च्या ) गाण्यांच्या गायिका म्हणून लतादीदींचीच निवड केली. अशा चित्रपटांमध्ये आग, आह, (१९५३), श्री ४२० (१९५५) आणि चोरी चोरी (१९५६) यांचा समावेश आहे. १९५७ पर्यंत सचिन देव बर्मन आपल्या बहुतेक चित्रपटगीतांच्या प्रमुख गायिका म्हणून लतादीदीचीच निवड करीत, उदा. सज़ा (१९५१), हाउस नं. ४४, (१९५५) आणी देवदास (१९५५). पण १९५७ ते १९६२ च्या काळात बर्मनदादांनी लतादीदी ऐवजी गीता दत्त आणी आशा भोसले ह्या गायिकांबरोबर आपली सर्व गाणी बसवली.

१९५० च्या दशकात लताबरोबर अतिशय लोकप्रिय गाणी बनवणार्‍यांपैकी एक सलिल चौधरी होते. लतादीदीला "सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका" म्हणून सर्वप्रथम फ़िल्मफ़ेयर पारितोषिक सलिल चौधरींनी स्वरबद्ध केलेल्या आजा रे परदेसी ह्या मधुमती (१९५८) मधील गीतासाठी मिळाले.

१९६०चे दशक
१९६०च्या दशकात लता मंगेशकर निर्विवादपणे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रथम श्रेणीच्या पार्श्वगायिका ठरल्या. ह्या काळात लताने जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनीमुद्रित केली, ज्यांपैकी अनेक गाणी अजरामर झाली. १९६० मध्ये प्यार कीया तो डरना क्या हे मुग़ल-ए-आज़म (१९६०) चे नौशादने संगीतबद्ध केलेले आणी मधुबालावर चित्रीत गाणे तुफान लोकप्रिय झाले. हवाई-धरतीचे अजीब दास्ताँ है ये हे शंकर-जयकिशन दिग्दर्शित आणी दिल अपना प्रीत पराई (१९६०) मध्ये मीना कुमारी वर चित्रीत गाणेही अतिशय प्रसिद्ध झाले.

१९६१ मध्ये लतादीदीने बर्मनदादांचे सहाय्यक जयदेव यांसाठी अल्ला तेरो नाम हे भजन गाण्याचे पाऊल उचलुन बर्मनदादांसोबत पुन्हा वाटचाल सुरू केली.

१९६२ मध्ये लताने बीस साल बाद चित्रपटातील कहीं दीप जले कहीं दिल ह्या हेमंत कुमार-दिग्दर्शित गाण्यासाठी दुसरे फिल्म फेअर पुरस्कार पटकावले.

२७ जून १९६३ ला, भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लतादीदीने कवी प्रदीप लिखीत आणी सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ऐ मेरे वतन के लोगों हे देशभक्तिगीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणार्‍या जवानांना श्रद्धांजलि वाहणारे गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रु उभे झाले.

१९६३ मध्ये सचिन देव बर्मन बरोबर पुन्हा गाणे सुरू केल्यानंतर लतादीदीने गाईड (१९६५) मधील आज फिर जीनेकी तमन्ना है, पिया तोसे नैना लागे रे, गाता रहे मेरा दिल (किशोर कुमार सोबत युगलगीत) तसेच ज्वेल थीफ़ (१९६७) मधील होटोंपे ऐसी बात यांसारखी बर्मनदादांची अनेक लोकप्रिय गाणी म्हटली.

१९६० च्या दशकात लतादीदीने मदनमोहन ह्या आपल्या आवडत्या संगीतकाराची अनेक गाणी म्हटली. अशा गाण्यांमध्ये अनपढ (१९६२) चे आपकी नज़रोंने समझा, वो कौन थी (१९६४) ची लग जा गले, नैना बरसे तसेच मेरा साया (१९६६) चे तू जहां जहां चलेगा ह्या सुरेल गाण्यांचा विशेष उल्लेख होतो.

१९६० च्याच दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल ह्या नवोदित संगीतकार-जोडीची जवळ-जवळ सर्व गाणी लतानेच म्हटली. लता मंगेशकरच्या गाण्यांमुळेच ही जोडी हिंदी चित्रपटसंगीत क्षेत्रात अजरामर झाली. पारसमणी (१९६३) ह्या लक्ष्मी-प्यारे जोडीच्या पहिल्या-वहिल्या चित्रपटातली लताची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. लतादीदीने मराठी सिनेमांसाठी अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी ज्या नामांकित संगीतकारांबरोबर काम केले, त्यांमध्ये ह्रुदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभु, श्रीनिवास खळे आणी सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख होतो. लतादीदीने स्वतः 'आनंदघन' ह्या उपनावाखाली मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत. १९६० आणी १९७० च्या दशकांमध्ये लताने संगीतकार सलिल चौधरी आणी हेमंतकुमारांची बांगला भाषेतली गाणीही म्हटली आहेत.

लता मंगेशकरने (मुकेश, मन्ना डे, महेंद्र कपूर, मोहम्मद रफी आणी किशोर कुमार यांसारख्या त्या काळातील सर्व प्रसिद्ध गायकांबरोबर युगलगीते गायिली आहेत.

अभिजात संगीतात उस्ताद आमिरखा आणि उस्ताद बडे गुलामअली हे त्यांचे आवडते गायक आहेत.

सचिन तेंडूलकर

गेली 20 वर्ष सतत धावांचा पाऊस पाडणारा सचिन रमेश तेंडुलकर याची प्रत्येक खेळी एक नवीन विक्रमास जन्म देते. विक्रम हा त्याच्या आयुष्याचा एक भाग आहे. यामुळे सचिन आणि विक्रम हे समीकरणही घट्ट जमले आहे. विक्रमादित्य सचिनने गुरुवारी (ता.पाच नोव्हेंबर 2009) पुन्हा एक विक्रम केला. 17 हजार धावा पूर्ण करुन त्याने आपल्या विक्रमात पुन्हा एकाने भर घातली. 17 हजार धावा करताना 175 धावांची सर्वोत्कृष्ट खेळी तो खेळला. क्रिकेटमधील असा फटका नव्हतो जो सचिनने या खेळी दरम्यान मारला नव्हता.

सचिनने 18 डिसेंबर 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पहिल्या एक हजार धावा त्याने 1992 मध्ये 36 व्या सामन्यातच पूर्ण केल्या. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. मजल, दलमजल करीत 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने दहा हजार धावा पूर्ण केल्या. त्यानंतर सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम त्याने आपल्या नावावर केला. त्या विक्रमापासून इतर फलंदाज खूप लांब आहे. आता तो विक्रमांचा एव्हरेस्टवर उभा राहिला आहे. भविष्यातही कोणत्याही खेळाडूंना त्याचा विक्रमाचा एव्हरेस्ट सर करणे अवघडच नाही तर अशक्य होणार आहे. सचिनच्या नावावर आज एकदिवसीय सामन्यात 45 तर कसोटी सामन्यात 42 शतके मिळून 87 शतके आहेत. एकूण 144 अर्धशतके त्याने केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 17,168 धावा झाल्या आहेत. तर कसोटीत 159 सामन्यात त्याने 12,773 धावा केल्या आहेत.एकूण 29,951 धावांवर तो नाबाद आहे. त्याच्या या विक्रमांपासून इतर खेळाडू खूप लांब आहेत.

गुरुवारी हैदराबादमध्ये खेळताना तो दणक्यात खेळला. त्याचा फटक्यांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले होते. परंतु त्याच्या विक्रमाबरोबर भारत सामना जिंकला असता तर दुधात केशर पडल्याचा आनंद त्याच्यासह सर्वांना झाला असता. सतरा हजाराच्या या टप्प्याने सचिनला याआधीही अनेकदा हुलकावणी दिली होती. चॅंपियन्स चषक स्पर्धेत पाकविरुद्धच्या सामन्यात सचिन लवकर बाद झाला नसता, तर त्या वेळीच हा पल्ला त्याला गाठता आला असता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पुढील सामना पावसामुळे रद्द झाला, तर वेस्ट विंडीजविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो हॉटेलच्या खोलीत कोसळल्याने सामना खेळू शकला नव्हता. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत अपयशी ठरल्याची टीका होण्यापूर्वी त्याने आपल्या बॅटने उत्तर दिले. कारण यापूर्वी त्याची खेळी 18 (बडोदा), 4 (नागपूर) 32 (दिल्ली) 40 (मोहाली) अशी झाली होती. दिल्लीच्या सामन्यात तो धावचित झाला होतो तर मोहालीत पंच अशोक डिसिल्व्हाच्या चुकीच्या निर्णयाचा तो बळी ठरला. (डिसिल्व्हा आणि बकनर हे सचिन मागे लागलेले शनीच आहे.) नाहीतर 17 हजाराचा टप्पा त्याने मोहालीत पार केला असता.

विक्रमादित्य सचिन आजही तसाच नम्र आहे, जसा तो 20 वर्षांपूर्वी होतो. त्याच्या डोक्यात हवा गेली नाही. त्याचे पाय कायम जमिनीवर असतात. त्याच्या बोलण्यात वा वागण्यात उद्धटपणा आला नाही किंवा अहंभाव आला नाही. आपल्यावर केलेल्या टीकेला तो स्वत: कधीही उत्तर देत नाही. परंतु आपल्या बॅटनेच टीकाकारांना त्याच्याकडून उत्तरे मिळत असतात. मैदानावर असूनही त्याच्याबद्दल कोणताही प्रवाद उठला नाही. यामुळे क्रिकेटचा तो दैवत झाला आहे. त्याची लोकप्रियता भारतातच नाही तर जगभरात पसरली आहे. सर डॉन ब्रॅडमनपासून ब्रायन लारापर्यंत सर्वच खेळाडूंनी त्याचे श्रेष्ठत्व मान्य केले आहे.

सचिन बॅड पॅचमध्ये आला की त्याला निवृत्तीचे सल्ले देणार्‍या सल्लागारांचे पीक काँग्रेस गवतासारखे उगवते. परंतु चांगल्या खेळीने तो त्यांना उत्तर देतो. आपणास क्रिकेटचा आनंद लुटायचा असल्याचे सांगून तो सर्वांना टोलवून लावतो. भारतासाठी खेळत राहून धावांची भूक अशीच कायम ठेवण्याचे त्याचे स्वप्न आहे. देशाला विश्वकरंडक जिंकून देण्याची त्याची महत्वाकांक्षा आहे.


माझा विक्रम कुणा भारतीयानेच मोडावा- सचिन


विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. पण माझा विक्रम कुणा भारतीय फलंदाजाने मोडल्यास विशेष आनंद वाटेल, अशी नम्र प्रतिक्रिया एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावून विश्वविक्रम करणार्‍या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केली आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल्या चार दशकांत कधीही द्विशतक झळकावले गेले नव्हते. सचिनने  ग्वाल्हेरच्या मैदानावर त्या कामगिरीलाही गवसणी घातली. पण आपला हा विक्रमही कधी ना कधी मोडला जाईल, याची नम्र जाणीवही त्याला आहे.

'कोणताच विक्रम अभेद्य नसतो. विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. पण हा विक्रम कुणा भारतीयाने मोडला हे पहायला मला आवडेल', असे सांगून सचिनने हे द्विशतक त्याच्या चाहत्यांना अर्पण केले.

सचिन नेहमी विक्रमासाठी खेळतो, अशी टीका त्याच्यावर केली जाते. त्याला उत्तर देताना तो म्हणाला, 'मी कधीही विक्रमांसाठी खेळत नाही. आनंदासाठी आणि माझ्या खेळाविषयक असलेल्या निष्ठेपायी खेळतो. मी खेळायला सुरवात केली, तेव्हा विक्रम मोडण्यासाठी म्हणूनही मी कधी मैदानात उतरलो नव्हतो, याची आठवणही त्याने करून दिली. 

विरुंगुळा



कृपया ही व्यंगचित्र फ़क़्त मनोरंजनाच्या दृष्टीने अपलोड केली आहेत याची नोंद घ्यावी. कुठलाई कॉपीराईट वापरण्याचा माझा हेतू नाही.