Friday, April 2, 2010

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा :

ज्येष्ठ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा विवाहीत स्त्रिया करतात, तीच वटपौर्णिमा होय. सत्यवान आणि सावित्री यांच्या कथेमुळे या व्रताबद्दल महिलांना सविस्तर समजते. वडाच्या झाडाला पाणी घालून त्याच्याभोवती सूत गुंडाळणे आणि प्रदक्षिणा घालणे तसेच त्या दिवशी उपास करणे असे व्रत महिला करतात. प्रदिक्षणा घालताना ७ जन्म सौभाग्य राहावे, पतीची साथ लाभावी अशी प्रार्थना महिला या वेळी करतात.

पत्नीची पतिनिष्ठा आणि प्रेम सांगणारे हे व्रत वडाच्या झाडाशी जोडले आहे हे त्याचे वैशिष्ट्य. अनेक पिढ्यांना सोबत करणारे हे झाड दीर्घायुषी आहे. याचा वृक्ष होण्यास बरीच वर्षे लागतात. त्याची मुळे खोलवर जातात आणि वृक्षाचा पसारा प्रत्येक पारंबीद्वारे सतत वाढत जातो. वडाच्या पारंब्या, त्याचा चीक यात औषधी गुण आहेत, त्यामुळे त्याचे महत्त्व आहेच. अनेक पक्ष्यांना घरट्यात निवारा, चालून थकलेल्यांना झाडाखाली विसावा यासाठी वडाची छाया आधार देते. असे वृक्ष असणे निसर्ग-संतुलनाच्या दृष्टीने गरजेचे आहे. या व्रताच्या निमित्ताने महिलांचा संपर्क या समृद्ध-संपन्न अशा वृक्षाशी येतो.


सत्यवान आणि सावित्री यांची कथा:

सती सावित्रीची कथा महाभारतात आली आहे. पांडव वनवासात असतांना जयद्रथाने द्रौपदीचे हरण केले. जयद्रथाचा पराभव करून परतलेले युधिष्ठिरादी पांडव आणि द्रौपदी ऋषीमुनींसह बसले असतांना मार्कंडेय ऋषींनी सावित्रीची कथा सांगितली. प्रात:स्मरणीय अशा पंचकन्यांमध्ये जिचा समावेश आहे, अशा द्रौपदीला मुख्यत्वेकरून ही कथा सांगण्यात आली. त्यावरूनही सावित्रीचे महत्त्व लक्षात येते. आज असणार्‍या वटपौर्णिमेनिमित्त सती सावित्रीचे हे पुण्यस्मरण !

सत्यवानाची निवड

एके दिवशी देवर्षी नारद राजा अश्‍वपतीच्या राजसभेत आले. राजाने त्यांचा सन्मान केला. ते दोघे परस्परांशी संवाद करत असतांनाच सावित्री परत आली. सभेत येताच तिने आपल्या पित्याला व नारदांना वंदन केले. नारदांनी तिच्याकडे एकवार दृष्टीक्षेप टाकून राजाला विचारले, ``या कन्येचा विवाह अजून झाला नाही असे दिसते, याचे कारण काय ?'' तिला वरसंशोधनासाठी पाठवल्याचे राजाने नारदांना सांगितले आणि मधल्या काळात काय घडले, ते सावित्रीला कथन करण्यास सांगितले.
राजाच्या सांगण्यावरून सावित्री म्हणाली, ``शाल्व देशात द्युमत्सेन नावाचा एक प्रसिद्ध धर्मात्मा राजा होता. काही काळानंतर तो अंध झाला. त्याचा पुत्रही लहान होता. ही संधी साधून शेजारच्या राजाने त्याचे राज्य बळकावले. तेव्हा द्युमत्सेन आपल्या राणी व पुत्रासह वनात निघून गेला व तेथेच तपस्वी जीवन जगू लागला. त्याचा आता तरुण झालेला सत्यवान नावाचा पुत्र मला योग्य वर वाटला आणि त्यालाच मी मनाने वरले आहे.'' सत्यवानाच्या गुणांचे कौतुक करून नारद म्हणाले, ``या सत्यवानाचे मातापिता सत्यवादी असल्याने ब्राह्मणांनी त्याचे नाव सत्यवान ठेवले आहे. राजा, तरीही एक फार दु:खाची गोष्ट आहे, आजपासून एक वर्षाने सत्यवान मृत्यू पावणार आहे.'' आपल्या भावी पतीचे आयुष्य फक्‍त एक वर्षाचे आहे, हे कळूनही सावित्री विचलीत झाली नाही. ते पाहून नारद म्हणाले, ``राजा, तुझ्या मुलीची-सावित्रीची बुद्धी निश्चयात्मक आहे, म्हणून तिला कोणत्याही प्रकारे या निर्णयापासून विचलित केले जाऊ शकत नाही. सत्यवानात जे गुण आहेत, ते कोणत्याही दुसर्‍या पुरुषात नाहीत. म्हणून मलाही असेच वाटते की, तू त्यालाच कन्यादान करावे.''
एका शुभमुहूर्तावर सत्यवान-सावित्रीचा विवाहसंस्कार झाला. पतीगृही आल्यावर सावित्रीने आपली मौल्यवान वस्त्रे व अलंकार उतरवून ठेवले. तिची नम्रता, सेवा, संयम इत्यादी गुण पाहून सर्वांनाच संतोष झाला. मधुर भाषण, सेवेतील तत्परता, संयम आदी गुणांनी तिने सासू-सासर्‍यांना, तर मनोभावे सेवा करून पतीलाही प्रसन्न ठेवले. काही काळ आनंदात गेला.

सत्यवानाचे प्राणहरण
सावित्री मनाशी एक-एक दिवस मोजत होती. नारदांचे बोल तिच्या स्मरणात होते. जेव्हा तिच्या लक्षात आले की आजपासून चौथ्या दिवशी सत्यवानाचा अंतसमय आहे, तेव्हा तीन रात्री अगोदर तिने व्रत धारण केले. रात्रंदिवस ती अगदी स्थिर होऊन बसून राहिली. पतीच्या मृत्यूदिनाची आधीची रात्र तिने जागून काढली. दुसर्‍या दिवशी दैनंदिन कामे उरकून सूर्य आकाशात थोडा वर आल्यावर तिने अग्नीला आहुती दिल्या. सत्यवान हातात कुर्‍हाड घेऊन समिधा व फळे आणण्यासाठी वनात जाण्यास निघाला. सावित्रीही सासू-सासर्‍यांची अनुज्ञा घेऊन सत्यवानाबरोबर जायला निघाली. वनात काम करता करता सत्यवान सावित्रीला म्हणाला, ``मला थकवा आला आहे. मी आता झोपू इच्छितो.'' हे ऐकून सावित्री त्याच्याजवळ आली. भूमीवर बसून तिने त्याचे मस्तक मांडीवर घेतले. तितक्यात तेथे तिला एक पुरुष दिसला. त्याची वस्त्रे लाल असून त्याच्या डोक्यावर मुकुट होता. त्याचे डोळे लाल होते. हातात पाश होता व तो अत्यंत भयंकर दिसत होता. तो सत्यवानाजवळ उभा राहून त्याच्याकडेच पहात होता. त्याला पाहून सावित्रीने सत्यवानाचे मस्तक भूमीवर ठेवले व ती उभी राहिली. तिचे हृदय धडधडत होते. अतिशय दु:खी होऊन हात जोडून ती त्याला म्हणाली, ``आपण कोणी देवता आहात, असे मी समजते. आपली इच्छा असल्यास मला सांगा की, आपण कोण आहात व येथे काय करू इच्छिता ?'' ती देवता म्हणाली, ``सावित्री, तू पतिकाता व तपस्विनी आहेस. म्हणून मी तुझ्याशी बोलेन. मी यमराज आहे. सत्यवानाचे आयुष्य संपले आहे. हा धर्मात्मा गुणांचा सागरच आहे. त्यामुळे त्याला नेण्यासाठी मी स्वत: आलो आहे. आता मी याला पाशात बांधून घेऊन जाणार आहे.'' असे बोलून सत्यवानाच्या शरीरातून अंगुष्ठमात्र पुरुष आपल्या पाशात बांधून यमराज दक्षिणेकडे जाण्यास निघाले. तेव्हा दु:खाने व्याकुळ झालेली सावित्रीही त्यांच्यामागोमाग जाऊ लागली.

यमधर्माकडून पहिला वर
काही अंतर गेल्यावर यमराज म्हणाले, ``सावित्री, तू परत जा. आता याची उत्तरक्रिया कर. तू पतीसेवेच्या ऋृणातून मुक्‍त झाली आहेस. पतीबरोबर तुला जेथपर्यंत यायला पाहिजे, तेथपर्यंत तू आली आहेस.'' सावित्री म्हणाली, ``माझ्या पतीदेवांना जेथे नेले जाईल किंवा ते स्वत: जेथे जातील, तेथे मलाही गेले पाहिजे. हाच सनातन धर्म आहे. तपश्चर्या, गुरुभक्‍ती, पतीप्रेम, व्रताचरण आणि आपली कृपा यांमुळे माझी गती कोठेही थांबू शकत नाही.'' तिच्या या बोलण्यावर यमराज प्रसन्न झाले. त्यांनी तिला सत्यवानाचे प्राण सोडून कोणताही वर माग म्हटले. या वेळी एकुलता एक पुत्र गमावलेल्या सासर्‍यांची मूर्ती तिच्या दृष्टीसमोर आली. तिने आपल्या सासर्‍यांसाठी दृष्टी, बल व तेज मागितले. यमराजांनी तिला `तथास्तु ।' म्हणून परत फिरण्यास सांगितले. सत्यवानाच्या मागे स्वत:चे काय होईल, याचा विचार न करता तिने आपल्या सासर्‍यांसाठी वर मागितला ! केवढा हा त्याग !!

यमधर्माकडून दुसरा वर
सावित्री यमराजाच्या मागे जातच राहिली. परत जायला सांगणार्‍या यमराजाला ती म्हणाली, ``जेथे माझे प्राणनाथ रहात आहेत, तेथेच मी असले पाहिजे. याशिवाय माझी आणखी एक गोष्ट ऐका. सत्पुरुषांचा तर एका वेळचा सहवासही अत्यंत लाभप्रद असतो. त्यापेक्षा त्यांच्याशी मैत्री होणे श्रेष्ठ आहे. सत्संगती कधीच वाया जात नाही म्हणून नेहमी सत्पुरुषांबरोबर राहिले पाहिजे.'' तिच्या या कल्याणकारी बोलण्यामुळे यमराजांनी तिला पतीचे प्राण सोडून दुसरी कोणतीही गोष्ट माग म्हटले. सावित्रीने आपल्या सासर्‍यांचे गेलेले राज्य त्यांना आपोआप प्राप्‍त व्हावे व त्यांनी आपल्या धर्माचा त्याग करू नये, हा वर मागितला. यमराजाने `तथास्तु ।' म्हणून तिला परत जाण्यास सांगितले. सासर्‍याने राज्यकारभार `धर्माने' करावा, या मागणीत तिची धर्मावरील अढळ निष्ठा दिसून येते !

दुहिता !
चालता-चालता सावित्री यमराजाला म्हणाली, ``सर्व प्रजेचे आपण नियमाने संयमन करून तिला इच्छित फळही देता, म्हणून आपण `यम' नावाने प्रसिद्ध आहात. म्हणून आता मी जे सांगेन ते ऐका. मन, वचन व कर्म यांनी सर्व प्राण्यांशी द्रोहरहित असणे, सर्वांवर कृपा करणे व दान देणे हा सत्पुरुषांचा सनातन धर्म आहे. अशा प्रकारचाच तर बहुतेक हा सर्व लोक आहे. सर्वच माणसे आपापल्या शक्‍तीप्रमाणे कोमलतेने वागतात; पण जे सत्पुरुष असतात, ते तर आपल्याजवळ आलेल्या शत्रूंवरही दया करतात.'' तिच्या या बोलण्यावर संतुष्ट होऊन यमराजांनी तिला तिसरा वर माग म्हटले. तिसर्‍या वराने सावित्रीने आपल्या पित्यासाठी १०० पुत्र मागितले. यमराजांनी तीही इच्छा पूर्ण करून तिला परत जायला सांगितले. सासू-सासर्‍यांचे कल्याण करून घेतल्यावर आपल्या वडिलांना आपल्या माघारी कोणीच संतान नसल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तर सत्यवानाबरोबरच जाण्याचा निर्णय मनोमन घेतला होता. कन्येला `दुहिता' म्हणतात. सासर आणि माहेर या दोघांचे हित साधणारी ती `दुहिता'! किती उत्तम प्रकारे तिने आपले कर्तव्य पार पाडले !

यमधर्माकडून चौथा वर
काही अंतर चालून गेल्यावर सावित्री यमधर्माला म्हणाली, ``पतिदेवांच्या सानिध्यामुळे मला हे अंतर काही जास्त जाणवत नाही. माझे मन तर फार दूर दूर धावत असते. म्हणून मी जे बोलणार आहे, ते ऐकण्याची कृपा करावी. आपण विवस्वान (सूर्य) यांचे पराक्रमी पुत्र आहात. म्हणून आपणांस `वैवस्वत' म्हणतात. आपण शत्रूमित्रादिक भेदभाव सोडून सर्वांचा समानतेने न्याय करता. त्यामुळेच सर्व प्रजा धर्माचे आचरण करते. त्यामुळे आपणास `धर्मराज' म्हटले जाते.'' याही बोलण्यावर प्रसन्न होऊन यमराजांनी सावित्रीला चौथा वर दिला. या वराने तिने तिच्या कुलाची वृद्धी करणारे बलवान व पराक्रमी असे १०० पुत्र मागितले. पहिल्यांदाच सावित्रीने स्वत:साठी काहीतरी मागितले ! यमराजांनी आनंदाने तिला हा वर दिला व म्हटले की, तू खूप दूरवर आली आहेस. आता परत जा.

यमधर्माकडून सत्यवानाचे प्राण परत मिळाले !
सावित्री यमधर्माबरोबर पुढे-पुढे जातच राहिली. ती म्हणाली, ``सत्पुरुषांची वृत्ती नेहमी धर्मातच रहात असते. ते कधी दु:खी किंवा व्यथित होत नाहीत. सत्पुरुषांशी सत्पुरुषांचा जो समागम होतो, तो कधीही निष्फळ होत नाही. सत्पुरुष सत्याच्या बळावर सूर्यालासुद्धा आपल्या जवळ बोलावून घेतात. ते आपल्या तपाच्या प्रभावाने पृथ्वीलाही धारण करतात. सत्यात राहिल्याने सत्पुरुषांना कधी खेद होत नाही. हा सनातन सदाचार सत्पुरुषांनी आचारलेला आहे, असे जाणून सत्पुरुष परोपकार करतात व परतफेडीकडे कधी दृष्टी ठेवत नाहीत.'' तिचे हे धर्मानुकूल वचन ऐकून यमाने पाचवा वर मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्री म्हणाली, ``हे धर्मराजा, आपण मला जो पुत्रप्राप्‍तीचा वर दिला आहे, तो दांपत्यधर्माशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून आता मी हाच वर मागते की, माझे पती जिवंत व्हावेत. यामुळे आपले वचन सत्य होईल. कारण पतीवाचून तर मी मृत्यूच्या मुखातच पडले आहे. पतीविना मला अन्य कोणत्याही सुखाची इच्छा नाही. स्वर्गाचीदेखील मला कामना नाही. प्रत्यक्ष लक्ष्मी आली तरी मला तिचीही आवश्यकता नाही. इतकेच नव्हे, तर पतीवाचून मी जिवंतही राहू इच्छित नाही. आपणच मला १०० पुत्र होण्याचा वर दिला आहे आणि तरीही आपण माझ्या पतीला घेऊन जात आहात. म्हणून मी जो हा वर मागितला आहे, त्यानेच आपले वचन सत्य होईल.'' हे ऐकून सूर्यपुत्र यमराज फार प्रसन्न झाले आणि त्यांनी `तथास्तु ।' म्हणत सत्यवानाचा पाश काढून घेतला. ते म्हणाले, ``हे कल्याणी ! घे, मी तुझ्या पतीला मुक्‍त केले आहे. आता हा सर्व प्रकारे निरोगी होईल. याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हा तुझ्यासह चारशे वर्षे जिवंत राहील. धर्मपूर्वक यज्ञअनुष्ठान करून सर्व लोकांत कीर्ती मिळवेल. त्याच्यापासून तुला १०० पुत्र होतील !'' यमराज परत जायला निघाले. सावित्रीने त्यांना वंदन केले आणि त्यांनी केलेल्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्‍त केली. यमराज निघून गेल्यानंतर सावित्री सत्यवानाच्या अचेतन देहाजवळ आली. तिने त्याचे मस्तक पुन्हा आपल्या मांडीवर घेतले. हळूहळू सत्यवानाच्या देहात चैतन्य आले. तो उठून बसला ! आज अनेकांना हिंदु धर्मात सांगितलेले परलोक, परलोकांचा प्रवास आणि अन्य `सूक्ष्म' भाग प्रत्यक्षात आहेच, हे कळत नाही, पटत नाही. काहींना पटले तरी दिसू शकत नाही. येथे तर प्रत्यक्ष यमधर्माशी धर्मानुकूल संभाषण करून शीलवती, कुलवती, गुणवती सावित्रीने आपल्या पतीचे पंचप्राण परत आणले. प्रत्येक हिंदु पतिकातेच्या हृदयात अढळ स्थान मिळवणार्‍या सती सावित्रीला शतश: प्रणाम !


अक्षय्य तृतीया

अक्षय्य तृतीया : 
वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया असे म्हटले जाते. हा दिवस शेतीच्या कामाला सुरुवात करण्याचा दिवस म्हणून महत्त्वाचा समजतात. या दिवशी नवीन कामे, व्यवसाय यांची सुरुवात करण्याची पद्धत आहे, हा उत्तम मुहूर्ताचा दिवस आहेच.
अखंड, क्षय नाही अशी तिथी म्हणजे अक्षय्यतृतीया. या दिवशी चांगले काम सुरू केले तर अखंडपणे सुरू राहते असे म्हणतात. साडे तीन मुहूर्ताचे दिवस मानले आहेत, त्यापैकी हा दिवस - अर्धा मुहूर्त आहे. दान, होम करणे आणि पुण्य मिळवणे या गोष्टी माणसाने या दिवसाशी जोडल्या आहेत. जे आहे ते साठवण्यापेक्षा दिल्याने आणखी मिळवता येईल असे या दिवसाचे महत्त्व पूर्वीपासून सांगितले गेले आहे.

चैत्रगौर


चैत्रगौर :

ऋतूप्रमाणे सुरू झालेल्या उत्सवात चैत्रगौर हा एक उत्सव. शंकर-पार्वती या देवतांची एक जुनी गोष्ट यासोबत जोडलेली आहे. चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत घरातील देवघरात गौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा केली जाते. वसंत ऋतू म्हणजे झाडांना पालवी फुटण्याची, कैर्‍या येण्याची सुरुवात, आणि हरभरा तयार होऊ लागलेला असा हा काळ. म्हणून कैरी घालून, हरभर्‍याची डाळ भिजवून, ती वाटून केलेला खमंग पदार्थ, साखर-खोबरे, कैरीचे पन्हे असे पदार्थ या निमित्ताने करण्याची, आणि घरात स्त्रियांना बोलवून त्यांना हळदी-कुंकू लावून ते खायला देण्याची जुनी पद्धत आहे. स्त्रियांना एकत्र येण्यासाठी काही उत्सव सुरू झालेत आणि अजूनही ते घराघरात साजरे होतात, त्यापैकीच हा एक.

उन्हाळा सुरू असल्याने थंडावा देणारे कैरीचे पन्हे, झाडावर मोठ्या प्रमाणावर येऊ लागलेली सोनचाफ्याची फुले लोकांना देणे यातून निसर्गाशी जवळीक साधण्याची, सुगंधाचा आस्वाद घेण्याची मानसिकता दिसते. कैरीची चव घेण्याच्या निमित्ताने रसिकतेने निसर्गाला आठवण्याचा, एकत्र येण्याचा हा उत्सव असतो. 

काही घरांत पार्वती आपल्या माहेरी चैत्र महिन्यात एक महिनाभरासाठी येते आणि नंतरच तिची सासरी पाठवणी केली जाते असे मानून हा उत्सव साजरा केला जातो. 

शंकर - पार्वती यांना पार्वतीच्या घरी महिनाभर ठेवून घेतले होते. त्यांचा आदर-सत्कार केला होता, अशी कथा प्रचलित आहे. अशाच प्रकारे चैत्रात बसवल्या जाणार्‍या गौरीची महिनाभर घरात पूजा होते, नंतर गौर पुन्हा आपल्या घरी जाते असे समजतात. चैत्रगौर सर्व घरात साजरी होत नाही. विशिष्ट जातीतील लोकच या चैत्रगौरी बसवतात. सर्व समाजात ही प्रथा पाळली जात नाही


गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला
इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभा-याला
घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे
चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे
सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी
गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी
सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी
गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी
गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी
कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी
रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती
ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती
जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला
ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला

श्री हनुमान जयंती



श्री हनुमान जयंती :
चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी श्री हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. रामायण काळातील हनुमानाचा पराक्रम, त्याची रामावरची श्रद्धा, भक्ती, त्याचे ब्रह्मचर्याचे पालन करण्याचे व्रत या सर्व गोष्टींची आठवण ठेवण्यासाठी हा दिवस लोक साजरा करतात.  बलोपासना हा हनुमानाचा विशेष गुण होता.  व्यायाम करून शरीर निरोगी ठेवण्याकडेही लक्ष द्यायला हवे असे समर्थांनी स्वत:च्या उदाहरणातून दाखवून दिले.  स्वत: बलोपासना करून श्री हनुमानाची सार्थ भक्ती करणार्‍या समर्थ रामदासांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी श्री हनुमानाची स्थापना केली. या सर्व ठिकाणी श्री हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. महाराष्ट्रातील जवळजवळ प्रत्येक गावात आपणास श्री हनुमान मंदिर आढळतेच. यांपैकी बहुसंख्य मंदिरांत हा उत्सव यथाशक्ति साजरा केला जातो.

Thursday, April 1, 2010

हे डोकं आहे की फ्लॉवर पॉट ?

गुलाबाचं फुल , मोगर्‍याचं फुल
चाफ्याचं फुल , शेवंतीचं फुल
किती किती फुलं खोवली आहेत तिने डोक्यात
कळेना ..
हे डोकं आहे की फ्लॉवर पॉट ? 

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही

स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही,
सावलीशिवाय ,
"स्व" ची जाणिव कधीही होत नाही,
सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते,

सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते.


विश्वासाला तडा गेल्यावर
काही मार्गच ऊरत नाही,
तरीपण विश्वास ठेवावा लागतो
नाहीतर जगन्याची आशाच ऊरत नाही...

 

श्रीरामनवमी

श्रीरामनवमी :



चैत्र शुक्ल नवमी या दिवशी रामजन्माचा उत्सव साजरा करतात. राम हा सत्यवचनी, सदाचारी, प्रेमळ, व पराक्रमी राजा होता. आदर्श मूल्यांची जपणूक म्हणजे ‘राम’ असे सांगत पिढ्यानपिढ्या रामाचा आदर्श ठेवण्यास सांगितले जाते आहे. त्या प्रजाहितदक्ष श्री रामाचा जन्म चैत्र शुक्ल नवमीला झाल्याचे मानले जाते. दुपारी १२ वाजता रामाचा जन्म सोहळा साजरा करण्याची पद्धत आहे. रामाच्या मंदिरात त्यासाठी रामचरित्र सांगितले जाते. प्रसाद म्हणून सुंठ-साखर एकत्र करून देण्याची पद्धत आहे.

श्रीरामनवमीचा उत्सव अयोध्येत मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. भारतात हा उत्सव अनेक राज्यात केला जातो. पूर्वापार महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी श्रीरामनवमीच्या निमित्ताने रामचरित्राचे कीर्तन केले जाते. नऊ दिवस हा उत्सव करुन नवमीला सांगता केली जाते. समर्थ रामदास, श्रीगोंदवलेकर महाराज आदी श्रीरामभक्त महाराष्ट्रात होऊन गेले. या दोहोंचा संबंध असणार्‍या ठिकाणी (उदा. सज्जनगड, चाफळ, गोंदवले...इ.) हा उत्सव विशेष उत्साहात साजरा केला जातो.

महाराष्ट्रातील प्रत्येक राममंदिरात श्रीरामनवमी साजरी केली जाते. रामायण या महाकाव्यातील अनेक कथा आजच्या काळातही लाखो लोकांना  खिळवून ठेवतात. आदर्श जीवनाबद्दलच्या या कथा आजही बोध घेण्याजोग्या आहेत.